Fathers Day 2024 : आजवर बापाला अनेक उपमा दिल्या गेल्या आहेत. तो कधी वरून काटेरी पण आतून रसाळ फणस असतो. तर कधी कणखर पण गोड पाण्याचा नारळ असतो. पण माझ्या दृष्टीकोणातून बाप गुलाबाचं फुल आहे. बापाचा खडतर प्रवास म्हणजे काटे आणि त्याच मुलासमोरचं हसरं रूप म्हणजे ते फुल.
आपण गुलाबाच्या फुलाकडे पाहीलं की आपल्याला काटे दिसतात का? नाही दिसतं ते केवळ टपोरं गुलाबाचं फुल. बापमाणसाची कथाही अशीच आहे. बाप तो बाप होता है, वो एक नही हजारो सपने पुरे करता है! होय ना बाप आपली सगळी स्वप्न करतो आणि आपण त्याला काय देतो तर वृद्धाश्रम.
होय आजचा माझा विषय वृद्धाश्रमावरच आहे. परवा फेसबुक स्क्रोल करत असताना एक व्हिडिओ पाहिला. कोणत्यातरी एका वृद्धाश्रमातील होता, त्यात ७५ च्या वर वय असलेला वृद्ध दिसत होता. त्यातील केअर टेकर जो त्याच्यासोबत इतर लोकांची ‘काळजी’ घेण्यासाठी असतो. वृद्ध व्यक्ती झोपत नाही म्हणून तो त्या व्यक्तीवर ओरडत होता. त्याला मारहाण करत होता. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्याचा गळा दाबून झोपवत होता.
त्याच्यावर आलेल्या कमेंट त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करा, त्याला शिक्षा द्या अशा कमेंट होत्या. काही लोकांनी हा व्हिडिओ जूना असून त्या व्यक्तीवर कारवाई झाली असल्याचे सांगितले.
संबंधित मार खाणारी व्यक्ती कोणाचा तरी बाप, आजोबा आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याची किती विचारपूस केली. की या प्रकारानंतर त्याला घरी घेऊन गेले. काही कल्पना नाही. पण ज्यानं जन्म दिला ज्यानं शिक्षण, लग्न अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्या व्यक्तीला कोणी असं दुसऱ्याच्या स्वाधिन कसं काय करू शकतं हा एक मोठा प्रश्नच आहे.
दुसरी अशीच एक घटना ती म्हणजे एका सरकारी कार्यालयाबाहेर एक आजी आठवडाभरापासून बसलेल्या दिसत होत्या. त्यांच्याशी संवाद साधताना एका व्यक्तीने व्हिडिओ केला होता. त्या आजींना मुलाने तिथे आणून सोडलं होतं. तु इथे बसं मी आलोच असं सांगून मुलगा गेला तो आठवडा झालं आलाच नाही, असं त्या म्हणत होत्या.
खरच हा भयानक प्रकार होता. ही कुठली मानसिकता? पोटच्या गोळ्याला असं रस्त्यात सोडायचं धाडस आई वडिल करतील का? नाहीच ना, मग जन्मदात्यांना अशी वागणूक का दिली जातेय.
तुम्ही आई वडिलांना ज्या वृद्धाश्रमात सोडले तिथली योग्य माहिती घेतली होती का? तिथे योग्य सुविधा आहेत का हे पाहिलं होतं का, केवळ पैसे भरले अन् बापाला सोडलं एवढं केलं की झालं तुमचं काम.
आपले धर्मग्रंथ सांगतात आई वडिलांची सेवा करणं पुण्याचं काम आहे. म्हणून तर आई वडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकांसाठी वैकुंठीचा राणा विठोबासुद्धा गपचूप एका विटेवर उभा राहिला. आज विठोबाच्या नावाच्या आधी पुंडलिकाचे नाव घेतले जाते. विठोबाचा जयजयकार करताना ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...’ असे म्हटले जाते. हे पुण्या त्याला आई वडिलांची सेवा करूनच मिळालं.
मग तुमच्या आमच्या सारख्या लोकांना आई वडील नकोसे का झालेत. जन्मभर मुलांसाठी केलं आणि वृद्धावस्थेत मुलं म्हणतील तसं केलं हेच म्हणतात आजचे वृद्ध. ज्या वयात रिटायर व्हायचं जोडीदारासोबत वेळ घालवायचा त्याकाळात त्यांना वेगळं व्हावं लागतं.
काही वृद्धांचे जोडीदार या वयात त्यांची साथ सोडतात. आयुष्यभर साठवलेली पुंजी एकदा का मुलांच्या नावावर झाली की मग घरातले आजी आजोबा अडगळ वाटू लागतात.
जेव्हा एखाद्या जोडप्याला बाळाची चाहुल लागते. अगदी तेव्हापासूनच बाळाला काही कमी पडायला नको याची काळजी करतो तो बाप असतो. मुलीच्या लग्नात कशाची कमी पडू देत नाही त बाप असतो. तुमच्या आजारपणात तुमच्या सोबत बसून असतो तो बाप असतो.
तुमच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी प्रयत्न करणारा तुमचा बाप असतो. परिक्षेत पास झाल्यानंतर गावभर पेढे वाटणारा बाप असतो. मग अशा या बापाला तुम्ही मुलगा म्हणून काय देत आहात.
फादर डे,ला केवळ स्टेटस लावून फादर डे सेलिब्रेट होणार नाही. बापाला शुभेच्छा द्या पण त्याला वृद्धाश्रमातील तुरूंगात टाकू नका. त्याच्या गरजा खूप कमी असतील त्यामुळे त्याला काय हवं काय नको याची काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या बापाने काही कमी पडू दिलेलं नाहीय तर तुम्ही का कमी पडताय.
ही एक गोष्ट लक्षात घ्या की, ५० शी गाठलेला तुमचा बाप केवळ २० ते २५ वर्षच तुमच्या जवळ असणार आहे. त्यातही कोरोना सारखा रोग आला तर काही गॅरंटी नाही. तो आहे तोवर त्याला खाऊ खाला. त्याची उपासमार करू नका. माणसासारखी वागणूक त्याला द्या, कारण तो अडगळ नाही तर माणूसच आहे.
लहान असल्यापासून तुम्ही बघत आलाय की बाप आहे तर घर कसं भरल्यासारखं वाटतं. भरलेल्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही असं म्हणतात मग तुमचं घर केवळ आर्टिफिशिअल वस्तूंनी नाहीतर माणसांनी भरलेलं राहूद्यात. बापाला जपा त्याची काळजी घ्या. तो गेल्यावर त्याच्या फोटोला मिठी मारता येणार नाही. तो गेल्यावर त्याच्यासाठी ठेवलेला नैवेद्य तो खाणार नाही. त्यामुळेच तो आहे तोवर त्याची काळजी घ्या कारण बाप पुन्हा पुन्हा मिळत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.