Banarasi Saree History : मुकेश अंबानी आणि नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आज राधिका मर्चंटसोबत मुंबईत विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर पहायला मिळतेय. या विवाहसोहळ्याचे विविध अपडेट्स आता समोर येत आहेत. या सोहळ्यांमधील नीता अंबानींचे विविध प्रकारचे लूक्स चांगलेच गाजले.
आता नुकताच त्यांचा रंगकट बनारसी साडीतला एक लूक समोर आला आहे. या रंगकट बनारसी साडीमध्ये नीता अंबानी खूपच सुंदर दिसत आहेत. बनारसी साडीबद्दल बोलायचे झाल्यास या साडीला प्राचीन असा इतिहास लाभला आहे. काय आहे या साडीचा इतिहास? चला तर मग जाणून घेऊयात.
उत्तर प्रदेशातील बनारस (वाराणसी) या शहराचा एक वेगळा इतिहास आहे. बनारस हे भगवान शंकराचे शहर म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. या शहराची खाद्य, संस्कृती आणि जीवनशैली जगभरातील लोकांना आकर्षित करते. या ठिकाणी तयार होणाऱ्या बनारसी साड्या शतकानुशतके प्रत्येक भारतीय कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहे. या साड्यांना २००० वर्षे प्राचीन इतिहास लाभल्याचे जाणकारांचे मत आहे.
बनारसी साडी बनवण्यासाठी खास रेशमी कापड वापरले जाते. रेशीमचा शोध हा सर्वात प्रथम चीनमध्ये लागला, असे आतापर्यंत मानले जात होते. परंतु, इ.स पूर्व ३०० मधील जातक कथांमध्ये या बनारसी साडीचा उल्लेख करण्यात आला आहे.
या जातक कथांमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर कपड्यांचा खरेदी-विक्रीचा उल्लेख आढळतो. याच कथांमध्ये सिल्क आणि ब्रोकेड साड्यांचे वर्णन केलेले आढळून येते. हीच बनारसी साडी असल्याचे मानले जाते.
विशेष म्हणजे ऋग्वेदामध्ये ‘हिरण्य’ नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. जे रेशमावर केलेले जरीचे काम मानले जाते. बनारसी साडीची हीच खासियत असल्याचे अनेक जाणकार सांगतात. महत्वाची बाब म्हणजे बनारसच्या कापडाचा स्पष्ट उल्लेख १४ व्या शतकातील मुघल काळात आढळतो. ज्यामध्ये या साड्या रेशीम कापडावर सोने-चांदीचे धागे वापरून बनवल्या जात होत्या.
बनारसी साडीचे दोन प्रकार पहायला मिळतात. एक कडुआ आणि दुसरा फेकुआ. जेव्हा ही बनारसी साडी विणली जाते, त्यावेळी दुसरा कारागीर सिरकीच्या सहाय्याने साडीची डिझाईन बनवली जाते. या प्रकारच्या कारागिरीसाठी दोन लोकांची आवश्यकता असते.
एक कारागीर साडी विणण्याचे काम करतो आणि दुसरा रेशम जरीच्या धाग्याने भरतकाम करतो. बनारसी साडीवर विविध प्रकारची फुले आणि पानांची डिझाईन केली जाते. यातील कडुआ साडी बनवण्यासाठी तब्बल २ महिने लागतात. याच कारणांमुळे या बनारसी साड्यांची किंमत सर्वाधिक आहे.
दुसऱ्या बाजूला फेकुआ बनारसी साडी बनवण्यासाठी कडुआ इतकी मेहनत घ्यावी लागत नाही. बनारस शहराच्या बाजारदिहा भागामध्ये कडुआ बनारसी साडी मोठ्य प्रमाणात बनवली जाते. सध्या या बनारसी साड्या, सिल्क, कोरा, जॉर्जेट, कॉटनच्या मदतीने बनवल्या जातात. त्यापैकी, रेशमी बनारसी साडी सर्वाधिक प्रसिद्ध आहे.
मुघल सम्राट अकबर बादशहाच्या काळात या बनारसी साडीला मोठे वैभव प्राप्त झाले होते. अकबरच्या कारकिर्दीमध्ये बनारसमध्ये बनवलेल्या या साडीने सर्वाधिक लक्ष वेधले होते. विशेष म्हणजे मुघल बादशहा अकबराला बनारसी सिल्क आणि जरीचे काम खूप आवडायचे. या बनारसी साड्या अकबर बादशहा त्याच्या बेगमसाठी खास तयार करून घ्यायचा. या साड्यांवर सोन्या-चांदीच्या जरीचे काम ही करण्यात यायचे. या साड्या त्या काळात भेट म्हणून ही वापरल्या जात असत.
महत्वाची बाब म्हणजे बनारसमध्ये बनवलेल्या बनारसी साडीवर मुघल सम्राटांची छाप सर्वात जास्त दिसते. या साडीचा सर्वाधिक विकास अकबर आणि जहांगीरच्या काळात झाला होता. त्याकाळात या साड्यांवर मुघली शैलीतील डिझाईनची फुले आणि पाने बनवली जात होती. आताच्या काळातही बनारसी साडीवर पाना-फुलांची डिझाईन आणि देवी-देवतांची डिझाईन्स पाहायला मिळते.
बनारसी साडीवर डिझाईन बनवणे हे काही सोपे काम नाही. हे एक प्रकारचे अवघड काम आहे. कारण, बनारसी साडीवर डिझाईन बनवण्यापूर्वी ते एका ग्राफ पेपरवर काढले जाते आणि नंतर त्यावर नक्षीकाम केले जाते.
विशेष म्हणजे एक बनारसी साडी तयार करण्यासाठी अनेक नक्षीदार कागद लागतात. या नक्षीदार कागदांवर डिझाईन्स ब्रेल लिपीमध्ये लिहिलेल्या असतात. त्यांची रचना बनवणे हे सुद्धा एक विशिष्ट ज्ञान आहे. जे मिळवण्यासाठी खूप संयम बाळगावा लागतो. कारण, चुकून जरी साडीची डिझाईन बिघडली तर त्यावर घालवलेला वेळ ही वाया जातो.
बनारसी साडीवर हाताने काम करणे, ही एक वेगळी आणि अनोखी कला आहे. हाताने बनवलेल्या बनारसी साडीवर डिझाईन आणि जरीचे काम हे अतिशय कुशल कारागिरांकडून केले जाते. हे काम करण्यासाठी बराच वेळ लागतो.
बनारसी साडी बनवण्यासाठी किमान २ महिन्यांचा कालावधी लागतो, तर काही साड्यांना त्यापेक्षा अधिक काळ लागतो. त्यामुळे, या साड्यांची किंमत खूप जास्त आहे. बनारसी साडीवरील डिझाईन जितकी सुबक आणि चांगली तितकीच ती साडी बनवण्यासाठी कुशल कारागिरांचा वापर केला जातो. त्यावरून या साडीची किंमत ठरवली जाते. बनारसी साड्यांवर सोने-चांदीच्या जरीचा वापर केला तर त्यांची किंमत लाखांपर्यंत पोहचते.
बनारसी साड्यांची नक्कल करून चीनने मशिनद्वारे स्वस्त साड्या बनवण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे, बनारसी साडीची खास ओळख जपण्यासाठी बनारस येथील कारागिरांना जीआय टॅग मिळाला आहे. बनारस, मिर्झापूर, चंदौली, जौनपूर आणि आझमगढ या जिल्ह्यांमध्ये बनवलेल्या साड्यांनाच बनारसी म्हटले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.