Maharashtra Krishi Din 2024: पारंपरिक कपाशी, तूर, मका, सोयाबीनसारख्या पिकांमध्ये उच्चतम उत्पादन, मोसंबी, केसर आंबा, डाळिंब, द्राक्ष, सीताफळ, पेरूसारखी फळपिके, भाजीपालावर्गीय पिकांचे बीजोत्पादन, टोमॅटो, मिरची पिकांचे क्लस्टर, प्रतिकूलतेतही साथ देणारा रेशीम उद्योग.
शेतीच्या जोडीला शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांची बलस्थानं. या सर्वांना सक्षम करण्यासाठी सर्वांगाने आधार हवा आहे. याशिवाय शेतीला शाश्वत पाण्याची सोय करून दिली, हवामानाचा अचूक अंदाज देणारे केंद्र निर्माण केली तर त्याव्यतिरिक्त निसर्गाच्या प्रतिकूलतेशी दोन हात करून शेतीचे अर्थकारण भक्कम करण्याची मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये धमक आहे.
मराठवाड्यातील कृषी विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड हे तीन जिल्हे व २८ तालुके येतात. या तीनही जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्र सुमारे २८ लाख ४८ हजार हेक्टर असून त्यापैकी १ लाख १९ हजार हेक्टर वन आहे. वहितीखालील क्षेत्र २३ लाख ७६ हजार हेक्टर असून त्यापैकी २० ते २१ लाख हेक्टर खरिपाचे तर साडेसहा ते साडेसात लाख हेक्टरदरम्यान क्षेत्र रब्बीचे असते. बागायती क्षेत्र पावणेचार लाख हेक्टरच्या आसपास आहे. लातूर कृषी विभागात धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड हे पाच जिल्हे व ४८ तालुके येतात. सुमारे ३५ लाख ८० हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्र असलेल्या या विभागातील पाचही जिल्ह्यांत १ लाख १५ हजार ६ हेक्टर क्षेत्र वनाखाली आहे.
वहितीखालील क्षेत्र ३१ लाख हेक्टरवर असून त्यापैकी खरिपाचे २८ ते २९ लाख हेक्टर तर रब्बीचे ११ लाख हेक्टर असते. बागायती क्षेत्र ६ लाख १३ हजार हेक्टर आहे. मराठवाड्यात, ८ जिल्हे ३८ उपविभाग, ७६ तालुके, ५३४ महसूल मंडळे, ३१५७ तलाठी सजे, ८५९३ महसुली गावे, ५ महानगरपालिका, ४९ नगर परिषदा, २६ नगर पंचायती, ८ जिल्हा परिषदा, ७६ पंचायत समित्या, ६६४९ ग्रामपंचायती आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी ८७ लाख २७ हजार ७२८ लोकसंख्या आहे. गोदावरी, पूर्णा, मांजरा, पेनगंगा, दुधना, तेरणा या महत्त्वपूर्ण तसेच इतरही छोट्या उपनद्या मराठवाड्यात आहेत. अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मराठवाड्यात जास्त आहे. छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत २८१ लघू, ३९ मध्यम, ५ मोठे मिळून ३२५ प्रकल्प आहेत.
जवळपास २० साखर कारखाने व १७७ महसूल मंडळं या विभागात आहेत. लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत ८०५ लघू, ३३ मध्यम, १० मोठे मिळून ८४८ प्रकल्प तर जवळपास ३९ साखर कारखाने विभागात आहेत. मराठवाड्यात साधारणत: पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. गत दहा वर्षांतील पावसाचा विचार करता त्यापैकी सहा वर्षांत अपेक्षित पाऊस झाला नाही. सतत तीन वर्षे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर केवळ एक वर्ष पाऊस कमी झाला तर निर्माण होणारं अवर्षणाचं संकट भीषण असतं हे समजून घ्यावे लागेल. मराठवाड्याला सिंचनसमृद्ध करण्यासाठी निर्माण केलेल्या जायकवाडी प्रकल्प पाऊसकाळ कमी झाला की परावलंबी होऊन जातो.
अशा स्थितीत मग नाशिक, नगर भागातून पाणी सुटले तर भागते. याशिवाय लहान-मोठी शहरं आणि लहान-मोठ्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजना सिंचनाच्याच प्रकल्पांवर आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील सिंचनवाढीवर मर्यादा येतात. अवर्षणकाळात पाण्याची आवर्तन कमी केली जातात. त्यामुळे सिंचनवाढीचे उद्दिष्ट गाठलं जात नाही. सिंचनासाठी वॉटरग्रीडच्या माध्यमातून पिण्यासोबतच शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. असे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडता कामा नये.
मराठवाड्यात पाणलोट क्षेत्र विकासाचे पायलट प्रोजेक्टची खरी गरज आहे. जालना जिल्ह्यातील कडवंचीतील पाणलोट क्षेत्र विकासकामामुळे ते स्पष्ट झाले आहे. जल व मृदसंधारणाच्या माध्यमातून मातीचे अनेक प्रश्न सोडले जाऊ शकतात. हवामानाची सातत्याने उद्भवणारी प्रतिकूलता पाहता, शिवारात पाणी खेळल्याशिवाय शेतीचं भवितव्य अधांतरी आहे. नदीजोड प्रकल्प, इतर भागातून पाणी उचलून मराठवाड्याची पाण्याची तूट भरून काढण्यासाठीचे प्रस्तावित प्रकल्प मराठवाड्यासाठी संजीवनी ठरू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.