‘नकारा’धिकार

माझी एक मैत्रीण फार खास आहे. तिच्याकडे पाहिल्यानंतर नेहमीच मला असं वाटतं, की ही इतकी कॉन्फिडंट कशी? कधी पाहावं तर फ्रेश दिसते. तिचं आयुष्य तिच्या ताब्यात आहे असं नेहमी वाटतं.
Friend
Friendsakal
Updated on

- डॉ. समीरा गुजर-जोशी

माझी एक मैत्रीण फार खास आहे. तिच्याकडे पाहिल्यानंतर नेहमीच मला असं वाटतं, की ही इतकी कॉन्फिडंट कशी? कधी पाहावं तर फ्रेश दिसते. तिचं आयुष्य तिच्या ताब्यात आहे असं नेहमी वाटतं. खरंतर तीही साधारण चाळिशीतली, घराच्या - मुलांच्या जबाबदाऱ्या सांभाळून करिअर करणारी. म्हणजे तुझ्या-माझ्यासारखीच... मग ही हे सगळं इतकं छान मॅनेज कसं करते? स्वतःचा हा आत्मविश्वास कसा जपते? शेवटी न राहून मी तिलाच हे विचारलं!

ती मला हसत म्हणाली, ‘कारण मला नाही म्हणता येतं!’ मला चटकन कळलं नाही. मी विचारलं, ‘म्हणजे?!’ ती म्हणाली, ‘अगं, आपल्याला लहानपणापासून समोरच्याच म्हणणं ऐकायला आणि समोरचा जे म्हणेल ते स्वीकाराला शिकवलं जातं. खास करून बायकांनी ऐकणं आणि हो म्हणणं हेच अधिक अपेक्षित असतं. मग आपल्यालाही होकार द्यायची इतकी सवय लागते, की आपण मनाविरुद्ध गोष्टींनाही सवयीनं होकार देऊ लागतो; पण योग्य वेळी नकार देणं हे आत्मविश्वासाचं महत्त्वाचं लक्षण आहे हे आपण विसरतो. करण नकार देणं हा एक प्रकारे निर्णय घेणं आहे. नाही म्हणणं अजिबात सोपं नाही.

समोरच्याला न दुखावता नाही म्हणणं ही तर कला आहे; पण नाही म्हणण्याचे खूप सारे फायदे आहेत. अगदी सोप्या फायद्यापासून सुरुवात करते. किती वेळा असं झालं आहे, की तू गोड खायचं नाही असं ठरवलं आहेस आणि कुणीतरी तुला आग्रह केला मग नाही म्हणता येत नाही म्हणून तू तुझा नियम मोडलास.

मात्र, तेच एखाद्या सेलिब्रेटीचे नियम पाळणं बघून तुला ती किती शिस्तबद्ध आहे याचं कौतुक वाटून गेलं आहे. हो की नाही? याचा अर्थ ती नियम पाळण्यासाठी ठामपणे ‘नाहीॅ’ म्हणत असली पाहिजे. अनेकदा आपण जरी नाही म्हटलं, तरी समोरचा ते फारसे गांभीर्यानं घेत नाही. तेव्हा आपला नकार नम्रपणे; पण ठामपणे सांगणं गरजेचं असते. केवळ समोरच्याला काय वाटेल या विचारानं मान झुकवणं हा दुबळेपणा झाला.

‘सरसकट वाटेल त्या गोष्टीला नाही म्हणण्याइतका बालिशपणा आपल्यात नक्कीच नसतो. मात्र, गरजेच्या ठिकाणी नाही म्हणायला आपण लाजतो. ते म्हणायला शिकणं ही आपलं आयुष्य आपल्या नियंत्रणात आणण्याची एक महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे आपला वेळही पुष्कळ वाचतो. कितीतरी वेळा नाही कसं म्हणायचं म्हणून शनिवार-रविवारच्या सुट्टीमध्ये मनाविरुद्ध अनेक ठिकाणी तू गेली आहेस ना? पण जर तुला तुझ्यासाठी वेळ काढणं गरजेचं असेल, तर अशा सोशल कमिटमेंट्सना अधूनमधून नाही म्हणणं हा पर्याय उपलब्ध आहे हे लक्षात घ्यायला हवं.

नाही कसं म्हणणार ना असं म्हणून नाईलाजानं गोष्टी करण्याऐवजी नाही म्हणण्याचा इलाज आपल्या हाती आहे याचं भान हवं. नाही म्हणणं म्हणजे स्वार्थीपणा नव्हे. आपण आपल्या मर्जीनं काहीतरी केलं, तर स्वतःला आपण प्राधान्य दिलं या भावनेनंच आपल्याला छान वाटतं. आपल्या आजूबाजूचेही आपल्याला गृहीत धरणं कमी करतात.

घरात काय किंवा ऑफिसमध्ये काय... केवळ नाही म्हणता येत नाही म्हणून अतिरिक्त काम अंगावर घेत राहिलो, तर त्याचा परिणाम कामावरही होतो आणि आपल्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावरही!! दिवसाचे तास मर्यादित आहेत यातून स्वतःसाठी वेळ काढायचा असेल तर काही गोष्टींना नाही म्हणणं भाग आहे. नाही म्हणणं हाही एक प्रकारचा निवडीचा अधिकार आहे. तो आपल्याला वापरता आला पाहिजे. नाही म्हणताना ते विचारपूर्वक म्हटलं, की मग परत त्याविषयी खंत व्यक्त करण्याचं किंवा त्याविषयी गिल्ट बाळगण्याचं कारण नाही.’

तिचं बोलणं ऐकताना सडेतोड वाटलं, तरी मनाला निश्चित पटलं. तुला काय वाटतं? तुम्ही स्वतःला प्राधान्य द्या म्हणजे इतरांना मदत करू नका असं अजिबात नाही. फक्त इतरांना मदत करताना स्वतःला विसरू नका आणि त्यासाठी वेळ प्रसंग पडल्यास नाही म्हणायला शिका. उलट स्वतःला प्राधान्य दिल्यानं तुझं मानसिक शारीरिक स्वास्थ सुधारेल.

तू व्यक्ती म्हणून अधिक आनंदी आणि अधिक समर्थ असशील. अशी व्यक्ती दुसऱ्याला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकते. फ्लाईटमध्ये सुरक्षेचे नियम सांगत असताना ऑक्सिजन मास्क आधी स्वतः घाला आणि मग इतरांना हे सांगतात ते त्याच उद्देशानं.. आयुष्यालाही ते लागू पडतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.