सुगरण पक्षिणी नव्हे, तर पक्षी बांधतो घरटे

परंतु, वास्तवात मादी नव्हे तर नर सुगरण काडी-काडी जमा करून खोपा विणतो आणि मादीला आकर्षित करतो.
Baya weaver
Baya weaverSakal
Updated on

'अरेखोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला’ ही बहिणाबाई चौधरी यांची कविता आपण सर्वांनी ऐकलेली आहे. परंतु, वास्तवात मादी नव्हे तर नर सुगरण काडी-काडी जमा करून खोपा विणतो आणि मादीला आकर्षित करतो. त्याच झाडाच्या वेगवेगळ्या फांद्यांना किंवा झाडांना किमान दोन तर कमाल तो आठ ते दहा घरटे बांधतो.

नर अन् मादी दिसतात सारखेच

चिमणीपेक्षा थोडा आकाराने मोठा असणारा सुगरण पक्षी. एरवी नर आणि मादी सारखेच दिसतात. मात्र, उन्हाळा संपता-संपता पावसाळ्याच्या सुरवातीला त्यांचा विणीचा हंगाम सुरू होतो. त्यावेळी नराचा रंग बदलायला सुरवात होते. त्याच्या चोचीच्या भोवतालचा भाग गळ्यापर्यंत काळा होतो तर डोके, छाती, मानेला पिवळाधमक रंग येतो. हलकीशी तो शीळ घालतो. त्यामुळे त्याचा या काळात कंठ चांगला होतो. गुबगुबीत दिसायला लागतो. सप्टेंबरनंतर तो नर पूर्ववत होतो आणि नर-मादी सारखेच दिसायला लागतात. प्रत्येक पक्ष्यांना त्यांची अंडी, पिलं सुरक्षित कसे राहतील याची काळजी असते. यामुळे सुगरण पक्ष्याचे खोपे बोरी, बाभळी अशी काटेरी झाडे किंवा जिथे साप, मुंगूस, माणूस, शिकारी पक्षी जाणार नाहीत अशा विहिरीकाठच्या विहिरीत झुकलेल्या झाडांवर ते खोपे तयार करतात. कारण त्यांची अंडी आणि पिलं खाणारे साप, मुंगूस, शिकारी पक्षी यांच्याबरोबरच घराच्या बेडरूम, ऑफिसची शोभा वाढवण्यासाठी त्यांचे खोपे चोरणाऱ्या माणसांचीही त्यांना भीती असते.

आता विणीचा हंगाम

विहिरी, बारवेच्या काठावर, बांधावर माणसे झाडे ठेवत नसल्याने त्यांची घरटे बांधण्यासाठी अडचण होत आहे. यामुळे सुगरण आता सुबाभूळ, खैर, पाम, नारळ, काटेरी झुडपांची निवड करीत आहेत. मे ते सप्टेंबर हा या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. हा पक्षी माणसांपासून दूर राहणारा व एकांतप्रिय आहे. नर आधी घरटे विणायला सुरवात करतो ते अर्धे होत आले की पंखांची फडफड करीत, मंजूळ हलकीशी शीळ घालत मादीला आकर्षित करतो. मादीला त्याचे घरटे विणण्याचे कसब पसंत पडले तर त्याला प्रतिसाद देत ती घरट्यावर येऊन बसते आणि उर्वरित घरटे विणण्याचे काम दोघे मिळून पूर्ण करतात.

Baya weaver
Fortified Rice : प्लास्टिकचा नव्हे, ‘फोर्टिफाइड’ तांदूळ; लाभार्थ्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे; अन्न पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण

अशी असते घरट्याची रचना

साधारणत: घरट्यात वरच्या बाजूने प्रवेश असतो. मात्र, सुगरणीच्या खोप्याचे प्रवेशद्वार खालच्या बाजूच्या पोकळीतून असते. नर सुगरण बहुपत्नीक असतो. तो कमीत-कमी दोघींसाठी तर जास्तीत-जास्त आठ ते दहा घरटी बांधतो आणि पुन्हा वेगवेगळ्या माद्यांना आकर्षित करतो. प्रत्येक घरट्यात राहणाऱ्या सुगरणीची काळजी घेतो. पिलांना उडायला शिकवणे या जबाबदाऱ्या तो आनंदाने पार पाडतो. सुगरण पक्षी एकाच झाडावर वेगवेगळ्या फांद्यांना किंवा दुसऱ्या झाडांवर प्रत्येकीसाठी वेगळे घरटे बांधतो.

गवतापासून हा पक्षी चोचीने सुबक व भारी घरटे विणतो. नक्षीदार वीण पाहूनच या पक्षाला ‘सुगरण’ म्हणतात. घरट्याच्या फुगीर भागात ओल्या मातीचा गिलावा असतो. मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. अंडी शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे मादी करते. वादळातही हे घरटे शाबूत राहते.

- संजय दळवी, पक्षीमित्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.