जाणून घ्या निसर्गोपचार ! निरामय जीवशैलीचे प्रतीक

जाणून घ्या निसर्गोपचार ! निरामय जीवशैलीचे प्रतीक
जाणून घ्या निसर्गोपचार ! निरामय जीवशैलीचे प्रतीक
जाणून घ्या निसर्गोपचार ! निरामय जीवशैलीचे प्रतीकSakal
Updated on
Summary

सोलापुरात बोरामणी येथील ग्लोबल व्हिलेज या सामाजिक प्रकल्पात निसर्गोपचार केंद्र सुरू होत आहे.

सोलापुरात (Solapur) बोरामणी येथील ग्लोबल व्हिलेज (Globle Village) या सामाजिक प्रकल्पात निसर्गोपचार (Naturopathy) केंद्र सुरू होत आहे. सोलापूरच्या मेडिकल हबमध्ये (Medical Hub) अनेक उपचार पद्धती विकसित झाल्या आहेत. त्यामध्ये अत्यंत दुर्मिळ असलेल्या निसर्गोपचाराची भर पडणार आहे. तर जाणून घेऊया निसर्गोपचार अभ्यासक तथा सोलापूर सिटी हॉस्पिटलचे सीईओ डॉ. व्यंकटेश कुलकर्णी (Dr. Venkatesh Kulkarni) यांच्याकडून या उपचार पद्धतीची तत्त्वे.

निसर्गोपचार पद्धती व्यावहारिक ज्ञानाच्या पायावर उभारलेली आहे. विचार, श्वसन, अन्नग्रहण, पान, पोशाख, काम, विश्रांती, सामाजिक आणि लैंगिक जीवन यापैकी कोणत्याही बाबतीत निसर्ग नियमांचे उल्लंघन केल्यास रोग लक्षणे उद्‌भवतात. निसर्ग नियमांचा भंग, मग तो जाणूनबुजून किंवा नकळत झाल्यासही रोग उद्‌भवतात.

सर्वच रोग निसर्गाने योजिलेल्या शुद्धीचे प्रकार असतात. आधुनिक निसर्गोपचार पद्धतीचे आधारस्तंभ लिंडलार म्हणतात, प्रत्येक तीव्र रोग म्हणजे निसर्गाने स्वच्छता करण्याचा व शरीर पूर्वीच्या सुस्थितीत नेण्याच्या प्रयत्नाचा परिणाम असतो. म्हणून बाह्य लक्षणांचे स्वरूप व गांभीर्य निरनिराळे असले, तरीही या पद्धतीत सर्व रोग एकच, या तत्त्वाचा अंगीकार केला गेलेला आहे. सर्व रोग मग ते साधे पडसे असो किंवा त्वचा उत्स्फोट (पुरळ) असो, अतिसार असो किंवा निरनिराळे ज्वर असोत, निसर्गाचा शरीरातून सूक्ष्मजंतू, व्हायरस वा विषे काढून टाकण्याचाच प्रयत्न असतो.

जाणून घ्या निसर्गोपचार ! निरामय जीवशैलीचे प्रतीक
फिजिओथेरपी आरोग्य टिप्स, आरोग्यदायी जीवनाचा कानमंत्र!

निरामयतेचा नैसर्गिक मार्ग म्हणजे काय?

मानवी शरीराची प्राकृतिक स्थिती निरोगीच असणार व जीवशक्तीचा प्रयत्न ती तशी टिकविण्याकडेच असणार. बाह्य घटकद्रव्ये (आहारादी) आणि परिस्थिती अनुकूल अशी निर्माण झाल्याबरोबर जीवशक्तीचा पुनःस्वास्थ्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होतो व परिणामी रोग नाश होऊन प्रकृतिस्थापन होते, यालाच निरामयतेचा नैसर्गिक मार्ग म्हणतात. निसर्गाच्या प्रक्रियांतील विघटनच अतिशय तीव्र वा गंभीर असतील, जीवनशक्तीच पराकाष्ठेची दुर्बल असेल किंवा प्रथम केलेले उपचार आणि चिकित्साच अपुऱ्या किंवा अहितकारक असतील, तर निसर्गोपचारांना अपयशाचे धनी व्हावे लागते.

स्वबलसंवर्धन हीच निरोगीपणाची गुरुकिल्ली

ज्याप्रमाणे रोग एकच त्याप्रमाणे चिकित्साही एकच. कोणताही रोग बरा करण्याचा एकमेव हमखास उपाय म्हणजे निसर्गाच्या मार्गातील अडथळे दूर करून त्याचा स्वशुद्धीचा मार्ग मोकळा करणे हाच होय. स्वबलसंवर्धन हीच व्यक्तीच्या निरोगीपणाची गुरुकिल्ली होय. तथाकथित आनुवंशिक रोगांमध्येही अनुकूल परिस्थिती व योग्य ती चिकित्सा अर्भकावस्थेतच मिळाल्यास, अर्भकाची पूर्ण वाढ होण्यास कारणीभूत होतात, हे निसर्गोपचारांनी सिद्ध केले आहे. निसर्ग नियम न बदलणारे व अचूक असून त्यांचे विशिष्ट उल्लंघन रोग उत्पन्न करते. वेदना व इतर रोगलक्षणे ही या उल्लंघनामुळे होणारी शिक्षाच असून ती सूचनावजाही असतात.

निसर्गोपचाराच्या कक्षा व उपाय

लंघन, व्यायाम, हवा, पाणी व अन्न यांचाच फक्त उपयोग करणारा निसर्गोपचाराच्या मूळ चिकित्सक पद्धतीचा वापर करणारा चिकित्सकांचा एक वर्ग अजूनही अस्तित्वात आहे; परंतु ज्यांना नवमतवादी म्हणतात त्यांच्या मताप्रमाणे ज्या उपायांनी कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नाहीत, जे उपाय शारीरिक क्रियांचे संयोजक आहेत व ज्यांमध्ये विषारी औषधांचा संबंध नाही, अशा सर्व चिकित्सांचा समावेश करण्याइतपत ही पद्धती लवचिक आणि व्यापक केली पाहिजे.

निसर्गोपचाराची तीन उपाय क्षेत्रे

तीन शास्त्रीय साधनांवर आधारलेल्या उपचारांचा उपयोग करते. क्षेत्रांची अशी विभागणी करतात : वैचारिक, भावनिक व मानसिक क्षेत्र, शरीररचना व क्रिया आणि शरीरातील कोशिका (पेशी) व ऊतके यांचे रासायनिक क्षेत्र ही तीन क्षेत्रे आहेत. शास्त्रीय उपायांमध्ये पुढील प्रकार आहेत. मानसोपचार : धातुक सवयींपासून अलिप्त राहण्याची सूचना देणे, मनःकायिक उपचारांनी शरीर व मन यांच्या अन्योन्यसंबंधांना योग्य दिशा देणे वगैरेंचा समावेश होतो. भौतिकी चिकित्सा : उष्णता, विद्युत प्रवाह, मर्दन, व्यायाम इत्यादींचा समावेश होतो. रासायनिक आणि वस्तुनिष्ठ चिकित्सा : यामध्ये पोषण नियंत्रण, आहारविद्या, बाह्योपचार (शेकणे, लेप वगैरे), लवणे, जीवनसत्त्वे व वनस्पती यांचा समावेश होतो.

आहार व उपचार पद्धती

थोडक्‍यात निसर्गोपचार चिकित्सेत लंघन, युक्ताहार, दुग्धाहार व इतर आहारविषयक उपचार मर्दन, व्यायाम, योगासने, रोगनाशक कसरती, अस्थि- पुनःस्थितीस्थापन (रोगाचे कारण शरीरातील हाडे, कूर्चा, अस्थिबंध, स्नायू यांच्या बिघाडामुळे उत्पन्न होणारा तंत्रिकांवरील- मज्जांवरील- विकृत दाब हे असते म्हणून हाताने व इतर उपायांनी हे अवयव पूर्ववत बनविण्याचे खास तंत्र), कशेरूक प्रतिष्ठापन, विद्युत चिकित्सा, जलोपचार, मातीचे उपचार, संगीत चिकित्सा, वर्णचिकित्सा, प्रकाश चिकित्सा या सर्वांना स्थान आहे. अपायकारक औषधे, अनावश्‍यक शस्त्रक्रिया, बाह्य दूषित पदार्थ, हानिकारक सूचना यांचे या पद्धतीला वावडे आहे.

निसर्गोपचार पद्धतीचा व्यक्तिनिहाय उपयोग

निरोगी व्यक्ती : या प्रकारच्या व्यक्ती अलीकडे अत्यल्प प्रमाणात आढळतात. तरीही त्यांचे स्वास्थ्य टिकविण्याचे प्रयत्न या पद्धतीने करता येतात. जाणीव नसलेले रोगग्रस्त ः ज्यांना निरोगी आहोत असे वाटते परंतु प्रत्यक्षात रोगग्रस्त असतात. निसर्गोपचार पद्धतीतील निदानात्मक तपासणीवरून असे आढळते की, व्यक्तीला जाणीव नसलेले काही रोग असतात; उदा., सौम्य डोकेदुखी, बद्धकोष्ठ वगैरे. या लक्षणांकडे अनेक व्यक्ती रोग म्हणून लक्षही देत नाहीत. या प्रकारात बहुसंख्य व्यक्ती मोडतात. रोगग्रस्त : या प्रकारातील रोगी बहुदा जेव्हा औषधी वा शस्त्रक्रिया यांच्या फेऱ्यातून सुटून निराशावस्थेत असतो तेव्हाच या पद्धतीकडे वळतो. अशा रोग्यांचे रोगही बहुदा चिरकारी (दीर्घकालीन) प्रकारचे असतात.

जाणून घ्या निसर्गोपचार ! निरामय जीवशैलीचे प्रतीक
डोळे हे मानवाला लाभलेले अनमोल इंद्रिय! त्यांची 'अशी' राखा निगा

निसर्गोपचाराचे मार्ग

निसर्गोपचार पद्धतीच्या आधुनिक चिकित्सकाला पुढील मार्गांचा अवलंब करून रोगचिकित्सा करता येते : निसर्गतत्त्वाकडे परत वळणे : आहार, पान, श्वसन, स्नान, पोषाख, काम, विश्रांती, विचार, नैतिक जीवन, लैंगिक व सामाजिक जीवन शिस्तबद्ध करणे. रासायनिक उपाय : शास्त्रीय दृष्टिकोनातून आहारविद्या तत्त्वानुसार अन्नाची निवड, जैवरासायनिक उपाय, साधे वनस्पती अर्क, पोषण, रासायनिक द्रव्ये इत्यादींचा उपयोग करणे. मूलघटक संबंधित उपाय : जल, हवा, प्रकाश, माती, सूर्यस्नान यांचा जिच्यात उपचारार्थ उपयोग करतात अशी उपाययोजना. यांत्रिक उपाय : रोगनाशक कसरती, मर्दन, घर्षण, कंपन इत्यादींचा वापर करणे. मानसिक व आध्यात्मिक उपाय : शास्त्रोक्त मानसिक विश्रांती, प्राकृतिक सूचना, पोषक विचार व प्रार्थना यांचा समावेश यामध्ये होतो.

- डॉ. व्यंकटेश कुलकर्णी, निसर्गोपचार अभ्यासक तथा सीईओ, सोलापूर सिटी हॉस्पिटल, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.