डॉ. रिचा पवार-नायर
अद्ययावत तंत्रज्ञान केवळ औद्योगिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता त्याचा शेतकऱ्यांना देखील फायदा होत आहे. कोणतीही माहिती हवी असेल, तर फोनद्वारे सहज आणि काही क्षणांतचा मिळण्याची सुविधा आता शेतीतदेखील येऊ पाहत आहे. शेतीचा खर्च कमी करीत उत्पादन वाढवता यावे या विचारातून शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत आम्ही ‘खेतीबडी’ सुरू केला.
कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशाची लोकसंख्या वाढतच आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार केला, तर अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादनवाढीची आवश्यकता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केला, तर काही गोष्टी त्यांच्यासाठीही सोप्या होतील हा खेतीबडीचा मुख्य हेतू आहे. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून माझे पती विनय नायर आणि आणि मी या अनोख्या कल्पनेसोबत खेतीबडी (Khetibuddy) या ॲपची संकल्पना सर्वांसमोर आणली आहे.
शेतकरीच नाही, तर शेतीची आवड असलेल्या, अगदी कमी जागेत शेती फुलविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठीही हे स्टार्टअप महत्त्वाचे ठरत आहे. विनय हे हार्वर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी २० वर्षांहून अधिक काळ आयटीमध्ये काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा आम्हाला व्यवसायात मोठा फायदा झाला.
मी बायोकेमिस्ट्रीमध्ये पीएचडी केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी शेतीविषयक क्षेत्रात काम करत आले आहे. शेती क्षेत्राची आवड आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची ओढ यातून आम्ही या व्यवसायाची स्थापना केली. गेले पाच वर्षे आम्ही या क्षेत्रात कार्यरत आहोत. शेती हे असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये विना अनुभव कोणतेही काम करता येत नाही.
आम्ही २०१८ पासून फिल्डवर जाऊन शेतकऱ्यांसोबत काम करण्यास सुरवात केली. अनुभवातूनच शेतीमधील आव्हानांची माहिती समजते, हे आमच्या लक्षात आले. तसेच मातीचे आरोग्य सुधारले, तर पिकांची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते, हे अनुभवले. त्यामुळे आम्ही २०२१ या प्लॅटफॉर्मची व्याप्ती वाढवली व ते अद्ययावत स्वरूपात सुरू केले. शेतीबद्दलच्या माहितीसाठी फिल्डवर काम करणे उपयोगाचे ठरत आहे.
मातीचा दर्जा सुधारण्यासाठी स्टार्टअपने तयार केलेल्या विविध मॉडेलचा वापर एनजीओ आणि सरकारी संस्थांकडूनही वापर होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सध्या याचा फायदा होत आहे. अनेक सरकारी आणि खासगी संस्थांना देखील आमच्या उद्योगाचा फायदा झाला. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना अनेक माहिती सहज उपलब्ध होते.
ग्रामीण व शहरी भागातील शेतीसंबंधी माहिती दिली जाते, मातीचे आरोग्य परीक्षण करण्यास मदत करते, मातीचा दर्जा सुधारण्यासाठी विविध मॉडेलची निर्मिती, शेतीशी संबंधित बाबींचे डिजिटायझेशन, हवामानानुसार होणाऱ्या बदलाचे ॲलर्ट, शेतकऱ्यांना विविध पिकांसंदर्भात समुपदेशन, शेतीशी संबंधित संशोधनाची माहिती, जिओ ट्रॅकिंगद्वारे पिकांचे व्यवस्थापन.
कोणताही व्यवसाय सुरू करताना नावीन्य महत्त्वाचे ठरते. नावीन्यपूर्ण कल्पना या नेहमीच लोकांना आकर्षित करीत असतात. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. व्यवसायात संशोधनात्मक अभ्यास नेहमीच महत्त्वाचा ठरतो. कष्टाबरोबरच सातत्याची जोड असणे गरजेचे आहे असे मला वाटते.
माझ्या पतींनी या कल्पनेला नेहमीच पाठिंबा दिला. या उद्योगाची स्थापना आम्ही दोघांनी मिळून केली. कुटुंब आणि व्यवसाय सांभाळणे यामुळे मला सोपे वाटत होते. त्यांची साथ नेहमीच मला प्रोत्साहन देणारी ठरली.
(शब्दांकन : सुचिता गायकवाड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.