रितिका श्रोत्री
नृत्य हा माझा आवडता छंद आहे. मी लहान असताना माझ्या आईनं मला भरतनाट्यमच्या क्लासला घातलं होतं, त्यामुळे नृत्य हा माझ्या छंदच बनला. मी सहा वर्षांची असल्यापासूनच मला नृत्याची प्रचंड आवड निर्माण झाली, ती या क्लासमुळेच; म्हणजे मी लहानपणी अक्षरशः वाट पाहायची, की कधी माझी शाळा संपते आणि मी कधी नृत्याच्या क्लासला जाते. त्याच्यामुळे मी अनेक वर्षं भरतनाट्यम शिकले. माझं अरंगेत्रम झालं, मी विशारदसुद्धा झाले; पण भरतनाट्यम शिकत असल्यामुळेच मला इतर कोणत्याही गाण्यांवर डान्स करायला खूप आवडायचं. त्यामुळे मी घरी कुठलीही गाणी लागली किंवा कुठल्याही गाण्यांवरती वेगवेगळ्या प्रकारे ताल धरत नृत्य करायचे. माझ्या या नृत्याच्या आवडीमुळेच मी लॅटिन, सालसा, हिपहॉप हे विविध नृत्यप्रकार शिकले.