श्री राम, परशुराम, नृसिह अवतार आणि श्री कृष्ण अवतार हे सर्व एकच आहेत ते म्हणजे भगवान विष्णू. भगवान विष्णू हे त्रिमूर्तीपैकी एक आहेत. सृष्टीच्या योजनेनुसार, ते विश्वाच्या निर्मितीनंतर, त्याचे विघटन होईपर्यंत त्याचे रक्षण करतात. भगवान विष्णूच्या दहा अवतारांना एकत्रितपणे 'दशावतार' असे म्हणतात. भगवान विष्णूंनी दहा अवतार घेतले. त्यापैकी श्री कृष्ण अवतार ही एक आहे.
श्री कृष्ण हे विष्णूंचे मनमोहक रूप. नेहमी जनकल्याणाचा विचार करून वेळोवेळी भक्तांसाठी धाऊन येणाऱ्या श्री विष्णूंनी कृष्ण अवतारही दानवांचा वध करून भक्तांना सुखी करण्यासाठीच घेतला. याची नक्की कथा काय आहे पाहुयात.
रामावतार संपल्यावर व कृष्णावतार होण्याअगोदर पृथ्वीवर पुन्हा राक्षस (अनीती) उत्पन्न होऊन ते सर्वांना त्रास देऊ लागले. बाणासुर, भौमासुर, कंस, चाणूर, मुष्टिक, शिशुपाल, वक्रदंत, जरासंध, कालयवन इत्यादी राक्षसांची साऱ्यांना पीडा होऊ लागली.
गाई- ब्राह्मणांस कोठे थारा राहिला नाही. ऋर्षीचे तप, अनुष्ठान चालेनात. जरासंधाने तर बावीस हजार राजांचा पराभव करून त्यांना कैदेत ठेवले. नीतिमत्ता आणि सदाचाराची गळचेपी होऊन पापांची प्रचंड रास झाली. ती इतकी की पृथ्वीला तो भार सहन होईना. कोणत्याही गोष्टीला एक सीमा असते. तिचं उल्लंघन झालं की विस्फोट ठरलेलाच असतो, त्याप्रमाणे पृथ्वीने गाईचे रूप घेऊन ती ब्रह्मदेवाच्या द्वारी जाऊन मोठ्याने आक्रोश करू लागली.
"मला ह्या असह्य पापातून वाचवा" म्हणून टाहो फोडू लागली. तिचा आक्रोश इतका सात्त्विक होता की तो ऐकून ऋषींनी पण आपापली गाऱ्हाणी ब्रह्मदेवाजवळ कथन केली. एवढेच नव्हे तर देवेंद्रसुद्धा सर्व देवतांसहित ब्रह्मदेवांपाशी आला आणि राक्षसांचे कुकर्म सांगू लागले. हा सारा हलकल्लोळ पाहून ब्रह्मदेवास मोठा विस्मय वाटला. ब्रह्मदेवाने साऱ्या जमलेल्यांना सांगितले की माझा जनकपिता परमात्मा क्षीरसागरी आहे. त्याच्याकडे गेल्यावाचून यातून मार्ग निघणार नाही.
ब्रह्मदेवासहित सारे क्षीरसागराकाठी आले आणि शेषशायी भगवानांचे गुण गाऊ लागले. साऱ्यांनी नम्र भावनेने हात जोडले आणि भगवंतास म्हणाले, "देवाधिदेवा, तुमच्या साह्यावाचून आमची राक्षसांच्या तावडीतून सुटका होणार नाही. तेव्हा आपण कृपावंत व्हावे"
क्षीरसागरी शेषशायी भगवंताचे सभोवार एवढे तेज आहे की त्या तेजामुळे भगवंताचे खरे स्वरूप कोणास अवगत नव्हते. पण ब्रह्मदेवांचा जन्म त्यांच्या नाभिकमलापासून झाला असल्यामुळे ब्रह्मदेवांना त्यांचे स्वरूप माहीत होते. तरीसुद्धा साऱ्यांनी कळकळीने केलेली प्रार्थना वाया गेली नाही.
अंतरिक्षातून धीरगंभीर ध्वनी निघाला, सर्वांनी जिवाचे कान केले, "मी यादवकुळात जन्म घेऊन दुष्टांचा संहार करीन. तुम्ही सर्व देवांनी यादवकुळात जन्मास यावे. उपदेवांनी गोकुळात गोपाळ व्हावे. ऋषींनी गाई-वासरे व्हावे. मी त्यांचा उद्धार करीन. यमधर्म, वायू, इंद्र व दोन अश्विनीदेव यांनी पंडुराजाच्या भार्या कुंती आणि माद्री यांच्या पोटी जन्म घ्यावा.
देवगुरू बृहस्पती यांनी द्रोणाचार्य होऊन पांडवांना विद्यादान करावे. अग्नीने धृष्टद्युम्न होऊन पांचाळ राजाच्या यज्ञात यावे. शंकराच्या पार्वतीने द्रौपदी व्हावे. लक्ष्मीने वैदर्भ देशाच्या भीष्मक राजाच्या पोटी रुक्मिणी व्हावे. शेषाने वसुदेव पत्नी रोहिणी हिच्या पोटी जन्म घ्यावा व मी वसुदेवाची दुसरी पत्नी देवकी हिच्या पोटी जन्म घेऊन तुमचे कार्य करीन. चिंता करू नका."
अंतराळातील तो पवित्र ध्वनी विरला आणि इतका वेळ पर्वताप्रमाणे अचल उमे राहिलेले देवादिक, ऋषींमध्ये एकदम चैतन्याची लाट उसळली आणि सारे जण अत्यानंदाने नाचू लागले, भगवंताचा जयजयकार करू लागले. त्या धुंदीतच सारे आपापल्या स्थळी निघून गेले.
'परमेश्वर अवतार घेणार आहे', या मोठ्या गोड आशेवर सारे जण राक्षसांच्या उत्पाताला धीराने तोंड देत आहेत. किंबहुना भगवंताच्या आश्वासनामुळे त्यांच्यात संकटांना तोंड देण्याची एक अधिकची स्फूर्ती, शक्ती संचारली आहे म्हणा ना!
काहीही झाले तरी काळ्याकुट्ट रात्रीनंतर पहाट ही होणारच ही आशेची उर्जा तुमच्याकडून तुमच्या मूळ ताकदीपेक्षा कितीतरी पटीने कार्य करून घेत असते, याची तुम्हांला स्वतःलासुद्धा कल्पना येत नाही. हा अंधार संपणार आहे, पहाट नक्की होणार आहे, ह्या एका आशेवर तुम्ही तगून असता. हे आशेचं बळ तुम्हांला ऊर्जा पुरवत असतं.
मथुरेचा राजा कंसाने आपली बहीण देवकी हिचे लग्न मोठ्या थाटामाटात केले आणि लग्नाचे सर्व विधी आनंदाने पार पाडले. जेव्हा आपल्या बहिणीला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा कंसाने देवकी आणि वासुदेव यांना रथात बसवले आणि स्वतः रथ चालवू लागला. तेवढ्यात अचानक आकाशातून आवाज आला की देवकीचा आठवा मुलगा कंसाचा काळ असेल. कंसाचा अत्याचार संपवण्यासाठी कृष्णाचा जन्म झाला –
कंसाने आकाशवाणी ऐकताच कंस आपल्या बहिणीला मारणार होता, तेव्हा वासुदेवने त्याला समजावले आणि सांगितले की त्याला त्याची बहीण देवकीची भीती नाही. देवकीच्या आठव्या अपत्याची भीती आहे. म्हणून तो आपल्या आठव्या अपत्याला कंसाच्या स्वाधीन करेल. कंसाने वासुदेवाची विनंती मान्य केली, पण त्याने देवकी आणि वासुदेवांना तुरुंगात डांबले.
उजाला जेव्हा जेव्हा देवकीला मूल होते तेव्हा कंसाने एक एक करून देवकीच्या सर्व मुलांना मारले. यानंतर भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान विष्णूंनी रोहिणी नक्षत्रात कृष्णाच्या रूपात जन्म घेतला. श्रीकृष्णाचा जन्म होताच तुरुंगात एक तेजस्वी प्रकाश पसरला. तुरुंगाचे सर्व दरवाजे आपोआप उघडले आणि सर्व सैनिक गाढ झोपेत पडले. भगवान विष्णू वासुदेव आणि देवकीसमोर प्रकट झाले आणि म्हणाले की त्यांचा जन्म कृष्णाच्या रूपात झाला आहे.
विष्णूनी यावेळी वासुदेवजींना गोकुळातील नंद बाबांच्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले आणि आपल्या मुलीला आणून तिला कंसाच्या स्वाधीन करण्यास सांगितले. वसुदेवजींनी कृष्णाजींना यशोदाजींसोबत गोकुळात ठेवले आणि तेथून मुलीला आणून कंसाला दिले. ती मुलगी कृष्णाची योगमाया होती.
कंसाने मुलीला मारण्यासाठी तिला फेकण्याचा प्रयत्न करताच मुलगी त्याच्या हातातून निसटून आकाशात गेली. यानंतर कंसाचा वध करणाऱ्यानेच जन्म घेतल्याचे भाकीत केले. तो गोकुळमध्ये पोहोचला आहे. तेव्हापासून कंसाने अनेक राक्षसांना भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले, पण बालपणीच भगवान श्रीकृष्णाने अनेक लीला निर्माण करून सर्व राक्षसांना मारले. कंसाने कृष्णाला मथुरेला बोलावले तेव्हा तेथे पोहोचल्यावर भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध करून प्रजेला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले.
( संबंधित वृत्तातील काही भाग हा श्रीकृष्ण स्थलयात्रा या सौ.गीता आदिनाथ हरवंदे यांच्या पुस्तकातून घेण्यात आला आहे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.