ashwini gadgil
ashwini gadgilsakal

सेवेचा वसा

पुण्यामध्ये १९९७ मध्ये चेतना परिषद भरली होती. त्यावेळी पेणमधल्या सामाजिक कामामध्ये असलेल्या काही महिला या परिषदेसाठी आल्या होत्या.
Published on

- अश्विनी गाडगीळ, अध्यक्ष, अहिल्या महिला मंडळ, पेण

पुण्यामध्ये १९९७ मध्ये चेतना परिषद भरली होती. त्यावेळी पेणमधल्या सामाजिक कामामध्ये असलेल्या काही महिला या परिषदेसाठी आल्या होत्या. त्या परिषदेत त्यांना अनेकांचे अनुभव ऐकून वा अनेकांची कामे पाहून प्रेरणा मिळाली. त्यावेळी त्या सगळ्या जणींना वाटलं, की आपणही आपल्या भागामध्ये काहीतरी एकत्रित येऊन करावं. त्यावेळी या सर्वजणींनी एकत्र येऊन अहिल्या महिला मंडळाची स्थापना केली.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या महिलांनी त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘अहिल्या महिला मंडळ’ स्थापन केले. या मंडळाच्या संस्थापक वासंती देव या आहेत. मी २०११ पासून या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम बघत आहे.

मंडळामध्ये असणाऱ्या सर्वजणी गृहिणी होत्या, त्यामुळे आम्ही मोठा खर्च असलेले काही लगेच सुरू करू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही परत आल्यानंतर काही बैठका घेतल्या आणि काय काम आपण करू शकतो यावर चर्चा करायला सुरुवात केली. सुरुवातीला असं ठरलं, की महिलांशी संबंंधित असणारं काम करूया.

पेणच्या परिसरात आदिवासी पाडे आहेत. तिथल्या स्त्रियांची स्थिती खूप वेगळी होती. त्यावेळी महत्त्वाचं होतं ते म्हणजे त्या महिलांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य आणि त्यानंतर स्त्री सक्षमीकरण. म्हणजे तिला तिच्या क्षमता आणि कौशल्य ओळखून काय रोजगार देऊ शकतो यावर विचार करायला सुरुवात केली. त्यांना असं काम द्यायचं होतं, की त्या घरदार, शेती व्यवसाय, मुलंबाळं सांभाळून करू शकतील आणि स्वतःला सक्षम करू शकतील.

या सर्वांची सांगड घालून काय करू शकतो यावर विचारमंथन करून आम्ही मार्ग काढला. तिथे कौटुंबिक कलह मोठ्या प्रमाणात होते. वृद्धांच्याही समस्या होत्या. अनेक वृद्ध होते ज्यांची मुलं परदेशात होती. काहींची मुलं अपंग होती जी त्यांच्या आई-वडिलांचा सांभाळ करू शकत नव्हती किंवा काही वृद्धांना कोणत्याही प्रकारचा आधार नव्हता. म्हणून त्यावेळी वृद्धाश्रम किंवा वृद्धांसाठी काम देखील करायला सुरुवात केली.

शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि समाजस्वास्थ्य या चार सूत्रांवर अहिल्या महिला मंडळाचे काम करायला सुरुवात झाली. हे सर्व करता करता आता सध्या दहा ते बारा प्रोजेक्ट या माध्यमातून सुरू आहेत. या मंडळाचे काम पेण आणि परिसरात मोठ्या प्रमाणात चालते. आता सध्या महिला मंडळाच्या अंतर्गत दोन वृद्धाश्रम, एक पोळी भाजी केंद्र, आदिवासी भागात धरणग्रस्त विस्थापितांच्या मुलांसाठी बालवाडी ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा आदी कामं सुरू आहेत. पेणजवळच्या एका ठिकाणी ही शाळा गेली पंचवीस वर्षं तिथे आम्ही चालवत आहोत. या शाळेच्या पहिल्या बॅचची मुलं इंजिनिअर, डॉक्टर झाली आहेत. त्यांनी केलेली प्रगती पाहून केलेल्या कामाचं सार्थक झालं, असं वाटतं.

येथील आदिवासी पाड्यातील अनेक मुली आहेत, ज्यांच्या घरचे त्यांच्या शिक्षणाचा खर्च करू शकत नाहीत, अशा अनेक मुलींचा खर्च आमची संस्था करते, त्यांच्यासाठी वसतिगृह आम्ही चालवतो. महिला सक्षमीकरणांमध्ये आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात काम आम्ही केली आहेत. समाजप्रबोधनासाठी विविध व्याख्यानांचं आयोजन करणं, आदी अनेक उपक्रम इथं राबवले जातात.

याबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही संस्कृत पाठशाला चालवतो ज्यामध्ये वीस महिला अशा आहेत, ज्या संपूर्ण पौरोहित्य करतात. एक अनुसूचित जाती जमातीमधली मुलगी होती. ती खूप हुशार होती. तिला सुरुवातीपासूनच संस्थेने सांभाळलं होतं, आता ती दहावीला संस्कृत शिकवते. कौटुंबिक सल्ला केंद्र, स्त्री आधार केंद्रही आम्ही चालवतो.

स्त्रियांना कौटुंबिक कलहातून बाहेर काढल्यानंतर, तिला कसलाही आधार नसतो. अशा वेळी तिला जितके दिवस गरज आहे तोपर्यंत तिच्या राहण्याची सोय या स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून केली जाते.

(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com