Irani Chai News चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, हो की नाही मंडळींनो. चहाचा केवळ उल्लेख जरी केला तरी सर्व थकवा कुठच्या कुठे दूर होतो. मग ब्लॅक टी असो किंवा लेमन टी. एखाद्या रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डमधून चहाचा समावेश नसेल, असे कधीच पाहायला मिळणार नाही.
आपल्या देशात बहुतांश लोकांची दिवसाची व संध्याकाळची सुरुवात एक कप चहानेच होते. एकवेळ नाश्ता नसला तरी चालेल पण दोन घोट चहा पोटात जाणे गरजेचं असते भाऊ. आता तर चहामध्येही वेगवेगळ्या प्रकारांचा आस्वाद चहाप्रेमींना घेता येतोय.
चहाचा प्रत्येक घोट चवीचवीने रिचवणारे लाखो चहाप्रेमी जगभरात सापडतील. चहाप्रेमींनो आजवर आपण आल्याचा चहा, हर्बल चहा, वेलचीचा चहा, पुदिन्याचा चहा, मटका चहा, हिरवा चहा प्यायले असाल. पण तुम्ही कधी ‘इराणी चहा’ किंवा ‘ हैदराबादी दम चहा’ प्यायले आहात का?
हा चहा म्हणजे दुधाच्या चहाचे एक वेगळे आणि मलईदार मिश्रण आहे. १९व्या शतकामध्ये पारसी प्रवाशांनी भारताच्या उपमहाद्वीप भागामध्ये या चहाची ओळख चहाप्रेमींना करून दिली.
दूध, मसाले, चहा पावडर ही सर्व सामग्री व्यवस्थित प्रमाणात एकत्रित करून एक सुपर रीच, किंचितसा गोड असा हा चहा तयार केला जातो. या चहाच्या सेवनाने संपूर्ण दिवस प्रसन्न व उत्साहपूर्ण असा जातो.
यातील मलईदार घटक चहाची चव अधिकच वाढवतात. अनोख्या पद्धतीने तयार करण्यात येत असलेला हा चहा मलई व अन्य घटकांमुळे जगप्रसिद्ध आहे. इतकंच नव्हे तर या चहाच्या रेसिपीमध्ये माव्याचाही समावेश केला जातो. काही तास दूध उकळून हा चहा एका विशिष्ट पद्धतीने तयार केला जातो. या प्रक्रियेमुळे चहामध्ये मलईचा थर तयार होतो.
इराणी चहाची रेसिपी
हा दम चहा तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये चार कप पाणी घ्या. यानंतर पाण्यात चहा पावडर, कुटलेली वेलची आणि तुम्हाला हवी असल्यास आवश्यकतेनुसार साखर घालावी व चहा उकळत ठेवावा.
हवे असल्यास आपण चहामध्ये दालचिनीची वाटलेली पावडर देखील मिक्स करू शकता. चहाच्या पातल्यास अॅल्युमिनिअम फॉईल लावावे किंवा घट्ट झाकण ठेवावे. जवळपास ३० मिनिटे चहा उकळावा.
चहा फक्कड तयार व्हावा, यासाठी आपण पातल्याच्या कडेवर कणिक देखील लावू शकता. दम बिर्याणी तयार करताना ज्याप्रकारे पातल्याच्या कडेला कणिक लावून झाकण घट्ट बसवले जाते, त्याच पद्धतीने चहाच्या पातल्याचे झाकणही घट्ट बसवावे.
आता दुसऱ्या भांड्यामध्ये दूध, कंडेंस्ड मिल्क आणि क्रीम एकत्रित घेऊन सामग्री एकजीव करावी. जवळपास १५ ते २० मिनिटे मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर उकळावे. हे मिश्रण चमच्याने ढवळत राहावे. मिश्रण तयार झाल्यानं गॅस बंद करावा. आता कपमध्ये चहा गाळावा आणि त्यावर तयार केलेले दुधाचे मिश्रणही ओतावा व चहा सर्व्ह करावा.
इराणी चहा पिण्याचे फायदे
इराणी चहा प्यायल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
हृदयाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.
इराणी चहा हाडांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.
शारीरिक जखम किंवा दुखापत झाली असल्यास, हा चहा प्यावा; यामुळे आराम मिळतो.
इराणी चहा प्यायल्याने सनबर्न देखील कमी होण्यास मदत मिळते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.