आईपण म्हणजे ‘सुख’

मी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत देवकी हे महत्त्वाचं पात्र साकारत होते. चित्रीकरण सुरू असतानाच मला आई होण्याची चाहूल लागली.
actress minakshi rathod
actress minakshi rathodsakal
Updated on

- मीनाक्षी राठोड

मी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत देवकी हे महत्त्वाचं पात्र साकारत होते. चित्रीकरण सुरू असतानाच मला आई होण्याची चाहूल लागली. ही आनंदाची बातमी समजल्यानंतर मला काहीही वेगळं करावं लागलं नाही, कारण माझं काम मी मनापासून एन्जॉय करत होते.

आरामाच्या बाबतीत सांगायचं, तर मला वेळ मिळेल तसा मी ब्रेक घेत होते आणि आराम करत होते. माझं कामच मला ऊर्जा देत होतं. माझं सगळं व्यवस्थित चालू होतं. मी माझ्या आहाराचे नियम काटेकोरपणे पाळत होते, त्यामुळे काहीही अडचण आली नाही.

करिअर आणि आईपणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, मी दोन्ही निर्णय ठामपणे घेतले. मला आई व्हायचं होतं; पण करिअर सोडायचं नव्हतं. त्यामुळे मी ठरवलं, की काम आणि बाळ हे दोन्ही सांभाळून, सगळं व्यवस्थित मॅनेज करायचं. आई झाल्यानंतर मी थोडासा ब्रेक घेतला; पण हा ब्रेक खूपच छोटा होता. लगेचच मी परत आले आणि पूर्वीच्या जोमानं कामाला लागले.

बाळ झाल्यानंतर आठ महिन्यांतच मी कामावर नियमित झाले. माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं, की मला काम करायचं आहे आणि मुलाचीही काळजी घ्यायची आहे. हे मी व्यवस्थित पार पाडलं आणि त्यातूनच मला समाधान मिळालं. काम आणि बाळाचा सांभाळ करताना मला कधीच अडचण आली नाही, कारण मला दोन्ही गोष्टी मनापासून करायच्या होत्या.

यारा आठ महिन्यांची असताना मी मालिकेत पुन्हा काम सुरू केलं. माझी थोडी तारांबळ उडाली; कारण बाळाचं वय वाढतं, तसंच आपलं कर्तव्यही वाढतं. बाळाला अधिक वेळ द्यावा लागतो. बाळ काय करतंय?, कसं मोठं होतंय? याकडे लक्ष देताना करिअरचं काय होईल, याबद्दल थोडीशी चिंता वाटत असे. त्यामुळे पुन्हा मालिकेत काम सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा खरी तारांबळ उडाली.

सुदैवानं, याराची काळजी घेण्यासाठी नानी होती, त्यामुळे सगळं काही व्यवस्थित ॲडजस्ट झालं. मात्र, तरीही काम आणि बाळाचं संगोपन यामध्ये समतोल साधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. या काळात मला समजलं, की आईपण आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळण्यासाठी योग्य नियोजन आणि पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे मी दोन्ही बाजू व्यवस्थित सांभाळू शकले.

करिअरमध्ये पुन्हा सामील होताना एक वेळ अशी आली, की बाळाला कसा वेळ देऊ आणि कामाला कसा वेळ देऊ, हे मला समजेनासं झालं. त्यामुळे सुरुवातीला थोडी अडचण आली. लहान वयात बाळाला आई जवळ असण्याची गरज असते; पण मला कामही करायचं होतं. मग आम्ही अशी व्यक्ती शोधली, जी आमच्या बाळाची चांगल्या रीतीनं काळजी घेईल. एक आई म्हणून हे सगळं करणं खूपच अवघड वाटत होतं; पण पर्याय नव्हता.

कामावर माझं लक्ष लागत नव्हतं; पण हळूहळू सगळं सुरळीत झालं. याराला घरी राहण्याची सवय झाली. कधीकधी माझे संवादही पाठ व्हायचे नाहीत. सतत यारा काय करत असेल, असे विचार यायचे. मग मी निर्णय घेतला, की सेटजवळचं घर बघावं. त्यामुळे ब्रेक मिळाल्यावर मी घरी जाऊन यायचे. या सगळ्यात मला माझ्या नवऱ्याची खूप साथ मिळाली. त्यानं स्वतःची कामं थांबवून याराला वेळ दिला. त्यामुळे सगळं सुरळीत झालं.

पालक झालो, की आपले प्राधान्यक्रम बदलतात. वर्ष- दीड वर्ष काम केल्यानंतर मला जाणवायला लागलं, की माझ्या मुलीची समज वाढत चालली आहे. ती मोठी होऊ लागली, तसं तिला नाती कळायला लागली. तिला पप्पा, मम्मी हे समजायला लागलं. मग मला कळलं, की काम महत्त्वाचं आहेच; पण सध्या तिला माझी जास्त गरज आहे.

या क्षणी यारा माझं प्राधान्य आहे. त्यामुळे मी आता पाच-सहा महिन्यांचा ब्रेक घेतला आणि हा पूर्ण वेळ तिला द्यायचा असा निर्णय घेतला. आपण आपल्या वेळेनुसार आणि प्राधान्यानुसार निर्णय घेतले पाहिजेत. असे निर्णय घेतल्यामुळे आपण आपल्या जीवनाचा योग्य समतोल साधू शकतो.

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स

  • बाळाला जन्म देण्याचं कारण स्पष्ट असावं. सामाजिक किंवा कौटुंबिक दबावामुळे किंवा इतरांसाठी तुम्ही हा निर्णय घेऊ नका. पतीशी सुसंवाद साधून पुढील ॲडजस्टमेंट करून निर्णय घ्या.

  • मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मानसिक आणि शारीरिक तयारी असणं खूप महत्त्वाचं आहे.

  • बाळ झाल्यानंतर करिअर आणि आईपण यांच्यामध्ये समतोल साधणं खूप महत्त्वाचं आहे.

  • बाळाला त्याचा हक्काचा वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे.

  • एक आई म्हणून सकारात्मक ऊर्जा टिकवणं आणि स्वतःवर प्रेम करणं गरजेचं आहे.

(शब्दांकन : आकांक्षा पाटील)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com