रानमेव्यातून आर्थिक प्रगती

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आंबा, तळवडे गावातील बारा महिलांनी एकत्र येत सह्यगिरी महिला बचत गट तयार केला.
sahyagiri self help group
sahyagiri self help groupsakal
Updated on

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आंबा, तळवडे गावातील बारा महिलांनी एकत्र येत सह्यगिरी महिला बचत गट तयार केला. गटाने करवंद, जांभूळ, फणस, कोकम फळांपासून विविध प्रक्रिया उत्पादने तयार केली. पर्यटन उद्योग आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून गटाने स्वतंत्रपणे सक्षम विक्री व्यवस्था उभी केली आहे. शाहूवाडी परिसरात भात, नाचणी आणि काही प्रमाणात भाजीपाला, ऊस लागवड आहे.

या तालुक्यातील आंबा, तळवडे गावांचा परिसर डोंगरपट्ट्यांचा, त्यामुळे वर्षभर या परिसराला पर्यटक भेट देतात. बाजारपेठेची ही संधी लक्षात घेऊन या गावातील महिलांनी २००६ मध्ये सह्यगिरी महिला बचत गट तयार केला. तळवडे गावातील सायली लाड गटाच्या अध्यक्षा आहेत. कोल्हापुरातील स्वयंसिद्धा संस्थेच्या कांचनताई परुळेकर यांनी गट उभारणी, प्रक्रिया उद्योगासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक सहकार्य केले.

पहिल्या टप्प्यात आंबा परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन गटाने भडंग, पॉपकॉर्न, लाडू आणि पापडनिर्मितीला सुरुवात केली. या पदार्थांच्या विक्रीतून गटाला बाजारपेठेचा अंदाज आला. गटामध्ये शुभांगी वायकूळ, प्रतिभा कोकाटे, श्रद्धा वायकूळ, समृद्धी कामेरकर, मिताली बेर्डे, सुरेखा लाड, लता गुडेकर, निर्मला बेर्डे, सुप्रिया कोलते, नीलिमा कामेरकर, अनुजा जठार आदी सदस्या आहेत.

रानमेव्यावर प्रक्रिया

आंबा, तळवडे परिसरातील डोंगर पट्ट्यात करवंद, आंबा, फणस, जांभूळ, कोकम हा रानमेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. गटाने या फळांवर प्रक्रिया करून विक्रीचे नियोजन केले. प्रक्रिया उद्योग सुरू करण्याअगोदर महिलांनी वारणा भगिनी मंडळातर्फे प्रशिक्षण घेतले.

दर हंगामात परिसरातील महिलांकडून रानमेवा योग्य दरात खरेदी केला जातो. पहिल्या टप्प्यात महिलांनी करवंद चटणी, क्रश, लोणचे, जॅम, सरबत, जांभळाचे सरबत, जॅम, साटे, आंब्यापासून लोणचे, चुंदा, कोकम सरबत, सोलकढी आणि फणसापासून साटे, वेफर्स निर्मिती सुरू केली.

रानमेव्याची वेगळी चव आणि दर्जामुळे परिसरातील दुकानदार, पर्यटकांकडून उत्पादनांना टप्प्याटप्प्याने मागणी वाढू लागली. गटाने मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करण्यासाठी ग्राइंडर, कटर, कुकर, तसेच बाटली, पाऊच पॅकिंग यंत्राची खरेदी केली. यामुळे मागणीनुसार पुरवठा करणे शक्य झाले.

गटातील काही महिला मॅंगो शेवया; तसेच नाचणी, बेसन, मेथी लाडूनिर्मिती करतात. पापडामध्ये पालक, टोमॅटो, जिरा, नाचणी, मेथी आणि फणसाचा स्वाद उपलब्ध आहे. गटाने प्रक्रिया आणि उत्पादनांसाठी परवाना घेतला आहे. गटाने केलेल्या कर्जवाटपातून सदस्यांनी घरगुती व्यवसाय, पशुपालनाला सुरुवात केली.

प्रदर्शनांतून विक्री

गटातील महिला दरवर्षी कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, मुंबई आणि दिल्ली येथील हट बाजार या प्रदर्शनात सहभागी होतात. या माध्यमातून थेट ग्राहकांना विक्री केली जाते. पुणे, मुंबईतील ग्राहक गटाकडे दरवर्षी प्रक्रिया पदार्थांची मागणी नोंदवितात. गटाने कोल्हापूर शहरातील स्वयंसिद्धा शॉपी; तसेच रंकाळा परिसरातील फिरत्या विक्री केंद्रात उत्पादने विक्रीस ठेवली आहेत.

विविध उपक्रम

परिसरातील गावांत महिला गटांना खाद्यपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण आणि बचतीचे महत्त्व सांगितले जाते. वनविभागाच्या साहाय्याने विविध उपक्रम राबविले जातात. डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या सहयोगाने दुर्गम भागातील बोरमाळ धनगरवाडा, भिवाची वाडी, केर्ले, केंबुर्णीवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. महिलांसाठी पारंपरिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. दरवर्षी स्वयंसिद्धा संस्थेतर्फे सदस्यांना विविध भाजीपाला बियाणांचे वाटप केले जाते.

(शब्दांकन : अमित गद्रे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.