कचऱ्यातून सोनं

मला असं वाटतं छंद म्हणजे आपल्याला एखाद्या विषयाबद्दल वाटलेलं कुतूहल. या कुतूहलापोटी आपण ती गोष्ट करत राहतो. माझ्या आयुष्यात अशा असंख्य गोष्टी आहेत.
Neha Mahajan
Neha Mahajansakal
Updated on

मला असं वाटतं छंद म्हणजे आपल्याला एखाद्या विषयाबद्दल वाटलेलं कुतूहल. या कुतूहलापोटी आपण ती गोष्ट करत राहतो. माझ्या आयुष्यात अशा असंख्य गोष्टी आहेत. मी एम्ब्रॉयडरी करते, मला शेतीबद्दल कुतूहल आणि उत्सुकता आहे आणि कदाचित शेतीतूनच मला एक छंद जडलेला आहे. तो म्हणजे कंपोस्टिंग.

खरंतर कोरोनाच्या काळात भाताची पेरणी कशी करायची, त्याची निगा कशी राखायची, त्यासाठी काय खतं वापरतात, त्याविषयी मी माहिती घेत होते. मी ओळखीच्या काही शेतकऱ्यांना विचारलं, भाजीपाला पिकवणाऱ्या लोकांना विचारलं. त्यातूनच मला असं जाणवलं, की ओल्या कचऱ्याचं खत अतिशय उपयुक्त आहे. याबद्दलची माहिती घेतल्यानं मला माझ्या या छंदामागची प्रेरणा खऱ्या अर्थाने मिळाली आणि मी जोमानं छंद जोपासू लागले.

माझ्या तळेगावच्या घरी मी अगदी लहानपणापासून आईला कंपोस्टिंग करताना पाहिलं आहे; पण तरीही मला आईनं कधी सांगितलं नाही, की तूही हे सगळं करायला हवं. मात्र, मी लहानपणापासून या गोष्टीचं निरीक्षण करत होते. त्यामुळे मलाही वाटलं, की माझ्या मुंबईच्या घरातसुद्धा एवढा ओला कचरा निघतो, मी त्याचं काहीतरी करूच शकते.

‘डेली डंप’ नावाच्या कंपोस्टिंगचं काम करणाऱ्या संस्थेच्या मदतीनं या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. लोकांना भीती असते, की ओल्या कचऱ्याचा वास येईल किंवा उंदीर, घुशी येतील; पण तसं काहीच नाही. पूर्वी माझ्याकडे फक्त एक पोतं होतं. या पोत्यात मी कंपोस्टिंग करायला सुरुवात केली आणि नंतर ‘डेली डंप’चं कंपोस्टर आणून कंपोस्टिंग करू लागले आणि आता गाडी रुळावर आली आहे.

आपण जे खातो त्या कोणत्याही गोष्टीला कचरा म्हणता येणार नाही. केळी आपण खातो आणि सालं लगेच कचऱ्यात टाकतो. त्याला कचरा म्हणतो, ही खरंतर खूपच विनोदी गोष्ट आहे; पण हा ओला कचरा जेव्हा खतामध्ये रूपांतरित होतो, ते अनुभवणं खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे.

आत्ता माझ्या घरात आंब्याच्या साली, कोथिंबिरीचे देठ, कांद्याची टरफलं, माशांचे काटे असा जो ओला कचरा निघतो, तो सगळा मी कंपोस्टरमध्ये टाकते आणि एका महिन्यानंतर त्याची काळीशार माती तयार होते. माती म्हणजे एक प्रकारे खतच म्हणता येईल. माझ्या मुंबईच्या घरात जेवढी झाडं आहेत, त्या सर्वांमध्ये मी हेच कंपोस्ट टाकते. ते पाहताना मला खूप आनंद मिळतो.

कधी कधी या कंपोस्टमध्ये मी भोपळ्याच्या बिया वगैरे टाकते आणि त्या बियांमधून नवीन झाडं उगवतात. त्यामुळे मी लावलेल्या काही मोजक्या झाडांपेक्षा काहीतरी जास्तच मला मिळत राहतं. म्हणजे कधी मिरच्या, कधी टोमॅटो मिळतो. कंपोस्टिंगच्या माध्यमातून अशा असंख्य गोष्टी मला मिळतात. आपण काहीतरी करतो आणि त्यातून आपल्याला असं काहीतरी निर्माण करता येतं, ही भावना खूप सुखावणारी आहे.

असंच जंगलात, निसर्गात सातत्यानं होतंच असतं. त्यामुळे याच माध्यमातून माझं निसर्गाशी एक नातं जोडलं जात आहे. माझ्या या छंदात माझा एक ब्रॅडली नावाचा पार्टनर आहे, तोही मला मदत करत असतो. तो या विषयात पीएचडी करत आहे. त्याच्या संशोधनामुळे आम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतो. कोरोना काळात आम्ही तळेगावच्या भाजी मंडईत जायचो आणि उरलेली भाजी, भाज्यांचा ओला कचरा घेऊन घरी यायचो आणि त्याचं खत करायचो.

त्याच्या या आवडीमुळे माझ्या छंदाला आणखी चांगला पाठिंबा मिळाला. असेच प्रयोग आता आम्ही आमच्या मुंबईच्याही घरात करतो. सगळ्या कचऱ्याचं खत करतो. आमचे अनेक मित्र-मैत्रिणी आमच्याकडून हे खत मागवतात. आपल्या घरात साचलेल्या कचऱ्यातून अशी काहीतरी नवनिर्मिती होते, हे पाहून मन खूप सुखावतं.

(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.