Wedding Trends : लग्नसराईमध्ये बदलत जाणारे ट्रेंड्स.. मेकअप, फॅशन आणि बरंच काही..!

तरुण पिढी अगदी आवडीने जुन्या-नव्याची सांगड घालत आहे. रॉयल वेडिंगचा ट्रेंड आज कपडे, दागिने, मेकअप, लोकेशन अशा सगळ्याच माध्यमातून बघायला मिळतोय.
Wedding Trends
Wedding Trendsesakal
Updated on

(लेखिका : वैष्णवी वैद्य-मराठे)

Wedding Trends : तरुण पिढी अगदी आवडीने जुन्या-नव्याची सांगड घालत आहे. रॉयल वेडिंगचा ट्रेंड आज कपडे, दागिने, मेकअप, लोकेशन अशा सगळ्याच माध्यमातून बघायला मिळतोय. सध्या लग्नसराई सुरू आहे. काळ बदलला तशा समारंभ साजरा करायच्या पद्धती बदलल्या. सध्याच्या लग्नसमारंभात ‘दिमाखदार’पणा आला आहे. अगदी डेकोरेशनपासून कपड्यांपर्यंत सगळंच राजेशाही थाटात असतं.

पूर्वी फक्त श्रीमंतांचा राजेशाही लग्नाची थाट आता प्रत्येकाची आवड बनला आहे. म्हणून की काय, पण लग्नात पेशवाई थीम सध्या तरुणांमध्ये प्रचलित आहे. त्यासोबतच प्रत्येक समारंभासाठी वेगवेगळे कपडे, दागिने, नाचगाणी अशा गोष्टींची एक बांधणी केली जाते. नवरा-नवरीसह त्यांच्या घरचे, मित्रमंडळी सगळेच आपापली हौस यानिमत्तानं भागवून घेत असतात. या पार्श्वभूमीवर लग्नसराईमधल्या सध्याच्या ट्रेंडचा एक आढावा.

Wedding Trends
Wed in India : 'वेड इन इंडिया' साठी सज्ज झाल्या देशभरातील हॉटेल चेन्स.. हयात, हिल्टन, टाटाने लाँच केले नवे पॅकेजेस!

पोशाखाची फॅशन

आजची तरुण पिढी तुम्ही कसे दिसता, राहता, काय घालता ह्याला प्रचंड महत्त्व देणारी आहे. लग्नाच्या तयारीतील सगळ्यात मोठा घटक म्हणजे कपडे. पूर्वी लग्नाच्या चार साड्या आणि आहेर सोडला, तर कपडे खरेदीवर अजिबातच भर नसायचा. आता तरुण पिढीला हळद, मेंदी, साखरपुडा, लग्न, रिसेप्शन या सगळ्यासाठीच वेगवेगळ्या स्टाइलचे कपडे लागतात. त्यामुळे स्टायलिस्टचा लग्न समारंभात फार मोठा आणि महत्त्वाचा वाटा असतो.

नववधूंना साड्यांमध्येही अनोखे स्टायलिंग आवडते. ड्रेसचे लेहेंगा, गाऊन असे प्रकारही आता साखरपुडा आणि रिसेप्शन लुकसाठी प्रचलित झाले आहेत. कपड्यांची स्टाइल ठरवताना कपड्यांच्या प्रकारासह, कपड्यांचे रंग आणि कापडदेखील अगदी बारकाईने पाहिले जाते.

सध्याच्या पिढीला लाल आणि मरून असे गडद सोडून फिकट, म्हणजेच पेस्टल रंगांचे आकर्षण जास्त आहे. अगदी सिनेतारकांपासून सगळ्याच वधू-वरांना या रंगांचा मोह जडला आहे. गुलाबी, जांभळा, आकाशी निळा, पिवळा, पीच असे रंग दिसायला खरेच मोहक आणि उठावदार दिसतात. ह्या रंगसंगतीत वेगवेगळे पर्याय वापरून स्टायलिस्ट अगदी छान पोशाख तयार करतात.

फॅशन म्हटली की मुलींइतकीच मुलगेसुद्धा उत्साही असतात. मुलांच्या कपड्यांमध्येही भरपूर फॅशन पाहायला मिळतात. हव्या त्या कापडामध्ये आणि हव्या त्या रंगामध्ये मुलांचे कपडे मिळू शकतात. प्रत्येक कार्यक्रमासाठी वधू आणि वराचे कपडे मॅच होतील, यासाठी दोघे आग्रही असतात.

मेकअप आणि केशरचना

आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक दिवसाचे, समारंभाचे कपडे वेगवेगळे असतात. मग कपडे वेगळे असल्यावर निरनिराळा मेकअप आणि त्याला साजेशी केशरचनासुद्धा आलीच. रंग, चेहऱ्याची ठेवण, फीचर आणि स्वतःची आवड यानुसार मेकअप आर्टिस्ट आणि स्वतः वधू-वर प्रचंड मेहनत घेत असतात. डोळ्यांचा मेकअप हा ट्रेंड तरुणींच्या फारच आवडीचा झाला आहे.

मोठमोठे मेकअप आर्टिस्ट आणि स्टायलिस्ट सांगतात, ‘तुमच्या आय मेकअपवर संपूर्ण मेकअपचे सौंदर्य अवलंबून असते. मेकअपमधला आय मेकअप हा एक स्वतंत्र भाग झाला आहे. स्मोकी मेकअप, न्यूड मेकअप, स्पार्कलिंग मेकअप असे विविध प्रकार तुम्ही डोळ्यांच्या आणि त्वचेच्या मेकअपसाठी करू शकता.’

केशरचना हीसुद्धा लग्नातील तयारीचा महत्त्वाचा भाग आहे. तरुणांच्या भाषेत सांगायचे झाले, तर स्वतःच्या लग्नासाठी ट्रेंडी हेअरस्टाइल असणे फार महत्त्वाचे आहे. वधूचे कपडे, मेकअप, केसांची लांबी, चेहऱ्याची ठेवण, शरीरयष्टी, वैयक्तिक आवड या सगळ्याला अनुसरून केशरचना निवडली जाते.

महाराष्ट्रीय लग्नात नऊवारीवर मुलींना खोपा आणि आंबाडाच हवा असतो. रिसेप्शन आणि साखरपुड्याला साडी किंवा लेहेंगा असेल, तर शक्यतो मोकळ्या केसांची स्टाइल केली जाते आणि एक्सटेन्शन्स लावले जातात. मुलांना केशरचनेच्या बाबतीत फारसे कष्ट नसतात, थोडेफार स्टायलिंग केले जाते.

दागिने

दागिने ही मुलींची आणि लग्नसोहळ्यात बायकांची अत्यंत आवडीची गोष्ट आहे. नटण्यामुरडण्यासाठी कुठल्याही वयोगटातील स्त्रीला दागिने हवेच असतात आणि त्यातून जर लग्नसोहळा असेल, तर त्यांच्या उत्साहाला परिसीमा नसतेच. नव्या नवरीसह तिची आई, वरमाई, बहिणी, आत्या, मावशा, काकवा सगळ्याच आपली दागिने मिरवण्याची हौस पुरी करून घेत असतात.

मुलगी कितीही मॉडर्न आणि आधुनिक पिढीची असली तरी तिला जुन्या आणि पारंपरिक दागिन्यांचा मोह जडलेला असतोच. नऊवारीवर त्यांना अगदी पारंपरिक मोत्याचे दागिनेच हवे असतात. हिरे, कुंदन, सोने किंवा अगदी ऑक्सिडाइज्ड, पण पारंपरिक पद्धतीचे दागिनेसुद्धा लग्नसोहळ्यात स्त्रिया मिरवत असतात.

आजकाल हव्या त्या डिझाईनचे, पद्धतीचे दागिने भाड्यानेसुद्धा मिळतात. खर्चाच्या दृष्टीनेसुद्धा ते सर्वांच्या सोयीचे असते. वधू जर लेहेंग्यासारखे हेवी कपडे घालणार असेल तर त्यावर हेवी दागिने अतिशय खुलून दिसतात.

सध्या मुलींचे आवडते दागिने म्हणजे वेगवगेळ्या प्रकारचे आणि डिझाईनचे तन्मणी. हा असा दागिना आहे जो कुठल्याही वयोगटातील स्त्रीला सुरेख दिसतो. आधुनिक आणि परंपरेचे सुंदर मिश्रण असलेले सध्याचे दागिने म्हणजे रोझ गोल्ड ज्वेलरी आणि टेम्पल ज्वेलरी. अगदी सामान्य मुलींपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच ही ज्वेलरी अगदी आवडीने परिधान करतात.

साऊथ इंडियन लुक हवा असेल, तर टेम्पल ज्वेलरी हा उत्कृष्ट पर्याय आहे. तसेच तरुणींना सिल्व्हर आणि गोल्डनपेक्षा रोझ गोल्डचे जास्त आकर्षण आहे. शक्यतो थोड्या इंडो-वेस्टर्न लुकला रोझ गोल्ड रंगाचे दागिने जास्त उठून दिसतात. मुलांच्या दागिन्यांमध्येही बरीच व्हरायटी बघायला मिळते आहे.

तरुणांना लग्नासाठी पेशवाई थाट फारच आवडीचा आहे. त्यामुळे त्या पोशाखावर मोत्याची कंठी, पगडी किंवा फेट्यावर मोत्याचे डिझाईन ट्रेंडमध्ये आहे. इतर पद्धतीच्या लुकवर म्हणजे शेरवानी, सूट, कुर्ता यालाही साजेशी अत्यल्प ज्वेलरी वरांनी परिधान केली तर ती खुलून दिसते.

हळद, मेंदी आणि संगीत समारंभ

काळाप्रमाणे सण आणि समारंभ साजरा करण्याचा पद्धती बदलल्या आहेत. त्यातलाच मोठा बदल म्हणजे लग्नसोहळ्यात होणारे वेगवेगळे समारंभ. आधी आपापल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे हळद आणि फारतर साखरपुडा केला जायचा. परंतु आता सरसकट संपूर्ण लग्नसोहळा साग्रसंगीत म्हणजेच चार-पाच दिवसांचा करायचा असतो. त्यामध्ये संगीत म्हणजेच नववधू-वरासाठी आखलेला छोटेखानी नाचगाण्यांचा कार्यक्रम.

यासाठी कोरिओग्राफर बोलावून डान्स शिकणे आता कॉमन झाले आहे. संगीतमध्ये कोणी गाणी म्हणते, कविता सादर करते, कोणी छानपैकी नृत्य करते. हळदी सोहळ्यात छान फुलांची आरास केली जाते. वधू-वरांसाठी खास सजवलेले आसन असते आणि पिवळा, गुलाबी, केशरी, हिरवा अशा थीमचे कपडे घालून छानसा कार्यक्रम केला जातो.

मेंदी सोहळ्यासाठीही विशिष्ट सजावट, कपडे निवडून कार्यक्रम आखला जातो. वधू आणि वर दोघांसाठीचे हे कार्यक्रम आता वधुपक्ष आणि वरपक्ष मिळून एकत्रच साजरे केले जातात, म्हणजे सगळी मित्रमंडळी, नातेवाईक आनंद लुटू शकतात. पूर्वी आख्खा लग्नसोहळा चार-पाच तासांत होत असे, पण आजची तरुणाई प्रत्येक क्षण मोठा आणि खास बनवू पाहते आहे.

Wedding Trends
Lehenga Tips : संगीत फंक्शनसाठी लेहेंगा खरेदी करण्यापूर्वी फॉलो करा ‘या’ खास टीप्स

सिनेमॅटिक व्हिडिओ

ही अत्यंत आधुनिक आणि खास गोष्ट सध्याचा लग्नसराईमध्ये पाहायला मिळते. पूर्वी संपूर्ण लग्नाची एक व्हिडिओ कॅसेट असायची. फोटोग्राफर एखादाच असायचा. शूटिंगसाठी त्याने एकदा कॅमेरा लावून ठेवला की लग्न सोहळा संपल्यावरच कॅमेरा बंद व्हायचा. पण ही पद्धतदेखील आता बदलली आहे. आता इतकी मोठी कॅसेट नंतर फारसे कोणी पाहत नाही.

त्यामुळे प्रत्येक दिवसाच्या महत्त्वाच्या क्लिप शूट करून, आधुनिक तंत्रज्ञान वापरून चक्क फक्त दहा-पंधरा मिनिटांची छोटेखानी चित्रफीत केली जाते. त्यात आपल्या आवडीची गाणी, फोटो, छोटे व्हिडिओ, आप्तेष्टांचे बाईट असे सगळे काही फोटोग्राफर सामावतात. या पद्धतीमुळे संपूर्ण तीन-चार दिवसांचा सोहळा शूट होतो, जास्त वेळही जात नाही व त्याला आधुनिकतेची झालरही लागते. लग्नांचे मोठमोठाले अल्बम आता मागे पडून सिनेमॅटिक व्हिडिओला जास्त महत्त्व मिळत आहे.

डेस्टिनेशन वेडिंग

सुंदरशा निसर्गरम्य ठिकाणी किंवा एखाद्या दिमाखदार जागी तीन-चार दिवसांचा लग्नसोहळा करण्याची पद्धत रुजते आहे. बहुधा आलिशान रिसॉर्ट किंवा हॉटेलच्या परिसरात अशा पद्धतीचे सोहळे करायला जागा मिळते. तिथे वेगवेगळ्या दिवसांची सजावट, पाहुण्यांसाठी राहण्याची सोय, उत्तम आणि साग्रसंगीत जेवणावळी हे सगळेच करणे सोयीचे ठरते.

शहरांपासून जवळच्या अंतरावर, पण शहरांच्या बाहेर असलेली रिसॉर्ट, आलिशान हॉटेले या सध्या तरुणांच्याच नाही तर सिनेतारकांच्याही आवडीच्या जागा आहेत. येथे लग्नाचे तीन-चार दिवसांचे जेवण, डेकोरेशन, फोटाग्राफर असे सगळे पॅकेजच मिळते.

तुम्हाला हवे तर कपडे स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्टचीसुद्धा अधिक खर्चाने सोय होऊ शकते. ह्या आधुनिक समारंभांवर चित्रपट तारे-तारकांचा प्रभाव जाणवत असतो, तरीही आपापल्या पद्धतीने अगदी साग्रसंगीत सोहळा करता येतो. नातेवाईक, मित्रमंडळी, वधू-वर सगळेच खूश असतात.

आज तरुणाई लग्नाच्या सगळ्याच गोष्टींबाबत अतिशय चुझी आणि पर्टिक्युलर झाली आहे. त्यांचे विचार अगदी थेट आहेत. प्रत्येकालाच वेगळे काहीतरी हवे आहे. आज फॅशन क्षेत्र इतके प्रगल्भ आहे, की प्रत्येकजण आपापली वेगळी स्टाइल करू शकतोय. पूर्वी लग्न म्हटले की विशिष्ट कपडे, रंग, पद्धती प्रचलित होत्या, पण आज तसे राहिलेले नाही. ज्यांचे लग्न असायचे त्या दोघांना फारसे काही

मत नसायचे आणि असले तरी ते फारसे विचारातही घेतले जात नसे. पण आज प्रत्येकाची आपापली एक वेगळी आवड आहे आणि तरुण पिढी ती अगदी बिनधास्त जोपासत आहे. पण म्हणून लग्नातले पावित्र्य कमी झाले आहे का? तर अजिबात नाही! उलट तरुण पिढी अगदी आवडीने जुन्या-नव्याची सांगड घालत आहे. रॉयल वेडिंगचा हा ट्रेंड आज कपडे, दागिने, मेकअप, लोकेशन अशा सगळ्यांमधूनच बघायला मिळतोय.

Wedding Trends
HD Makeup : ब्राईडसाठी परफेक्ट असणारा HD मेकअप काय आहे? याचे प्रमुख प्रकार घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.