- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक
एक जबाबदार पालक म्हणून आपण कित्येक गोष्टी करत असतो. काही ठरवून, तर काही सहजपणाने. कोणत्याही नात्यात आनंद खूप महत्त्वाचा असतो. सोबत असण्याचा आनंद, एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचा आनंद. मोडून पडण्याच्या काळात समर्थपणे सोबतीला असण्याचा आनंद.
या सर्व आनंदांत जर प्रेम मिसळलेलं असेल, तर क्या बात है! तेव्हा नात्याच्या मुळाशी असतं ते प्रेम आणि एकमेकांच्या सोबतीला असण्याचा निर्भेळ आनंद. जगणं तसंही सरळ रेषेत चाळणारं नसतं, परंतु आपला अंतिम टप्पा गाठणं आणि त्यासाठी आपण सोबत असणं अत्यंत गरजेचं असतं.
आई-बाबा म्हणून आपण आपल्या मुलांच्या जीवनात खूप महत्त्वाचे घटक असतो. आपल्याशिवाय त्यांच्या जीवनातला एक मोठा टप्पा रिकामाच राहील. तसंच मुलांचं स्थानही आपल्या जीवनात तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांच्याशिवाय आपलं पालकपण अधुरं आहे. तेव्हा या लेखात आपण काही गोष्टींची उजळणी करणार आहोत. विसाव्याचं वळण आलंय. तेव्हा थांबण्यापूर्वी थोडं मागं वळून पाहू आणि पुढे चालायला लागू या. कारण पालकत्व हा कधीच न संपणारा प्रवास आहे.
आपलं मूल समजून घेणं
पालक म्हणून आपल्याला आपलं मूल माहीत असायला हवं, ही पहिली अट. आपल्या मुलांच्या आवडी-निवडी, त्यांचे स्वभाव, त्यांची शक्तिस्थानं, त्यांच्यातील कमतरता, त्यांच्या भावना, त्यांना वाटणारी भीती, त्यांचा परिचय आपल्याला असला पाहिजे. गुण-दोष माहीत असतील तर आपल्याला काही गोष्टी ठरवणं सोपं जातं.
प्रेम द्या, लाड नको
आपल्या मुलांवर आपण प्रेम करायला हवं. जगावर प्रेम कसं करावं हे ते आपल्याकडूनच शिकतं. याउलट काही पालक मुलांचे वारेमाप लाड करतात. त्यांचा परिणाम असा होतो, की मुलं जबाबदार बनतच नाहीत. स्वत:च्या विश्वातून बाहेर पडत नाहीत.
स्वतंत्र आणि जबाबदार मूल
आपण आपल्या मुलांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे; परंतु त्या स्वातंत्र्याला जबाबदारीचं कोंदणही दिलं पाहिजे. जबाबदारी मुलांना स्पष्ट विचार करायला, योग्य निर्णय घ्यायला, योग्य कृती करायला मदत करते; पण हेही लक्षात असू द्या, की जबाबदारीच्या ओझ्याखाली त्यांचं बालपण हरवून जाऊ नये.
शेरेबाजी टाळू
मुलांची शैक्षणिक प्रगती, स्वभाव, दिसणं, बोलणं, वागणं इत्यादींवरून मुलांवर शेरेबाजी करणं टाळूया. कारण यामुळे मुलं आतून दुखावली जातात. एकटी पडतात, जगापासून दूर राहू लागतात आणि शेवटी आपला आत्मविश्वास गमावून बसतात. आपल्याला हे मान्य आहे?
आधार बनू, अडसर नव्हे
आपली मुलं जे काही रचनात्मक, आव्हानात्मक काम करतात, त्यासाठी आपण त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. त्यांना गरज आहे तिथं सहकार्य केलं पाहिजे; पण त्यांना प्रत्येक वेळी उगीचच सल्ले देत, लुडबूड करत त्यांच्या कामात अडसर बनू नये. आपण आधार द्यायला हवा, विश्वास द्यायला हवा.
नात्यांची मुळं
कुटुंबसंस्था सुरू झाली आणि नात्यांची एक वीण आकार घेऊ लागली. नात्यांचा आवाका वाढतच गेला. मोठ्या माणसांकडून लहान मुलं नाती जोडणं आणि जपणं शिकू लागली. हल्ली कुटुंबं छोटी झाली आणि नात्यांचा झराही आटत गेला. आपलं चौरस, त्रिकोणी कुटुंब एवढीच आपली भूमिका उरली. असं होऊ नये. नात्यांतील लोकांना एकत्र बांधून ठेवणं, त्या नात्यांना जपणं मुलांना शिकवलं पाहिजे. तेव्हाच नात्यांची मुळं घट्ट होतील.
विश्वासाची शिदोरी
तुमच्या मुलांवर तुमचा विश्वास आहे का? फाजील विश्वास नव्हे बरं! कारण डोळस विश्वास चांगल्या गोष्टी घडवतो. फाजील विश्वास पश्चात्ताप देतो. तेव्हा आपल्या मुलांना स्ट्रॉंग बनवताना त्यांच्यात विश्वास जरूर पेरायला हवा. स्वत:वर विश्वास, पालकांवर विश्वास, जगात जे चांगलं आहे त्यावर विश्वास. हाच विश्वास मुलांना पुढं जायला मदत करतो.
प्रेम है तो सब है
नात्याच्या मुळाशी असतं ते प्रेम आणि प्रेम सर्व संकटांवर मात करतं. प्रेम नात्यांना जपतं. तेव्हा आपल्या मुलांवर मनापासून प्रेम करायला विसरू नका. मुलांसोबतचा प्रत्येक क्षण आपण जगला पाहिजे. आपलं सोबत असणं त्यांच्यासाठी खूप गरजेचं असतं, आणि त्यांचं आपल्या सोबत असणं आपल्यासाठी खूप मोलाचं असतं.
हा या मालेतला शेवटचा लेख. वर्षभर आपण जो भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ही लेखमाला वाचून कित्येकांनी फोन केले, भेट घेतली, काही पालकांसोबतची सत्रं आयोजित केली. हे सर्व खूप प्रेरणादायी आहे. आता हे विसाव्याचं वळण. थोडं थांबून नवीन वाट चालायला सुरुवात करू या. आपल्याला पालकत्वासाठी खूप शुभेच्छा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.