नातीगोती : कुटुंबाला वेळ द्या!

कुटुंबव्यवस्था ही प्रेम, विश्वास आणि एकजुटीवर अवलंबून असते; कारण हेच कुठल्याही कुटुंबाचे आधारस्तंभ असतात.
Relations
RelationsSakal
Updated on

- इशिता गांगुली

कुटुंबव्यवस्था ही प्रेम, विश्वास आणि एकजुटीवर अवलंबून असते; कारण हेच कुठल्याही कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. आपलं आपल्या कुटुंबावर प्रेम असतं आणि एकमेकांवर विश्वास असतो. त्यामुळेच आपल्यातील एकजूट बनून राहते.

मी माझ्या घरी सगळ्यांच्याच खूप जवळ आहे. माझे बाबा, आई, भाऊ आणि माझी वहिनीसुद्धा; पण कोणी एक व्यक्ती विचाराल, तर मी माझ्या आईच्या सर्वांत जास्त जवळ आहे. मला वाटतं, आज तिच्याचमुळे मी अभिनय क्षेत्रात आहे. कारण, तिनं माझ्यासाठी खूप त्याग केला आणि त्याचा हिशेब मी मांडूच शकत नाही. तिनं नेहमीच आयुष्याच्या चढउतारांवर मला प्रोत्साहन दिलं. माझ्या आईचा सर्वोत्तम गुण म्हणजे मला वाटतं दिवसभराच्या थकव्यानंतरही मला शांत आणि उत्साही कसं ठेवायचं, हे तिला बरोबर जमतं.

गणरायाचं आगमन होणार होतं, त्या दिवशी मी चित्रीकरणात व्यग्र होते आणि गणपतीबाप्पांची भक्त असूनही मला मूर्ती घरी आणायला वेळ मिळाला नाही. तेव्हा आई आणि भावानं बाप्पांना घरी आणलं आणि मला सरप्राईज दिलं. ते मला ओळखतात आणि मी न बोलून दाखवताही माझ्या मनातील इच्छा पूर्ण करतात.

माझ्या कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रामाणिकपणा, जो आमचा एकमेकांसाठी आहे. आम्ही एकमेकांसमोर अगदी मोकळे आहोत आणि मला वाटतं प्रत्येक नात्यामध्ये ते महत्त्वाचं असतं. अनेक वर्षं एकमेकांपासून दूर राहूनही आमचं प्रेम कधी कमी झालेलं नाही. आम्ही दररोज एकमेकांशी बोलतो आणि माझ्या मते आपलं कुटुंब हे आपल्या आयुष्याचा सर्वोत्तम भाग आहे. ते आपल्याला सर्वोत्तम सल्ला देतात, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील ताण हाताळण्यासाठी मदत होते.

मी सध्या ‘झी टीव्ही’वरील ‘मैत्री’ मालिकेत झुमकीची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणात मी व्यग्र असते. मात्र, आम्ही सगळे एकत्र येतो, तेव्हा आम्ही खूप गप्पा मारतो. एकमेकांची मतं जाणून घेतो आणि एकमेकांना आपापल्या आयुष्याबद्दल अपडेट देतो. मी, भाऊ आणि वहिनी अनेकदा बाहेर शॉपिंगला जातो. ते माझ्या वडिलांसोबत कोलकात्याला राहतात आणि माझी आई माझ्यासोबत मुंबईत राहते.

आम्हाला अगदी नियमितपणे भेटता येत नाही; पण दरवर्षी दुर्गापूजा आणि दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आम्ही एकत्र येतो. अनेकदा ग्रुप व्हिडिओ कॉल्स करतो आणि एकमेकांच्या आयुष्याबद्दल सांगतो, तर काही वेळा सुटीचं नियोजन करतो, ज्यामुळे आम्हाला एकमेकांसाठी वेळ देता येईल.

लहानपणापासूनच मी माझ्या कुटुंबासोबतच राहिले आणि मला वाटतं मला प्रोत्साहन द्यायला आणि कुठल्याही परिस्थितीत मला मदत करायला तेच असतात. काहीही झालं, तरी मला सुरक्षित आणि आरामदायी वाटावं याची काळजी त्यांनी घेतली आहे आणि त्यामुळेच लहानपणापासूनच मला माझ्या कुटुंबाचं महत्त्व समजलं आहे आणि त्यात जराही बदल झालेला नाही.

माझ्या मते कुठल्याही नात्यासाठी एकमेकांशी संवाद साधणं खूप महत्त्वाचं आहे, मग ते मित्र असोत किंवा कुटुंब, कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्यांवर चर्चा करत नाही, तर मग तुम्हाला समाधान कसे मिळणार? माझ्या घरातल्या सगळ्यांसोबत मी खूप पारदर्शक आणि खरं बोलणारी आहे आणि मला वाटतं त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत नाहीत आणि गैरसमज होत नाहीत. तसंच मी मुद्दाम वेळ काढून त्यांच्याशी संवाद साधते आणि त्यामुळे माझ्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होते.

नाती दृढ होण्यासाठी...

  • एकमेकांशी खोटं बोलू नये. कारण आपण खरे असतो, तेव्हा त्याची आपल्या कुटुंबातील किंवा अन्य कुठलीही नाती दृढ करण्यास मदत होते.

  • कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं एकमेकांसाठी थोडा का होईना वेळ मुद्दाम काढायला हवा.

  • कुटुंबात भांडण होतं; पण लवकरात लवकर त्या व्यक्तीशी असलेला वाद मिटवावा, म्हणजे गैरसमज होत नाही.

  • नेहमी सकारात्मक राहा आणि आपल्या कुटुंबीयांमध्ये आनंद पसरवा.

  • सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही कौटुंबिक नातं घट्ट करण्यासाठी प्रेम सर्वांत महत्त्वाचं आहे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.