रंगुनी रंगांत साऱ्या...

माझी लेक आता अशा वयात आली आहे, की ती मला फॅशन टिप्स देऊ लागली आहे. मेकअप कसा करायचा, स्कीन केअर रुटीन वगैरे अनेक गोष्टी ती मला सांगत असते.
Make Up
Make Upsakal
Updated on

- डॉ. समिरा गुजर-जोशी

माझी लेक आता अशा वयात आली आहे, की ती मला फॅशन टिप्स देऊ लागली आहे. मेकअप कसा करायचा, स्कीन केअर रुटीन वगैरे अनेक गोष्टी ती मला सांगत असते. परवा काहीतरी अशाच गप्पा सुरू असताना ती म्हणाली, ‘प्रत्येक स्कीन टोनसाठी काही कलर असतात, ममा! ते त्या त्या टोनच्या व्यक्तीला जास्त छान दिसतात.’ मला का कोण जाणे एकदम खूप भीती वाटली.

कारण त्वचेचा रंग हा आपल्या समाजात किती सेन्सिटिव्ह विषय आहे, याची मला जाणीव आहे. जेव्हा जेव्हा हे असे अवघड विषय तिला समजावून सांगण्याची वेळ येते, तेव्हा उगीच मला घशाशी काही जड जड जाणवू लागतं. ती खूप ऑब्जेक्टिवली मला समजावत होती, ‘आपली स्कीन ना वॉर्म किंवा कूल किंवा न्यूट्रल टोनची असते...’; पण माझ्या डोळ्यांसमोर वेगळेच प्रसंग नाचत होते.

मी एकदा एक खूप छान ब्राइट साडी नेसले होते. माझ्या एका मैत्रिणीला ती खूपच आवडली होती. तिच्या घरी तेवढ्यात काही घरगुती समारंभ होता. मी तिला सहज म्हटलं, ‘‘तेव्हा नेस तू ही साडी.’’ ती पटकन म्हणाली, ‘‘छे गं, मला नाही छान दिसणार. मी सावळी आहे ना. मला मोजकेच रंग छान दिसतात.’

मला तिला खूप सांगावंसं वाटलं, की ‘आपण निवडलेल्या कपड्यात आधी आपल्याला छान वाटायला हवं. तुला आवडलेल्या रंगात तू छानच दिसणार. सौंदर्य आपल्या मनात आणि पाहणाऱ्याच्या नजरेत असतं. या अशा नियमात तर ते नक्कीच नाही.’’ म्हणजे या नियमांमध्ये काही तथ्य नाही असं मला सुचवायचं नाही.

मी अशा कार्यक्षेत्रात आहे, की आपलं व्यक्तिमत्त्व ‘बेस्ट’ दिसण्यासाठी या नियमांची मदत होते. कपड्यांचे रंग खूप गोष्टी सुचवतात, त्यामुळे आम्ही अभिनेते म्हणून जी भूमिका करत असू त्या व्यक्तीची मनस्थिती, वय, एवढंच नव्हे, तर आर्थिक स्तर याप्रमाणे आमचे वेशभूषाकार आम्हाला कपडे देतात. त्यामुळे या नियमांचं महत्त्व मला ठाऊक आहे. आपण त्याची माहिती करून घेणं आपल्याला उपयुक्त ठरू शकतं. माझा विरोध आहे तो या कल्पनांच्या आहारी जाऊन वैयक्तिक आयुष्यात स्वतःच्या इच्छांना दरवेळी मुरड घालण्याला.

जी गोष्ट आपला आत्मविश्वास कमकुवत करते ती गोष्ट आपल्याला कॉम्प्लेक्स देते आहे असं समजावं. केवळ सावळ्या व्यक्तींना असं वाटतं असं नाही. गोऱ्या मंडळींनाही ‘मी गोरी आहे म्हणून मला हे छान दिसणार नाही’ असं वाटतं. मला आणखी एक प्रसंग आठवतो, की एक कपल, ज्यात बायको अगदी गोरीपान आणि नवरा जरा सावळा.

मूल होण्याआधी त्यांना चिंता, ही की मूल गोरं होईल की सावळं? आणि सावळंच होणार असेल, तर सावळा मुलगा होऊ दे आणि मुलगी होणार असेल, तर गोरी असू दे. काय बोलायचं? मला तेव्हाही त्यांना खूप म्हणावंसं वाटलं, की तुम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न केलं, एकमेकांना छान साथ देता आहात, हे खरे प्रेमाचे रंग आहेत, आयुष्याचे रंग आहेत. कुठे केवळ त्वचेच्या रंगात अडकता आहात?

मी सध्या एक मालिका करते आहे, ‘प्रेमास रंग यावे’. तिचा विषयच आहे, की नायक रंगानं काळा - सावळाही नव्हे - काळा आहे. अशा मालिकेचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. कारण गोरे नायक- नायिका यांनीदेखील आपली सौंदर्याची व्याख्या वर्षांनुवर्षे घडवली आहे. तिला छेद देणारी ही अशी कथानकं समोर यायला हवीत. प्रत्येक रंगाचं - गोऱ्या किंवा सावळ्या रंगाचं आगळं सौंदर्य आहे, ते टिपता यायला हवं.

अर्थात काळ आता झपाट्याने बदलतो आहे. फेअरनेस क्रीमच्या मागे धावण्यापेक्षा निरोगी त्वचा आता अधिक महत्त्वाची ठरू लागली आहे. स्थळांच्या बाबतीत अपेक्षा - गोरा / गोरी लिहिण्याचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे. आज मॉडेलिंग / ॲक्टिंग क्षेत्रात सावळ्या मुलींचा मुख्य भूमिकांसाठी पूर्वीपेक्षा अधिक विचार होऊ लागला आहे. तरीही सर्व आलबेल आहे, असं अजिबात नाही.

अनेकदा तर आपण स्वतः नकळत न्यूनगंडाच्या पिंजऱ्यात अधिक अडकलेले असतो. मला माझी कलाकार मैत्रीण हेमांगी कवी हिनं या बाबतीत उचललेलं पाऊल महत्त्वाचं वाटतं. तिनं स्वतःचा हॅशटॅगच बनवला आहे - #ती_सावळी_गं. आज ती आपल्या क्षेत्रात यशस्वी आहे. तिचं हे यश किती जणांना, खासकरून ज्यांना स्वतःच्या रंगाविषयी कॉम्प्लेक्स आहे, त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे.

आज प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण तर इंटरनॅशनल स्टार आहेत आणि त्यांच्या भारतीय त्वचारंगाचा त्यांना अभिमान आहे. राधिका आपटे, भूमी पेडणेकर, नंदिता दास, कोंकणा सेन ते आपली सई ताम्हनकर, भार्गवी चिरमुले, तेजश्री प्रधान, प्राजक्ता माळी या सगळ्यांनी आपल्या स्क्रीन प्रेझेन्सनं सौंदर्याच्या व्याख्या बदलवल्या आहेत.

तेव्हा माझ्या लेकीला मला एवढंच सांगायचं आहे, की ‘लाडके, beauty is more than skin deep. सगळे रंग सुंदर आहेत आणि नैसर्गिकही. तुझं सौंदर्य तेव्हा खुलून दिसेल जेव्हा तुला तुझा ‘स्वतःचा रंग’ सापडेल, जेव्हा तू जगालाही आत्मविश्वासानं कविवर्य सुरेश भटांच्या शब्दात सांगशील - ‘रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.