चवीची, मजेची ‘खाद्ययात्रा’

माझा छंद म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथले वेगवेगळे पदार्थ ट्राय करणं. स्वयंपाक करायलाही मला अत्यंत आवडतं. काही गोष्टी ज्या मी बाहेर खाते, त्या मी घरीसुद्धा करून पाहते.
neha shitole cooking
neha shitole cookingsakal

- नेहा शितोळे

माझा छंद म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथले वेगवेगळे पदार्थ ट्राय करणं. स्वयंपाक करायलाही मला अत्यंत आवडतं. काही गोष्टी ज्या मी बाहेर खाते, त्या मी घरीसुद्धा करून पाहते. एखाद्या हॉटेलमध्ये एखादा पदार्थ मला आवडला, तर मी त्या शेफला त्याची रेसिपी विचारते किंवा ती ऑनलाइन शोधून तो पदार्थ बनवते. मला वेगवेगळे पदार्थ तयार करायला आवडतात, करता येतात.

मी शाळेत असल्यापासूनच ही आवड मला निर्माण झाली आहे. मी एका सिंगल मदरची मुलगी आहे. माझी आई नोकरी करायची. त्यामुळे घरात कधीकधी स्वयंपाक करायची किंवा कुकर लावायची वेळ माझ्यावर यायची. मला स्वयंपाकघरात वावरायला, आईच्या कामांत लुडबूड करायला प्रचंड आवडायचं. मला वाटतं, तेव्हाच ही आवड माझ्या आत रुजलेली होती.

कामाच्या किंवा खास फिरायच्या निमित्तानं कधी बाहेर जाणं होतं, तेव्हा तिथलं लोकल फूड ट्राय करायला मला आवडतं. भारतातल्या बहुतांश ठिकाणी मला जायला आवडतं. राजस्थान असेल किंवा दक्षिण भारतात, हिमाचलमध्ये किंवा दिल्ली, कोलकता अशा बऱ्याच ठिकाणी मी फिरले आहे. महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये मी कामानिमित्त फिरलेली आहे. आणि त्या त्या ठिकाणच्या पाण्यामुळेही पदार्थांची चव बदलत असते.

महाराष्ट्रात जशी मराठी भाषा मैलामैलावर बदलते, तशी खाण्याची चवही मैलामैलावर बदलते असं मला वाटतं. प्रत्येक प्रदेशातल्या काही ना काही विशेष घटकाचा त्या पदार्थांवर प्रभाव पडतो. अगदी नॉनव्हेजविषयी बोलायचं झाल्यास मटण कोल्हापूरचं वेगळं, नगरचं वेगळं, सोलापूरचं वेगळं आहे. एकच पदार्थ महाराष्ट्रात, वेगवेगळ्या घरांत वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातो आणि त्याची चवही प्रत्येक ठिकाणी वेगळी लागते.

वेगवेगळ्या पदार्थांच्या वापरानं एखाद्या पदार्थाची चव कशी संपूर्णपणे बदलून जाते, याबद्दल मला कुतूहल आहे. सध्या मी लेखन करते. त्यामध्येही मला या कुतूहलाचा फायदा होतो. फक्त काही पात्रांच्या फेरफारामुळे किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल केल्यामुळे पूर्ण कथानकातच किती फरक पडतो, हे मी समजू शकते. स्वतः स्वयंपाक करणं, पदार्थांबाबत प्रयोग करणं हेच मला लिखाणातही उपयोगी पडतं आणि त्यामुळे लिखाणाची लज्जतही वाढते.

मी मुंबईत असते, माझं माहेर पुण्यात आहे. मी मुंबईत मासे खूप खाल्ले आहेत, मला ते आवडतातही; पण मी कोलकत्याला गेले होते, तेव्हा मी ट्राय रोहू, कटला मासे, मोहरीच्या तेलात तळलेले, अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेले मासे तिथे खाऊन बघितले. तिथल्या लोकल न्याहारीच्या जागा, लेट नाईट फूड जॉईंट्स, हे सगळं मी ट्राय केलं.

आपल्याकडे पाणीपुरीचे गाडे असतात, तसे कलकत्त्यात रसगुल्ल्याचे ठेले असतात, तिथं गरमागरम रसगुल्ले खायला मिळतात. अशा या गोष्टींतून आपल्याला तिथली संस्कृती, तिथली माणसं हेही कळतात. खाण्याच्या माध्यमातून माणसांचं निरीक्षण करणं, त्यांच्याशी संवाद साधणं हाही माझा छंद जोपासला जातो. मी फक्त खाण्‍यासाठीही अनेक ठिकाणी प्रवास केला आहे. रात्री उशिरासुद्धा मी जेवणाची संधी साधली आहे.

एकदा मला अचानक होळीच्या आदल्या दिवशी पुरणपोळी खाण्याची इच्छा झाली आणि मी पहाटे चार वाजता ऑनलाइन सामान मागवून दुसऱ्या दिवशी पोळ्या करून होळीला नैवेद्य दाखवून मग मी त्या खाल्ल्या. अशा माझ्या काही क्रेव्हिंग्ज मी पूर्ण करते. एकदा माझ्या काही मित्रांना इच्छा झाली, म्हणून रात्री दीड-पावणेदोन वाजता वरण-भात, उकडीचे मोदक, बटाट्याची भाजी असा स्वयंपाक करून मी खायला घातला होता.

किचनमध्ये काम करणं माझ्यासाठी मेडिटेशन आहे. तिथं आपलं लक्ष पूर्णपणे केंद्रित असतं. तिथल्या प्रत्येक गोष्टींमधून काहीतरी मिळत असतं. माझ्या बाकीच्या कामांमध्ये आवश्यक फोकस मला स्वयंपाकघरातल्या कामातूनच मिळतो. तिथूनच मला प्रयोगशील वृत्ती मिळाली आहे. त्यामुळे या छंदाचा उपयोग मला व्यवसायातही होतो. वेगवेगळ्या ठिकाणी खायला गेल्यानं खूप माणसं भेटतात, ओळखी होतात.

मनसोक्त गप्पा होतात, त्या प्रांतातल्या भाषा, चर्चा ऐकायला मिळतात. त्यातून लिखाणासाठी नवे विषय सुचतात. माणसाच्या मनात घर करण्याचा रस्ता त्याच्या पोटातून जातो. तसं मला वाटतं, की एखाद्या घराचं अंतरंग जाणून घ्यायचं असेल तर त्या घरात काय स्वयंपाक होतो, कशा पद्धतीनं तो ग्रहण केला जातो, हे पाहावं.

‘बिग बॉस’मध्ये असताना मी किचनमध्ये काम करायचे, त्या प्रत्येक वेळी तो मनापासून केल्यावर तो आठवडा माझ्यासाठी चांगला गेला आहे. मला कोणीतरी काहीतरी आग्रहानं खायला बनवायला सांगितलं आणि त्याची क्षुधाशांती माझ्या हातून झाली, की मला समाधानी वाटतं. आजूबाजूला कितीही कटकटी सुरू असतील, तेव्हा मला ते समाधान पुरेसं असतं. हे समाधान खूप प्रेरणादायी असतं. त्यामुळे हा माझा छंद माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचा आहे.

(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर-इंगळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com