Pitru Paksha 2024: पितृपक्षात आपल्या कुटुंबातील पूर्वजांची आठवण ठेवण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात. तसेच गरजूंना मदत व दान करणे ही सामाजिक भूमिका घेत अनेक कार्यक्रम केले जातात.
पितृपंधरवडा हा प्रत्येक कुटुंबात पाळला जातो. या पंधरवड्यात प्रत्येक कुटुबांत पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी पिंडदान, तर्पण हे धार्मिक विधी केले जातात. तसेच दिवगंत नातेवाईकांची स्मृती जपण्यासाठी पिण्याचे पाणी टाकी देणे, वृक्षारोपण, गरजूंना अन्न व कपड्यांचे वाटप, वंचितासाठी काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत असे उपक्रम राबवले जातात. भारतीय संस्कृतीत सर्वाधिक महत्त्व दानाला देण्यात आले आहे. कोणत्याही निमित्ताने जेवढे अधिक दान केले जाईल तेवढे ते पूण्यकारक मानले जाते.
शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलावानजीक असलेल्या स्मृतीवन हा परिसर पूर्वजांची स्मृती झाडांच्या माध्यमातून जपणारा विशेष प्रकल्प आहे. सामाजिक वनीकरण खात्याच्या जागेत हा प्रकल्प राबवला जातो. या ठिकाणी नागरिक त्यांच्या दिवंगत नातेवाईकांच्या स्मृती जपण्यासाठी झाडे लावतात. तसेच या ठिकाणी झाडे लावल्यानंतर त्याची देखभाल किंवा त्याच्या वाढीकडे लक्ष देण्यासाठी झाडावर दिवगंत व्यक्तीच्या नावाचे फलक लावले जातात.
आतापर्यंत नागरिकांनी या ठिकाणी शेकडो झाडे लावली आहेत. त्यामुळे हे स्मृतीवन आता हिरवेगार झाले आहे. स्मृतीवन हे शहरासाठी एक ऑक्सिजन सेंटर बनले आहे. शहरातील सर्वाधिक हिरवाई या २३ एकराच्या परिसरात शहराच्या हवेच्या शुद्धतेसाठी योगदान देत आहे.
पितृ पंधरवड्यात नागरिकांनी त्यांच्या पूर्वजाच्या स्मृती जपण्यासाठी छत्रपती संभाजी तलाव परिसरातील स्मृती वनात रोपे लावावी. रोपे लावतानाचा फोटो व तपशील सकाळच्या व्हॉटसअप क्रमांक ७२१९६१११५६ वर पाठवावेत. निवडक छायाचित्रास सकाळच्या अंकात प्रसिद्धी दिली जाईल.
प्रिय व्यक्तींच्या च्या स्मरणार्थ वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. पितृपंधरवड्यात अशीच झाडे लावण्यात यावीत. यासाठी सामाजिक वनीकरण विभाग सज्ज आहे. ज्यांना झाडे लावायची आहेत त्यांना रोपे व झाडे लावण्यासाठीची जागा स्मृतीवन विजापूर रोड येथे उपलब्ध करुन देण्यात येईल.
- मनिषा पाटील, विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर
पितृपंधरवड्यात महालय श्राद्ध विधी केला जातो. त्यासोबत पूर्वजांच्या स्मृती जपण्यासाठी कोणतेही विधायक व दानकारक उपक्रम राबवले तर ते अधिक चांगले होईल. कारण दान हे नेहमीच आपल्या संस्कृतीत पूण्यकारक मानले जाते.
- मोहन दाते, पंचांग कर्ते, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.