महावीर दीपचंद ठोले
भारतीय संस्कृतीत जैन संस्कृती एक प्राचीन सनातन संस्कृती आहे. या संस्कृतीत अनेक महान पुरुषांनी जन्म घेऊन आपल्या कर्माच्या व पुरुषार्थाच्या बळावर परमात्मपद प्राप्त केले. याच श्रृंखलेत २६५० वर्षांपूर्वी भगवान महावीर अवतरले होते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनाला एक प्रयोगशाळा करून कठोर तपश्चर्येच्या अनुभवातून आणि संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला क्रांतिकारी विचारांची व सिद्धांताची अनमोल देणगी दिली. त्यालाच आपण पंचशील तत्त्व म्हणतो.
ते आहेत अहिंसा, सत्य, अपरिग्रह, अचौर्य व ब्रह्मचर्य. हे तत्त्व जीवन जगण्याची कला शिकवितात. महावीरांचे अहिंसा सिद्धांत सर्वश्रेष्ठ धर्म आहे. वर्तमानकाळात त्याची सर्वांत अधिक आवश्यकता आहे. वैश्विक स्तरावर सर्व शांतीसाठी प्रयत्नशील आहेत. परंतु, विडंबना आहे की सर्व जीवयुद्धाची तयारी करताना दिसतात. शास्त्राप्रमाणे ‘आयातुला पयासु’ अर्थात सर्व जीवांना आपल्यासमान माना. स्वतःही जगा व दुसऱ्यासही जगू द्या, विचार चरितार्थ झाला तर जगात युद्ध, उन्माद, हिंसा, आतंक मुळापासून नष्ट होईल.
महावीर केवळ जैनांचेच नाहीत, तर ते जनजनांचे आहेत. सर्वांचा त्यांच्यावर अधिकार आहे; कारण महापुरुषांवर सर्व मानवजातीचा अधिकार असतो. त्यांचे विचार आजही महत्त्वाचे आहेत. त्यांनी ज्या शाश्वत मूल्याची स्थापना केली होती, ती आजसुद्धा आदर्श विश्वनिर्मितीमध्ये सहयोगी आहेत, त्यांचे उपदेश आध्यात्मिक दृष्टीने असाधारण आहेतच; शिवाय राजनैतिक दृष्टीनेसुद्धा त्यांच्या उपयोगितेला नाकारले जाऊ शकत नाही.
ते जन्मापेक्षा कर्मावर जास्त जोर देत असत. त्यांच्या मते व्यक्ती जन्माने महान बनत नसून कर्माने महान बनते. आज जगाची वाटचाल सत्यापेक्षा असत्याकडे, धर्म सोडून अधर्माकडे, श्रेष्ठत्वापासून क्षुद्रत्वाकडे, शास्त्रापेक्षा शस्त्राकडे आणि अहिंसेपेक्षा हिंसेकडे झपाट्याने होत आहे. आजच्या मानवाने आपली सारी बुद्धिमत्ता व पराक्रम भौतिक विकास करण्याकरिता लावलेली आहे.
परंतु, नैतिकतेचे अधःपतन होत आहे. अशा प्रसंगी महावीरांचा प्रत्येक संदेश मानवाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. त्यांची शिकवण असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मृताकडून अमृताकडे नेणारी आहेत. सर्वांचा सर्वांग सुंदर विकास व्हावा, हेच ध्येय त्यांच्या तत्त्वज्ञानात आहे. त्याचे सर्व सिद्धांत सर्वोदय तीर्थ आहेत, त्यात वसुदैव कुटुंबकमची उदात्त भावना आहे.
महावीरांनी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चारित्र्य असे तीन मौल्यवान रत्ने मानवाला दिली. त्यांचा अंगीकार करून जगावे. कोणालाही मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रास द्यायचा नाही, कुठल्याही सजीवाची हिंसा करायची नाही, स्वतःही चांगले जगावे दुसऱ्यांनाही सुखाने जगू द्यावे, कार्य असे करावे, की त्यामुळे आपल्या यशाची व गुणांची कीर्ती जगभर पसरेल. त्याग, प्रेम, संयम, करुणा, शील, सदाचार हे महावीरांच्या तत्त्वज्ञानाचे मुख्य सार आहेत. सर्वांनी सहभावनेने, संवेदनशीलपणे इतरांच्या स्वातंत्र्याचा, मताचा, अधिकाराचा आदर करावा.
त्याचवेळी आपलं स्वातंत्र्य, मत, अधिकारही आपण जपायला हवेत. आपण नेटकेपणाने, शांततेने सन्मार्गाने जगावे. इतरांनाही सुखाने जगू द्यावे. या जगातील प्रत्येक धर्म, संप्रदाय, परंपरा चांगल्या आहेत. कुणीही एक दुसऱ्यांचा द्वेष किंवा मत्सर करण्याचे सांगत नाही. याकरिता प्रत्येक धर्माचा, परंपरेचा आम्ही सन्मान केला पाहिजे. त्यांच्याशी शांतीने व सहिष्णूतेने वागले पाहिजे. तरच जगात शांतता प्रस्थापित होऊ शकते. ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय। सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा किश्चित दुखभावेत।।’ ही उक्ती सिद्ध होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.