ललित कनोजे
Mobile Addiction : बालपणी ‘मामाचा गाव’ हा खूप जिव्हाळ्याचा विषय होता. खूप लांब नाही तर जवळच्याच एखाद्या खेडेगावात मामाचे घर असे, दिवसभर विविध खेळ खेळल्यानंतर दुपारी विहिरीत किंवा तलावामध्ये मनसोक्त डुंबल्यानंतर सायंकाळी अंगणात सर्वांसह बसून इकडच्या तिकडच्या गप्पा व नंतर चंद्राच्या शितल चांदण्यात जेवणाची पंगत असे.
सोबत आजीने दिवसभर जपून ठेवलेला खाऊ अमृताची गोडी देत असे. या वेळापत्रकात सुटी कधी संपली हे कळूनही येत नसे. नव्या आधुनिक युगात हे सारे संदर्भ आता पुसल्यागत झाले आहेत. आज ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानामुळे जीवन शैली बदलली आहे, असा बालपणचा अनुभव प्रत्यक्ष ‘मामाचा गाव’ अनुवलेल्या प्रौढांनी व्यक्त केला.
पूर्वी परीक्षा आटोपताच सुट्ट्यांमध्ये मुले मामांच्या गावाला हमखास जायची. सुट्यांमध्ये धमाल व्हायची ? परंतु काळाच्या ओघात मामांचे गाव हरपू लागले आहे. समर कॅम्प, मोबाइल, टिव्ही आणि बंद संस्कृतीमध्ये सिमेंटच्या जंगलात मुलेही चार भिंतीच्या आत बंदिस्त झाली आहेत. मोकळ्या मैदानाऐवजी घरातच खेळ खेळण्यावर भर दिला जात आहे.
''झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी'' हे बालगीतही आता केवळ पुस्तकात शोभून दिसत आहे. शिक्षणक्षेत्रात वाढलेल्या स्पर्धेमुळे आई-वडील सुट्यांमध्येही मुलांना पूर्वीसारखे रिकामे राहू देत नाही. स्पोर्ट्स कल्चरल ॲक्टीव्हीटीज, स्वीमिंग, स्पोकन, पेटींग क्लास व उन्हाळी शिबिरात व्यस्त झाल्याने आता त्यांना आजोळी आणि मामाच्या गावी जाण्यासाठी उसंत नाही. उरलेली वेळ ते टिव्ही आणि मोबाइल पाहण्यात घालवितात.
पूर्वी बाहेर निघत असत, परंतु, बदलत्या काळात संगणक व व्हिडीओ गेमचाच बोलबाला अधिक आहे. काळाच्या ओघात पारंपरिक खेळ आता इतिहासजमा झाले. जुने खेळ लोप पावून नवीन नवीन खेळ पुढे येत असले तरी आजही आपल्या नातवाने उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जावे, अशी बहुतांश आजीची इच्छा आहे. परंतु अलिकडील काळात मामा भाच्याच्या प्रेमाला बंधने येत असल्याचे चित्र समोर येत आहे. ग्रामीण भागातल्या मुलांनाही सुट्यामध्ये मामाच्या गावाला जायची पूर्वीची गंमत आता राहिलेली नाही.
पूर्वी परीक्षा संपल्या की, मुलांना मामाच्या गावी जाण्याचे वेध लागायचे. त्यावेळी नात्यागोत्यांमध्ये एकमेकांविषयी प्रेमभाव होता. परस्परांत स्नेह व आपुलकी होती. आता प्रत्येक जण आपल्या धावपळीत असतो. शहर असो की गाव नात्यातही कृत्रिमता आणि व्यावहारिकतेने शिरकाव केला आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली, हेसुद्धा त्यामागचे एक कारण आहे. त्यामुळे पूर्वीसारखा आदरतिथ्य, पाहुणचार आणि मानसन्मान उरला नाही. कुणाला कोणासाठी वेळ नाही. एक दिवसाचाच पाहुणा गोड वाटतो.
आजची पिढी ''मोबाईलमय'' झालेली आहे. शाळा संपली व घरी येताच मोबाईलशिवाय जमतच नाही. आई-बाबांनी कुठे बाहेर घेऊन जातो म्हटलं तरी मोबाईलच्या हव्यासापोटी या पिढीने बाहेर जाणे, खेळणेच टाळलेय. मुलं ''घरघुशी'' झालेली आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या घरी राहून मस्ती करणे, आनंद लुटणे याचा आता विसरच पडलाय. आजच्या पिढीच्या दृष्टीने ''आता मामाचे पत्र तर सोडा मामाचे गावच हरपत चाललेय''. मामाच्या गावी राहून उन्हाळ्याच्या सुटीतल्या आनंदाला ही पिढी पारखी होत चाललीय, याची खंत वाटते.
- डॉ.पवन कामडी, ''प्रीत'' नगरधन, ता.रामटेक
स्पर्धात्मक परीक्षा, टीव्ही, मोबाईल ,पालकांची मुलांकडून अनाठायी अपेक्षा, त्यासाठी शुल्क भरून विविध ‘हॉबी क्लासेस’ला घेतलेली ॲडमिशन, गमावलेला आत्मविश्वास , मर्यादित छोटा परिवार त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत ओढ लावणारे मामाचे गाव आणि सोबतच शुद्ध हवा आणि आकाशातील चंद्र तारे पण हरवलेले दिसतात
- डाॅ. मिलिंद चोपकर, (प्राचार्य, रामजी महाजन विद्यालय, रामटेक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.