Solapur : सोलापुरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील हेमा गिरीश गोसकी यांनी आईच्या आग्रहाखातर जिद्दीने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आज स्वतःच्या हिमतीवर आठ वर्षांपासून ब्युटीशियन म्हणून काम करत असून विडी घरकुल परिसरात करिश्मा ब्युटी पार्लर नावाने त्यांची आस्थापना प्रसिद्ध आहे.
हेमा यांनी ब्युटीशियन होण्याचा कधीच विचार केला नव्हता. २०११ साली गिरीश गोसकी यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर आयुष्यच बदललं. पतीच्या मदतीने फक्त ३० हजार रुपयांची गुंतवणूक करून २०१६ करिश्मा ब्युटी पार्लरची सुरवात केली. आज याच व्यवसायातून त्या मोठी उलाढाल करत आहेत.
हेमा यांच्या लग्नापूर्वी आई वडील चार बहिणी असा त्यांचा परिवार होता. आईचे शिक्षण झाले नसल्याने त्यांची जिद्द होती की त्यांच्या चारही मुलींचे शिक्षण व्हावे, म्हणून त्यांनी मुलींना नेहमी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. मात्र परिस्थिती नसताना देखील हार न मानता हेमा यांनी दहावी नंतर इलेक्ट्रॉनिक आय टी. आय. घेण्याचे ठरवले. परंतु एक मुलगी दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करणार का? असे अनेक प्रश्नांनी नातेवाईक, शेजाऱ्यांनी उपस्थित केल्याने प्रवेश रद्द करून ड्रेस मेकिंगचे शिक्षण पूर्ण केले.
अवघे १७ वर्षे वय असतानाच कपड्याच्या कारखान्यात कामाला सुरवात केली. वयाच्या विसाव्या वर्षीच लग्न झाले. त्यानंतर पतीच्या सहकार्यामुळे ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेतले. नंतर ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण ज्यांच्याकडून घेतले त्यांचेच पार्लरच चालवण्यासाठी घेतले. ३० हजारांची गुंतवणूक करून व्यवसायाला सुरवात केली. आज विडी घरकुल परिसरात त्यांचे पार्लर प्रसिद्ध आहे.
प्रत्येक मुलीने आणि महिलेने काम केले पाहिजे. गरज असेल तेव्हाच कमवावे, असे नाही. त्याऐवजी स्वतःची ओळख आणि आत्मविश्वासासाठी स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे. त्यामुळे ज्या गोष्टीत रस आहे, ते सहज करू शकता.
- हेमा गिरीश गोसकी, ब्युटीशियन