आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

उन्हाळा आला की सर्वांत जास्त आनंद होतो तो आंबा येण्याचा. आंब्याचा गोड-आंबट रस खाल्ला, त्याच्या फोडी चाखल्या की उन्हाळ्यात आलेली सगळी मरगळ कमी होते.
mango king of summer fruit
mango king of summer fruitesakal
Updated on

- डॉ. मालविका तांबे

उन्हाळा आला की सर्वांत जास्त आनंद होतो तो आंबा येण्याचा. आंब्याचा गोड-आंबट रस खाल्ला, त्याच्या फोडी चाखल्या की उन्हाळ्यात आलेली सगळी मरगळ कमी होते. सोनेरी पिवळा आंबा हा फळांचा राजा तर आहेच, पण त्याचबरोबरीने याला आयुर्वेदातही खूप महत्त्व दिलेले आहे.

खूप कमी औषधी वृक्ष असे आहेत की ज्यांच्या प्रत्येक भागाचा औषधात उपयोग होऊ शकतो, त्यातीलच एक आहे आंबा. याचे कच्चे व पिकलेले फळ खाऊ शकतोच, पण याची पाने, साल, मूळ, बिया, फुले या प्रत्येकामध्ये काही ना काही औषधी गुणधर्म आहेत. कुठल्याही मंगलकार्यारंभी किंवा घराच्या बाहेर तोरण लावायचे असले की आंब्याची पाने सर्वांना आठवतातच.

आंबा कसा खावा हे आंब्याच्या प्रकारावरून ठरते. हापूस, पायरी, लंगडा, चौसा, तोतापुरी, बैंगनपल्ली, केशर वगैरे आंब्याच्या अनेक जाती आहेत. यातील सर्वांत उत्तम समजला जातो तो पूर्णपणे गोड लागणारा आंबा.

लहानपणी आम्ही आंब्याचा रस काढून, आंबा कापून, चोखून खायचो, त्याचप्रमाणे कैरीचे पन्हे, कांदा कैरी, चटणी, लोणचे वगैरे पदार्थही नियमितपणे खाण्यात असत. एवढेच नव्हे तर आम्ही आंब्याची बी भाजून खात असू. केसांच्या व त्वचेच्या आरोग्यासाठी स्नानाचे पाणी गरम करत असताना आई त्यात आंब्याच्या डहाळ्या टाकत असे.

हृद्यं वर्णकरं रुच्यं रक्तमांसबलप्रदम् ।

कषायानुरसं स्वादु वातघ्नं बृंहणं गुरु ।।

पित्तावरोधि सम्पक्वमामं शुक्रविवर्धनम् ।

मधुरं बृंहणं बल्यं गुरु विष्टम्भ्यजीर्णकृत् ।।

पिकलेला आंबा हृद्य अर्थात हृदयासाठी चांगला, वर्णकर म्हणजे त्वचेचे ओज वढविणारा, अन्नाची रुची वाढविणारा, रक्त-मांस-धातू वाढविणारा, शरीरात बल वाढवणारा आहे. आंबा चवीला किंचित कषाय व स्वादिष्ट असतो. आंबा शरीरातील वात कमी करतो, पित्तशमन करतो, शुक्र वाढवतो, पोषण करतो व पचायला थोडासा गुरू असतो. फार जास्त प्रमाणात खाल्ला गेल्यास अपचनाचा त्रास वा मलबद्धता जाणवते.

आंबा खाण्याचे नियम

आंबा सगळ्यांनाच फार आवडतो. आंबा खाल्ल्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता काही नियम पाळणे उत्तम असते. आंबा व्यवस्थितपणे पिकला आहे याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.

आंबट आंबा शरीरात रक्तदोष उत्पन्न करतो व पित्त वाढवतो. आंबा घरी आणून वाळलेल्या गवतात पिकायला ठेवायला हवा. आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड वगैरेसारखे रसायन वापरले गेलेले नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

प्रथमदर्शनी आंब्यावर हिरवे, पिवळे, काळे असे विचित्र डाग दिसत असतील तर रसायन वापरण्याची शक्यता असते. म्हणून आंबा घरी पिकवायला ठेवणे सगळ्यांत चांगले. आंबा खाण्यापूर्वी व्यवस्थितपणे पाण्याने धुवावा व नंतर किमान दोन तास तरी पाण्यात भिजवून ठेवावा. यामुळे त्यात असलेले केमिकल्स कमी व्हायला तसेच आंब्यापासून होऊ शकणाऱ्या उष्णतेचा त्रास कमी होतो.

यानंतर आंबा चिरून किंवा त्याचा रस काढून खाता येतो. ज्यांना आंबा खाल्ल्यावर अंगदुखी, सांधेदुखी किंवा त्वचेचे त्रास होतात त्यांनी आंब्याच्या फोडी खाणे टाळणेच इष्ट, क्वचित आंब्याचा रस खाल्ला तर चालू शकते.

एक वाटी रसात दोन चमचे पातळ केलेले आयुर्वेदिक तूप, दोन चिमूट संूठ पूड (काहींना मिऱ्याची पूड आवडते) मिसळून खाणे आरोग्याच्या दृष्टीने जास्त चांगले. शक्यतो सकाळच्या वेळी आंब्याचा रस खाणे उत्तम. पचत नसल्यास संध्याकाळी आंब्याचा रस न खाणेच चांगले.

लहान मुलांना या ऋतूत आंब्याचा रस, त्याबरोबर तूप लावलेली गरम पोळी खाऊ घातली तर त्यांच्या शरीराची ताकद वाढायला, चिडचिड कमी व्हायला, पोट साफ व्हायला, व्यवस्थित झोप लागायला मदत मिळते.

आंब्याची बी निखाऱ्यावर वा गॅसवर भाजून मुलांना थोडी थोडी खायला द्यावी. बी भाजून तिचा चुरा करून ठेवला तर उन्हाळ्यात वरचेवर होणाऱ्या जुलाबांवर उपयोगी होऊ शकते. बीचे थोडे चूर्ण ताकाबरोबर देण्याने पचन सुधारायला मदत मिळते. जुलाब लागले असता बी पाण्याबरोबर शिजवून दह्याबरोबर खायला दिल्यास फायदा होतो.

मधुमेही व्यक्तींनी आंबा खावा की नाही हा मोठा प्रश्‍न असतो. शक्यतो त्यांनी आंबा टाळलेलाच बरा. पण क्वचित खाण्याची इच्छा झाली तर वर सांगितल्याप्रमाणे आंब्याच्या रसात तूप व सूंठ पूड घालून खाणे जास्त उत्तम राहील.

अर्थातच त्याच्यामुळे रक्ताच्या साखरेच्या पातळीत व एचबीए१सीमध्ये होणाऱ्या बदलांसाठी मानसिक तयारी ठेवणे तेवढेच आवश्यक आहे. आंब्याचा रस वाळवून केलेली आंब्याची पोळी पचायला जड असते, भोजनाची रुची व बल वाढवते, बृंहण करते व वात कमी करते. कुठल्याही प्रिझर्वेटिव्हशिवाय केलेली आंब्याची पोळी खाणे चांगले असते.

दुग्धाम्र

आंबा किंचितही आंबट असला तर तो दुधाबरोबर खाऊ नये. व्यवस्थितपणे पिकलेला आंबा दुधाबरोबर घेतला तर तो वात व पित्तदोष संतुलित करतो, चव वाढवतो, शरीरात ताकद वाढवतो, वृष्य असतो, वर्णकर असतो, पचायला जड असतो, शरीरात शीतलता आणतो. पिकलेल्या आंब्याचा गर व समभाग दूध एकत्र करून बनविलेले दुग्धाम्र शक्यतो जेवणानंतर लगेच घ्यावे.

वजन वाढायची समस्या असणाऱ्यांनी, सर्दी-खोकला-दम्याचा त्रास असणाऱ्यांनी, मधुमेहींनी हे पूर्णपणे वर्ज्य करणे उत्तम. तसेच किंचितही आंबटपणा असलेला आंबा दुधाबरोबर मिसळणे हे मात्र विरुद्धान्न होय. त्यामुळे दुग्धाम्र घेण्यापूर्वी आंबा संपूर्णपणे पिकलेला आहे याची खात्री करून घेणे अत्यंत गरजेचे असते.

कोवळी कैरी चवीला तुरट-आंबट असते, नंतर तिच्यात आंबटपणा वाढत जातो. त्यामुळे कैरी नुसती खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. कैरी खाण्याकरिता विविध प्रकारच्या कृती निघंटुमध्ये पाहायला मिळतात. त्यात सगळ्यांत महत्त्वाचे आहे कैरीचे पन्हे. कैरी पाण्यात शिजवून, साल काढून घ्यावी. गाळणीतून काढून गर वेगळा करावा.

त्यात खडीसाखर वा गूळ, केशर, वेलची पूड, कापूर, काळी मिरी या गोष्टी चवीप्रमाणे टाकाव्या. हा मसालेयुक्त गर पाण्यात मिसळून पन्हे तयार होते. पन्ह्यामुळे अन्नाची रुची वाढते, शरीराला ताकद मिळते आणि सर्व इंद्रियांचे तर्पणही होते. पन्हे थोडे उष्ण, स्निग्ध व मृदू असते, त्यामुळे हे ॲपेटायझरसारखे वापरावे. जेवणापूर्वी अर्धी वाटी पन्हे घेणे आरोग्यासाठी उत्तम ठरते.

आमचूर

शुष्कं कषायमुष्णं च भेदनं कफजित् ।

सहकाररसोहृद्यः सुरभिः स्निग्धरोचनः ।।

कैरी वाळवून केलेली पूड म्हणजे आमचूर. आमचूर चवीला आंबट, किंचित गोड, कषाय असतो. आमचूर पोट साफ व्हायला तसेच कफ व वात कमी करतो. त्यामुळे आहारात रुची वाढवण्यासाठी आमचुराचा वापर बऱ्याचदा होताना दिसतो. आंब्याची कोवळी पाने बऱ्याचदा चटणीमध्ये वापरली जातात वा नुसतीही खाल्ली जातात. अपचन, तोंडाला घाण वास येणे वगैरे त्रासांमध्ये आंब्याची पाने पाण्याबरोबर उकळून, गाळून घेऊन पाण्याने चूळ भरल्याचा फायदा होतो.

आंब्याच्या झाडाच्या इतर भागांचाही वेगवेगळ्या प्रकारे स्वास्थ्यवर्धक उपाय करता येतात. त्यामुळे नखशिखांत उपयोगात येणाऱ्या आंब्यासारख्या वृक्षाला उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा म्हणायला काहीच हरकत नसावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.