स्नेहा वेद, आहारतज्ज्ञ
Monsoon Care Tips: पावसाळा आला की वातावरण आल्हाददायक होते. फिरायला जाण्यासाठी मजा तर येते. पण, सोबत एक चिंता असते, ती रोग प्रतिकारशक्ती कमी असेल तर सर्दी, पडसे, खोकला, डेंगी, मलेरिया असे आजार होण्याची. पण, पावसाळ्यात योग्य आहार घेऊन रोग प्रतिकारशक्ती वाढवली आणि काळजी घेतली तर पावसाळा एन्जॉय करत आपण जगू शकतो. त्यासाठी आहारात असे जीवनसत्वे पाहिजे, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
अ-जीवनसत्त्व हे शरीराला लागणारे एक अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी, केसांची गुणवत्ता वाढवण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी आपल्या शरीरात योग्य प्रमाणात अ-जीवनसत्त्व असणे खूप गरजेचे आहे. अ-जीवनसत्त्व असणारे पदार्थ-गाजर, बीट, सफरचंद, मेथी, पालक, आळूची पान, शेवग्याच्या शेंगा, शेवग्याची पाने, पपई, अंडी, तूप, गायीचे दूध, दही, आंबा, टोमॅटो, जर्दाळू, मसूर डाळ, यापैकी एक पदार्थ रोज आहारात ठेवून आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करू शकतो.
सी-जीवनसत्त्व हे पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्त्व आहे. ज्याला एस्कॉर्बिक ॲसिड देखील म्हणतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. जखमा लवकर भरून निघण्यास व संसर्ग वाढू नये, जखमांनी आलेले चट्टे कमी करण्यास हे जीवनसत्त्व मदत करते. आहारात योग्य प्रमाणात जीवनसत्त्व सी असल्यास सर्दी, पडसे, खोकला होण्यापासून आपण वाचू शकतो. जीवनसत्त्व सीमध्ये बाहेरील विषाणू, जीवाणूंशी लढणाऱ्या पेशींना उत्तेजित करण्याची क्षमता असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. लिंबू, आवळा, कोथिंबीर, संत्री, मोसंबी, पपई, पेरू, लाल माठ, मटार, सीताफळ, टरबूज, शिमला मिरची, मिरची, पुदिना, हिरव्या पालेभाज्या, हिरवे टोमॅटो, मुळ्याची पाने, गाजराची पाने, पत्ताकोबी, नारळाचे दूध, आंबवलेले पदार्थ, लोणचे, दही. (या पदार्थांमध्ये भरपूर जीवनसत्त्व सी असते, पण खूप वेळेस धुतल्यास व जास्त शिजवून, ते शिळे करून खाल्यास जीवनसत्त्व सी मिळत नाही.)
बाहेरचे उघड्यावरचे खाल्ल्यानंतर पोटात गडबड होऊन हगवण, अन्न बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छता, ताजे अन्नच खावे; अन्यथा घरचे जेवणच करावे. पावसाळ्यात भाज्या दोन ते तीन वेळेस धुवून व शिजवूनच खाव्यात.
पोट साफ राहण्यासाठी दोन ते अडीच लिटर पिणे. सोबत तुळीशीचा काढा किंवा तुळस-आले घालून चहा घ्यावा. खूप आंबट फळ खाणे टाळावे.
मोड आलेले कडधान्य आणि भाज्या कच्च्या खाण्याऐवजी त्या शिजवून खाव्यात. तिखट मसालेदार खाऊ नये. त्यामुळे पोट बिघडू शकते.
डोके दुखणे, सायनसमुळे नाक बंद होणे, असा त्रास होत असेल तर पत्ताकोबीची तीन ते चार पाने पाण्यात घालून त्याची वाफ घेतल्याने लवकर फरक पडतो.
कडुलिंब, कारले, हळद, मेथी दाणा याचा समावेश आहारात केल्यास इन्फेक्शन लवकर होत नाही. झाले तरी लवकर आराम मिळतो.
पाणी उकळून पिल्यास पाण्यातून पसरणारे आजार होणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.