घट्ट, नितळ मैत्री

मैत्रीची व्याख्या करणं तसं कठीण आहे. एक निरागस नातं, ज्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीवर निःस्वार्थ प्रेम करतो. त्या व्यक्तीशी बोलताना मनात कोणतंच दडपण नसतं.
ulka gokhale and aasawari joshi
ulka gokhale and aasawari joshisakal

- उल्का गोखले, आसावरी जोशी

मैत्रीची व्याख्या करणं तसं कठीण आहे. एक निरागस नातं, ज्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीवर निःस्वार्थ प्रेम करतो. त्या व्यक्तीशी बोलताना मनात कोणतंच दडपण नसतं. एक अशी व्यक्ती जी आपल्याला आपल्यापेक्षाही खूप चांगलं ओळखते. तीच आपली खरी मैत्रीण असते, असं मानणाऱ्या अभिनेत्री आसावरी जोशी यांचं त्यांची मैत्रीण उल्का गोखले यांच्याशी असंच काहीसं नातं आहे.

आसावरी सांगत होत्या, ‘‘उल्का माझी पहिलीपासूनची मैत्रीण आहे. त्यावेळी साधारण आम्ही पाच- सहा वर्षांच्या असू. त्या निरागस वयातली मैत्री खरी मैत्री असते, असं मला वाटतं. मी याबाबतीत स्वतःला खूप भाग्यवान समजते, की उल्काच नव्हे तर त्यावेळी माझ्या शाळेत, माझ्या वर्गात असलेले मित्र-मैत्रिणी अजूनही माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत.

आमच्या ग्रुपमधील सगळ्यात चांगली बाब म्हणजे, प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या व्यापात असूनही एकत्र भेटण्यासाठी वेळ काढतो. आम्ही एकत्र भेटतो, मज्जा मस्ती करतो. त्यावेळी आम्ही आयुष्यात आपापल्या क्षेत्रात कोण आहोत याचा काहीच फरक पडत नाही. तिथे आम्ही एकमेकांना अजूनही शाळेतल्याच टोपणनावाने हाक मारतो.’

उल्का सांगत होत्या, ‘आता आमच्या मैत्रीला ५५ वर्षं झाली, तरी आम्ही सगळे एकमेकांसोबत तेवढेच कनेक्ट आहोत. आसावरी या सगळ्यामध्ये तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून उपस्थित असते. आसावरी खूप चांगली मैत्रीण आहे. ती सुरुवातीला आमच्याशी वागायची, बोलायची तशीच आताही वागते. ती एक मोठी सेलिब्रिटी आहे; परंतु ती आमच्यासोबत असते, तेव्हा तिचं हे स्टेटस आमच्यात नाही येत.

तिला तिच्या प्रसिद्धीचा जराही गर्व नाहीये. ती कधीच तिच्या वागण्यातून हे जाणवून देत नाही, की ती कोणीतरी स्पेशल आहे. म्हणजे माझा वाढदिवस असेल, तर कधीच ती नुसता मेसेज करत नाही. ती स्वतः कॉल करते, गप्पा मारते. ती म्हणतेसुद्धा, ‘नुसतं मेसेजवर काय बोलायचं? कॉलवर बोलल्यावर आपलंसं वाटतं.’ नुसत्या आवाजावरूनदेखील आम्हाला एकमेकांविषयी कळतं. ती सेलिब्रिटी असल्याचा आम्हाला खूप अभिमानही आहे; पण आजही आमच्यासाठी ती आमची आधीचीच आसावरी आहे.’

त्या पुढे म्हणाल्या, ‘आसावरी शाळेत असल्यापासूनच खूप हुशार आणि ॲक्टिव्ह होती. आम्हाला आधीपासूनच खात्री होती, की ती याच क्षेत्रात पुढे जाणार आहे. शाळेच्या स्नेहसंमेलनात डान्स करणं असो किंवा गाणी म्हणणं असो, ती सगळ्यात पुढे असायची. तिनं काम करताना अनेक चढ-उतार पाहिले; पण न थांबता ती नेहमी पुढे गेली. तिनं साकारलेल्या प्रत्येक भूमिकेमध्ये तिनं तिच्या अभिनयाची चमक दाखविली आहे. आताही तिची ‘जुबली टॉकीज’ ही नवीन मालिका लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. मी खूप उत्सुक आहे, तिच्या या मालिकेसाठी.

मी एक पोस्ट एजंट आहे. तिच्या दृष्टीनं माझं काम खूपच छोटं आहे; पण हे ती कधीच म्हणणार नाही. उलट मी नेमकं काय काम करते हे पाहण्यासाठी माझ्यासोबत ऑफिसमध्ये आली होती. तेव्हा तिथल्या लोकांनाही आश्चर्य वाटलं होतं. ही तिची आपुलकी फार कमी लोकांमध्ये असते.’

पुढे आसावरी म्हणाल्या, ‘‘उल्का त्यावेळी आमच्या सगळ्यांमध्ये दिसायला खूप सुंदर होती. तिचा चेहरा खूप जास्त तरतरीत आणि सुंदर होता. त्यात तिचे केसही काळेभोर आणि दाट होते. या सगळ्याचं आम्हाला खूप कौतुक होतं. ती अभ्यासातही खूप हुशार होती; पण तरीही ती थोडीशी शिष्ट होती. कारण तिला माहिती होतं ती सुंदर आहे. आम्ही पाचवीत गेलो, त्यावेळी मुलींची शाळा वेगळी आणि मुलांची शाळा वेगळी असायची.

म्हणजे आमचा कॅम्पस जरी एक असला तरी वेगवेगळे वर्ग असायचे. त्यावेळी मधल्या सुट्टीत आम्ही फिरायचो तेव्हा, आमचं असं असायचं की, ‘हा मुलगा बघ आपल्या मागे-मागे येतोय. तो सारखा माझ्याकडे बघत असतो, त्याला आता जरा सरळ केला पाहिजे.’ अशा आमच्या गप्पा असायच्या आणि त्यामध्ये मी आणि उल्का अग्रेसर असायचो. ती मुलं अजूनही आमचे मित्र आहेत. त्यामुळे आता आम्ही भेटतो, तेव्हा हे किस्से आठवून स्वतःवरच हसू येतं.

उल्का व्यक्ती म्हणून अतिशय नम्र आणि सहनशील आहे. म्हणजे शाळेत असताना होती, तशी आता नाहीये. बऱ्याचवेळा ती दुसऱ्यांना आनंद मिळावा यासाठी स्वतःच्या मनाला मुरड घालते. तिनं असं न करता, स्वतःच्या आनंदाचाही विचार केला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. माणूस म्हणून ती अतिशय प्रेमळ आहे.

सगळ्यांची काळजी घेते. मी कित्येकदा तिच्याकडे राहायला जाते. तिच्या घरी कधीच मला परकं वाटत नाही. अशा माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, ज्यांची घरं माझ्यासाठी हक्काची आहेत आणि सगळ्याजणी माझे खूप लाडही करतात.’

(शब्दांकन : मयूरी गावडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com