सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून कोल्हापूर आता महापुराच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याजवळ ४४ फूट पाणी पातळी असून ती वाढत चालली आहे. कोल्हापुरातील सखल भागात पुराचे पाणी पसरले आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहीला तर २०१९ आणि २१ सारखी परिस्थिती उद्भवेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोल्हापुरचा पूर मोजण्यासाठी एक मोजमाप ठरवलं गेलं आहे. हे कोल्हापुरातल्या शिवाजी पुलानेच ठरवले आहे. कोल्हापुरात पाणी किती वाढलं किती फुटावर आहे यापेक्षा कोल्हापुरात मच्छिंद्री झाली की महापूर येणार हे फिक्स आहे.
कोल्हापुरात पूर येणं काही नवं नाही. कोल्हापुरकरांना राधानगरीचे किती दरवाजे उघडले आणि मच्छिंद्री झाली का? इतकाच प्रश्न पावसात पडलेला असतो. कारण, मच्छिंद्री झाली की पूर येतो अन् पुराच्या पाण्याने मच्छिंद्रीलाच गिळंकृत केलं तर महापूर येतो असे समजले जाते.
ब्रिटीश काळात बांधलेल्या पुलावर नदीचा महापूर मोजण्याचे एक हे एक पारंपारिक मापक होतं. त्यामुळे कोल्हापुरात महापूर आलाय, पाणी किती वाढले यापेक्षा मच्छिंद्री झाली का अशी चर्चा गेल्या दोन-तीन दिवसात सर्वांच्याच तोंडी आहे. 2019 ला जेव्हा महापूर आला तेव्हाही ही मच्छिंद्री बुडून गेली होती. 21 ला ही तीच परिस्थिती होती. त्यामुळे आता महापुराने मच्छिंद्रिलाच गिळले आहे असे म्हणावे लागेल.
पावसाळ्यात कोल्हापुरात सर्वांच्याच तोंडात मच्छिंद्री हा शब्द असतो. मच्छिंद्री म्हणजे पंचगंगेच्या पाण्याची उच्च पातळी मोजण्याचे मोजमाप होय. पंचगंगा नदीवर १८८७ मध्ये शिवाजी पूल बांधला गेला. तत्कालिन ब्रिटीश अधिकाऱ्यांनीच त्याचे बांधकाम केले. सध्या पंचगंगा नदीवर नवा पूल बांधला असून जुन्या पुलाचा वापर बंद करण्यात आला आहे.
शिवाजी पुलाचे जुने बांधकाम हे त्याच्या वास्तुकलेवरूनच लक्षात येते. कारण या पुलाचे खांब हे माशाच्या आकाराचे आहेत. जुन्या शिवाजी पुलाला पाच दगडी पिलर असून ते माशाच्या आकाराचे आहे. या पुलाला पाणी टेकलं की त्याचे खांब पाण्यात बुडतात. म्हणजेच महापुराने मच्छिंद्री गाठली असं म्हटलं जातं.
ज्या वेळेला मच्छिंद्री होते तेव्हा आजुबाजूच्या गावात पुराचं पाणी पसरतं. त्यावेळी असं म्हणतात की, मच्छिंद्रीची उंची जितकी आहे तेवढेच पाणी कोल्हापूर शहरात पसरेल. म्हणजे, मच्छिंद्री आणि शहरातील पाण्याची पातळी समान मानली जाते.
मच्छिंद्री बघायला लोक गर्दी करतात. त्यामुळे कोल्हापुरात महापूर आला की अनेकांची पावले आपोआप पुलाकडे वळतात. तिथे एक छोटी जत्राच भरायची. कोल्हापुरात पुराच्या पाण्याने मच्छिंद्री गाठली म्हणजे आता महापूर येथेच थांबणार. तो वाढणार नाही असं म्हटलं जात होतं.
पण गेल्या काही वर्षात हे चित्र बदलले आहे. महापुराने सीमारेषा तोडून शहरात प्रवेश केला आहे. धुवाधार पावसाने शहरातील दोन मोठे तलाव कळंबा आणि रंकाळा दोन्हीही काटोकाठ भरून ओवरफ्लो होत आहेत.
गेल्या काही वर्षातील कोल्हापुरात पूर येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केवळ मच्छिंद्री झाली म्हणजेच पूर थांबेल असं नाही. तर मच्छिंद्रीला गिळून कोल्हापूरचा पूर डोकं वर काढत आहे. त्यामुळे ही एक आश्चर्याची गोष्टच मानली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.