सुरेल मैत्री

कामानिमित्त आपण अनेक व्यक्तींना भेटत असतो किंवा एकाच क्षेत्रात काम करत असल्याने आपल्या अनेकांशी ओळखी असतात; पण बऱ्याचदा ती ओळख एवढी घट्ट होते.
kartiki gaikwad and mrunmayee deshpande friendship
kartiki gaikwad and mrunmayee deshpande friendshipsakal
Updated on

- कार्तिकी गायकवाड / मृण्मयी देशपांडे

कामानिमित्त आपण अनेक व्यक्तींना भेटत असतो किंवा एकाच क्षेत्रात काम करत असल्याने आपल्या अनेकांशी ओळखी असतात; पण बऱ्याचदा ती ओळख एवढी घट्ट होते, की समोरची व्यक्ती आपली जिवाभावची मैत्रीण होऊन जाते. मराठी मनोरंजनसृष्टीतील याचं एक उदाहरण म्हणजे गायिका कार्तिकी गायकवाड आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे.

या दोघी एकमेकींना प्रत्यक्षात न भेटतासुद्धा एकमेकींना त्यांच्या कर्तृत्वाने ओळखत होत्या; पण त्यांची खऱ्या अर्थाने ओळख झाली ती झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या सेटवर. या रिॲलिटी शोमध्ये कार्तिकी जज होती तर, मृण्मयी सूत्रसंचालक होती. या कार्यक्रमांदरम्यानच त्यांची खूप छान ओळख झाली.

याबद्दल कार्तिकी म्हणाली, ‘मी मृण्मयीला तिच्या ‘कुंकू’ या मालिकेपासून ओळखते. तिची ही मालिका आणि त्यातील तिची व्यक्तिरेखादेखील मला खूप आवडायची. मी तिचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. तिचं काम मला प्रचंड आवडतं. एक अभिनेत्री म्हणून ती उत्तम आहेच; परंतु माणूस म्हणूनही ती खूप चांगली आहे.

एकाच ठिकाणी काम करत असल्यानं आमच्यात बोलणं व्हायचं, तिच्याशी बोलल्यानंतर मला समजलं, की ती एक मनमौजी, बिनधास्त व्यक्तिमत्त्व आहे. तिचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मला प्रचंड भावलं आणि मनापासून वाटलं, की मी हिच्याशी मैत्री करू शकते. तशा माझ्या अनेक मैत्रिणी आहेत; परंतु ज्यांच्याशी मी खूप जास्त कनेक्टेड आहे, अशा फार कमी आहेत. त्यातलीच एक मृण्मयी आहे.’

मृण्मयी सांगत होती, ‘आम्ही एकमेकींना आधीपासूनच ओळखत होतो आणि तिची माझ्या मनात एक इमेज तयार होती; पण आम्ही प्रत्यक्षात भेटलो, तेव्हा माझं असं झालं, की बापरे केवढं छोटं पिल्लू आहे हे. कार्तिकी खूपच जास्त साधी आणि निरागस आहे आणि म्हणूनच सेटवरसुद्धा बऱ्याच वेळा तीच आम्हा सगळ्यांचं सॉफ्ट टार्गेट असायची.

आम्ही सगळ्यांनी तिची एवढ्यावेळा मस्करी केलीये, आणि तिला तेही कळत नसायचं, की आम्ही तिची मस्करी करतोय. ती जितकी शांत आणि निरागस आहे, तेवढीच प्रतिभावंतसुद्धा आहे. ती प्रचंड लाघवी मुलगी आहे. आमच्यातली मैत्री जपण्याचं काम तिनं खूप जास्त केलंय.’’

कार्तिकीनं एक आठवण सांगितली, ‘या शोच्या दरम्यानच एकदा रात्री खूप उशिरा आमचं शूटिंग संपलं आणि मला पुण्याला यायचं होतं. त्यावेळी मृण्मयीलादेखील पुण्याला यायचं होतं, तर ती मला म्हणाली, ‘कार्तिकी आपण एकत्रच जाऊ.’ तिच्याकडे फॉर्चुनर कार होती. त्या कारनंच आम्ही गेलो.

तेव्हा मी तिला ड्रायव्हिंग करताना पहिलं. तिची ही क्वालिटीसुद्धा मला खूप जास्त आवडली. मी थोडीशी लाजरी आहे; पण तिला पाहते तेव्हा मलाही असं वाटतं, की मीही मृण्मयीसारखं कॉन्फिडंटली गाडी चालवू शकते. त्या प्रवासादरम्यान आम्ही खूप गप्पा मारल्या. तो मुंबई - पुणे प्रवास माझ्या कायमच लक्षात राहील.’

‘मृण्मयी उत्तम अभिनेत्री आहेच; पण ती खूप सुंदर गातेदेखील. ती डान्स छान करते आणि ती एक चांगली अँकरही आहे आणि म्हणूनच ती एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. या रिॲलिटी शोमध्ये अनेक लहान मुलांचा सहभाग होता. तिचं त्यांच्यासोबतचं कनेक्शनही खूप छान होतं. आम्हीप ‘सारेगमप’च्या पहिल्या पर्वात सहभागी झालेलो, त्यावेळी आम्हीही लहान होतो आणि पल्लवीताई म्हणजेच पल्लवी जोशी, जशी आमची काळजी घ्यायची अगदी तसंच मृण्मयीचंसुद्धा त्या लहान मुलांसोबत नातं होतं,’ असं कार्तिकी म्हणाली.

मृण्मयी म्हणाली, ‘ज्या क्षेत्रात आम्ही काम करतोय, तिथं माणसांमध्ये एवढा इनोसन्स नाही राहत; पण कार्तिकीच्या बाबतीत तसं नाहीये. ती मुळातच खूप निरागस आहे आणि तिचं हे स्वभाववैशिष्ट्य मला प्रत्येक वेळी भावतं. तिची मला आवडणारी दुसरी गोष्ट म्हणजे, ती प्रचंड हौशी आहे. तिला फार आवडतं नटायला-सजायला वगैरे आणि या बाबतीत मी अगदी तिच्या विरुद्ध आहे.

म्हणजे शोजमध्ये वगैरे मस्त नटून असते मी; पण इतरवेळी मी लंकेची पार्वती असते. अशा वेळी मी तिला पाहते, तेव्हा माझ्याही मनात येऊन जातं असं नटावं वगैरे; पण ते माझ्या स्वभावातच नसल्यानं मी लंकेची पार्वतीच बरी. कार्तिकी खरंच खूप चांगली आहे आणि तिच्यासोबतची माझी मैत्रीही खूप खास आहे...’

(शब्दांकन : मयुरी गावडे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.