Valentine's Week Special : प्रेमात पडलेली माणसं वेडी असतात, प्रेमाने आयुष्य फुलतं, प्रेम व्यक्तीला उध्वस्त करतं, प्रेमात लोकं पागल होतात ब्ला... ब्ला... ब्ला... ही आणि अशी बरीच काही मतं आपल्याला ऐकायला मिळतात. यातली काही मतं आपण आपल्या अनुभवानुसार, सोयीनुसार मान्य करतो किंवा अमान्य करतो. म्हणून तुमचं आमचं प्रेम जरी सेम असलं तरी त्याबद्दलची मते मात्र वेगवेगळी असतात. त्याबद्दलचे अनुभव, त्याच्या गुजगोष्टी, आनंद-दु:ख असं सगळंच बरचसं व्यक्तीपरत्वे वेगळंच असतं. मुळात आपण समजून घ्यायला हवं की, प्रेम ही कुठली एकच एक भावना नाहीये तर ज्यात काही भावनांचा मिळून एक उच्चांक गाठला जातो ते म्हणजे प्रेम होय. आपण आयुष्यात जे काही करतो त्यामागे बरीच कारणे असतात, बरेच घटक त्यामागे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उभे असतात. त्याप्रमाणे तुम्हाला-मला होणाऱ्या प्रेमामागेही बरेच घटक कारणीभूत असतातच असतात. जन्मापासून ते अगदी म्हातारपणापर्यंत या सगळ्या घटकांचे पैलू बदलत असतात. किंवा असे म्हणता येईल की या घटकांचा आपण कशाप्रकारे उपयोग करतो, त्यावरच खरंतर बऱ्याच गोष्टी ठरत असतात.
प्यार का केमिकल लोच्या....!
आपण बरेचदा म्हणतो की प्रेम हा 'केमिकल लोच्या' आहे. तर हो! प्रेमात केमिकल लोच्या होतोच. आणि आपण आज जरा याच केमिकल लोच्याविषयी सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. Oxytocin नावाचे एक केमिकल आपल्या शरीरात असतं, ज्याला 'Love hormone' असंही म्हंटलं जाते. जेव्हा जेव्हा आपण एखादी प्रेमासंबधित क्रिया करतो, त्या त्या वेळी हे केमिकल उत्तेजित होत असतं. थोडक्यात हे आपल्या शरीरात नाचत असतं, थैमान घालत असतं. मग ही क्रिया अगदी एखाद्या कुत्र्याच्या पिलाचे लाड करताना असो किंवा आई आपल्या बाळाला दूध पाजताना असो, अश्या सर्वच प्रेमाशी संबंधित मायेच्या, आपुलकीच्या क्रियेमागे oxytocin आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. या oxytocin चेही पैलू वयानुसार बदलतातच.
इसके पिछे oxytocin है बॉस!
वयात आल्यानंतरच 'त्या' वाल्या प्रेमात जास्त लोक पडतात. कारण काय तर आपल्या शरीरात आणखीही काही बदल घडत असतात, त्यामुळे यात आणखी केमिकलची भर पडते आणि मग आणखी केमिकल लोच्या होतो. निसर्ग आपल्याकडून आपला साथी शोधण्याची अपेक्षा ठेवतो आणि त्यादृष्टीनेच आपण कार्यान्वित होतो. मग काय, एखाद्या विशष्ट व्यक्तीमुळे आपला oxytocin जास्तच नाचायला लागतो आणि मग आपण प्रेमात पडलो, हे स्वतःलाच सांगून घोषित करतो. मग हृदयात घंटी वाजायला लागते, मागे गिटार आणि चिमण्या उडायला लागतात असं बरंच काही आपल्यासोबत घडायला लागतं. अर्थात, हे प्रेम अनुभवणं हे खरंच खुपच सुंदर असतं यात शंकाच नाही. या प्रेमाला आकर्षण असंही आपण म्हणू शकतो. 'लव इन फर्स्ट साईट' ज्याला म्हटलं जातं ते हेच! आपल्या प्रिय व्यक्तीला बघताच क्षणी oxytocin ने उंच उडी मारली की मग संपला विषय.
हे आकर्षण पुढे नेण्यासाठीही काही घटकांची मदत होते. त्यातला एक म्हणजे जवळीक. हे दोन व्यक्ती किती भेटतात, किती बोलतात, किती वेळ सहवासात घालवतात. एकंदरीतच त्यांना एकमेकांची किती सवय होते त्यावर या प्रेमाच्या पुढचा प्रवास ठरतो. आणि यानंतर येतो तो सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे साम्यता. बरेच लोक प्रेमामध्ये Neuton's law आणतात. पण लक्षात घ्या, त्याने प्रेमाचं सौंदर्य जाऊ शकतं. लोहचुंबक विरुद्ध बाजूला आकर्षित होतो, आपण माणसं आहोत! याच मतावरती काही संशोधनेदेखील झाली आहेत. त्यात असं आढळून आलं आहे की, आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत, ज्या आपल्याकडे नाहीयेत त्या नकळतपणे आपण आपल्या जवळच्या व्यक्ती मध्ये शोधत असतो, पण अगदीच विरुद्ध व्यक्तीच्या प्रेमात वगेरे पडणं, हे काही संशोधनामध्ये आढळून आलं नाहीये.
विचारांमधील साम्यता हाच 'लव्ह फॅक्टर'
हर्टफिल्ड आणि रापसन यांना त्यांच्या संशोधनामध्ये 'साम्यता' हा घटक आढळून आला. साम्यता म्हणजे शब्दश: सगळ्याच गोष्टीमध्ये नव्हे तर प्रामुख्याने आपल्या विचारांमधली साम्यता. दोघांची विचारपद्धती जर का जुळत असेल तर पुढे जाऊन त्यांच्यातल्या प्रेमाची आणखी वाढ होते. मग हे विचार जुळत असताना जोडप्यांचे व्यक्तिमत्त्व वेगळेही असू शकतात. आपण बघतो की, एखाद्या जोडप्यामधील एखादी मुलगी खूप कठोर आणि प्रबळ निर्णय घेणारी असते आणि दुसरीकडे एखादा मुलगा शांत आणि आज्ञाधारक असू शकतो. आता यात जरी व्यक्तिमत्त्वं विरुद्ध असली तरी या दोघांच्या विचार पद्धतीमध्ये दोघांपैकी एकाने कोणीतरी असाच प्रबळ असावा आणि एकाने ऐकून घेणारा असावा, हे मान्य असतं म्हणून यांचं नातं सुंदररित्या जुळतं. नाहीतर दोन्ही व्यक्ती शांत स्वभावाच्या पण काही मतं जुळलीच नाहीत तर त्यांच्यासाठी ते अवघड होऊ शकतं. अश्या वेळी oxytocin ला शांत बसावं लागतं.
प्रेम हे समतोलाचंच गणित!
इतर घटकांमध्ये येतात त्या सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक गोष्टी. लहानपणापासून आपण ज्या गोष्टी बघत आलो आहोत त्यांचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर, स्वभावावर जसा परिणाम होतो, त्याचप्रमाणे कोणत्या व्यक्तीकडे आपल्याला जास्त सुखदायक वाटत तेही अवलंबून असतं. असे अनेक घटक आहेत ज्यावर प्रेम हा विषय रंगवला जाऊ शकतो. पण हे घटक बघत असताना कितीतरी अपवाद आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसून येतील. सगळेच घटक सगळ्यांच्याच आयुष्यात जुळून आलेले नसतात. अगदी अरेंज मॅरेज करूनही लोक अगदी सुखी असतात. त्यांच्यात तर oxytocin ला माहितीही नसतं. त्याला सांगितलं जातं की अमुक व्यक्तीकडे बघून तुला खुश व्हायचंय. तर हे कसं घडतं? बऱ्याच अंशी एखादा घटक जरी नसला तरी त्याची जबाबदारी घेण्याची कुवत किंवा तयारी त्या दोघांनी नकळत घेतलेली असते.
लहान वयात झालेलं प्रेम फार काळ टिकत नाही असं आपण म्हणतो. ते कसं टिकेल कारण ते वय जबाबदारीचं नसतं. ते खेळण्याचं-बागडण्याचं असतं. इतर घटकांची त्याला सवय व्हायला मुळात त्याला स्वतःच्याच बाबतीत फारशी जाणीव झालेली नसते तर त्या नात्याच्या बाबतीत कशी होईल. पण यामुळे सरतेशेवटी बदनाम होतं ते प्रेमच. काहींची सांस्कृतिक जडणघडण, काहींचे तर विचारही जुळत नसतात. पण त्यांच्या इतर घटकांची ताकद प्रचंड असते. आणि म्हणूनच ही जोडपी जे घटक अनुपस्थित आहेत, त्याची जबाबदारी सामर्थ्याने पेलू शकतात आणि मग ते प्रेम टिकलेलं आणि बहरलेलं दिसून येतं. म्हणूनच पूर्णपणे एकाच एक गोष्टीला प्रेमाच्या बाबतीत तरी महत्त्व देऊ नये. कारण प्रेम हे समतोलाचंच गणित आहे.
हेही वाचा - Valentine's Week 2021 : 'व्हॅलेंटाईन विक'च्या प्रत्येक दिवसाची खासियत
भावनिक जबाबदारीनं खुलतं ते प्रेम
प्रेम न मिळाल्यामुळे लोकं आजारी तेव्हाच पडतील जेव्हा त्यांच्यातल्या oxytocin शांत बसलेलं असेल. त्यामुळे ते नीट जेवणार नाहीत आणि मग त्यांना आजारपण उद्भवेल. हेच कारण असतं की लोकं प्रेमात वेडी होतात असं म्हणण्याचं. काहींचा स्वभाव लहानपापासूनच प्रचंड संवेदनशील असतो. तर काहींच्या बाबतीत ते आपल्या शरीरातल्या केमिकलचंच खूप ऐकत असतात. इतर घटकांचा त्यांना विचार करायचा नसतो. यात काही गैर नाही पण याचा स्वतःला किंवा दुसऱ्याला त्रास होत असेल तर हे नक्कीच चुकीचं आहे. खऱ्या प्रेमामुळे कधीच कोणाचं शोषण, त्रास आणि फसवणूक होत नसते. आणि एखाद्याच्या प्रेमाचा आपल्याला किंवा आणखी कोणाला जर काहीच त्रास होत नसेल आणि ते जोडपं सुखी असेल तर त्यांच्यातल्या अपुऱ्या घटकांचा आपण विचारही करू नये. सुरुवातीला, एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असण्याऐवजी 'आपण त्या व्यक्तीमुळे आपल्याला जे काही वाटत असतं' त्याच भावनेच्या प्रेमात असतो. पण नंतर हळूहळू आपण इतर गोष्टींची जेव्हा भावनिक जवाबदारी घेतो, तेव्हा ते प्रेम खऱ्या अर्थाने खुलतं. म्हणूनच प्रेम आंधळं कधीच असू नये ते डोळस असावं, त्याला सर्वांगाने आपण पाहू शकू. आणि इतकं सगळं करुनही जर प्रेम नाहीच टिकलं तरीही त्याचा आदर कायम असावा, कारण प्रेम सुंदरच असतं!
- समता शिंदे | 97679 15750
(लेखिका सायकॉलॉजिस्ट आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.