वाचनाचा समृद्ध ‘ज्ञान’मार्ग

मला वाचायला फार आवडतं. आपल्या जीवनात आपण जितक्या सहजतेनं श्वास घेतो, तितकंच वाचन माझ्यासाठी सहज आहे.
Reading Hobby
Reading Hobbysakal
Updated on

मला वाचायला फार आवडतं. आपल्या जीवनात आपण जितक्या सहजतेनं श्वास घेतो, तितकंच वाचन माझ्यासाठी सहज आहे. वाचनाबरोबरच संगीत ऐकणं, स्वयंपाक आणि भटकंती हेसुद्धा माझे छंद आहेत; पण वाचन हा छंद म्हणण्यापेक्षा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. काम करत असो किंवा नसो पुस्तकं माझ्यासोबत कायम असतात.

खूप लहानपणापासून मला वाचण्याची आवड लागली. माझ्या वडिलांनी फार लहानपणापासूनच मला पुस्तकं वाचायची सवय लावली होती. सुट्टी लागायची त्यावेळी माझे बाबा माझ्यासाठी प्रवासाच्या बॅगा असतात तशा बॅगा भरून पुस्तकं घेऊन यायचे आणि मला ती पुस्तकं कधी वाचून संपवते असं व्हायचं. मी त्यावेळी लहान होते. त्यामुळे अर्थात मी त्या वयाला साजेसं असं बालसाहित्यच वाचायचे.

मला ते साहित्य कधी बोअर झालं नाही, उलट वाचनाची आवड वाढली. पुढे-पुढे त्या त्या वयानुसार पुस्तकं वडील आणून देऊ लागले आणि मी ती वाचत गेले. माझ्या वाचनाच्या आवडीसंदर्भात माझ्या वडिलांनी फार महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. ही आवड निर्माण करून देण्यामध्ये सगळं श्रेय त्यांचेच आहे.

तेही खूप वाचन करायचे, त्यामुळे माझ्या न कळत्या वयातही माझ्याकडून बरीचशी पुस्तके त्यांनी वाचून घेतली होती आणि त्यामुळे मला ती पुस्तकं आपली वाटायला लागली. न कळत्या वयातही पुस्तकांची गोडी लागू शकते, हे आता मला माझ्या मुलीमुळे कळत आहे. माझी मुलगी दोन वर्षांची आहे. तिला पुस्तकं वाचता येत नाही; मात्र अनेक पुस्तकांची नावं ती खूप छान सांगते.

मी शूटिंग करत असले, फिरायला गेले तरी माझ्याकडे पुस्तकं असतातच. शूटिंगमध्ये वेळ मिळाला तर मी पुस्तकं वाचते. पुस्तकांमुळे माणूस बहुश्रुत होतो, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी स्वतः न अनुभवताही पुस्तकाच्या मदतीनं समजू शकतात. मी सर्व प्रकारची पुस्तकं वाचते.

वाचनासंदर्भात काहीतरी करण्याची इच्छा खूप आहे; पण त्याला अजून मूर्त रूप आलेले नाही. मी जेवढ्या लोकांना भेटते, ज्या-ज्या व्यासपीठांवर जाते, ज्या मुलांसंदर्भात कार्यक्रम करते, त्या ठिकाणी मी स्वतः सांगते, की आपल्या मुलांना वाचनाची सवय आणि चांगल्या पुस्तकांची सवय लावण्याची जबाबदारी मोठ्यांची आहे.

माझ्या वाचनाच्या सवयीत माझ्या वडिलांचा वाटा आहे, तसाच महत्त्वाचा वाटा माझे मार्गदर्शक डॉ. आ. ह. साळुंखे सर यांचाही आहे. त्यांची सगळीच पुस्तकं माझ्यासाठी कायम प्रेरणादायी आहेत आणि ती माझ्या खूप जवळची आहेत. त्यातील ‘विद्रोही तुकाराम’ हे माझं आवडतं पुस्तक आहे. ‘तुझ्यासह तुझ्याविना’ हेही आवडतं.

आपण काय वाचावं आणि काय वाचू नये, हे सांगण्यासाठी काही माणसं आपल्या आयुष्यात लागतात. तसे ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. माझ्या वाचन प्रवासात त्यांचंही स्थान महत्त्वाचं आहे. मंगळवेढा येथून ‘शब्दशिवार’ नावाचा एक दिवाळी अंक प्रसिद्ध होतो. इंद्रजित घुले त्याचे संपादक आहेत.

त्या अंकाची गेल्या अनेक वर्षांपासून मी सहसंपादिका आहे, त्यामुळे त्या अंकातल्या अनेक लेखांचं वाचन करण्याची संधी मला मिळते. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरची पुस्तकं मी सतत वाचत असते आणि त्यांचे विचार मला कायमच जवळचे वाटतात.

सध्याच्या काळात पुस्तक वाचणं किंवा पुस्तकं शोधणं हे अत्यंत सोपं झालेलं आहे. आता तुम्ही पुस्तकाच्या दुकानात गेलात, तर पुस्तकांचे छान कप्पे केलेले असतात. यामुळे पूर्वीसारखी फार पुस्तकं शोधत बसायची गरज भासत नाही. इंटरनेटवरूनही एका क्लिकवर पुस्तकं आपल्या आवडीनुसार शोधून आपण ती घेऊ शकतो. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीसंदर्भात असणारी पुस्तकं आपण घेतली, तर ती वाचायचा अजिबातही कंटाळा येत नाही. त्यामुळे सुरुवातीला तरी आपल्या आवडीच्या विषयांपासून पुस्तकं वाचायला सुरुवात करावीत.

जे छंद तुमच्या ज्ञानामध्ये भर घालतील, तुम्हाला शांत करतील, आनंद देतील, ते छंद माणसानं स्वीकारायला हवेत. आजच्या आधुनिक युगात सतत पैसा मिळवणं, सुट्ट्या सेलिब्रेट करणं, हा आनंद वाटायला लागला आहे. हे कराच; परंतु यापलीकडे जाऊनही खरा आनंद काय आहे, हे शोधण्यासाठी जे मदत करणारे छंद आयुष्यभर माणसानं जोपासायला हवेत.

ज्ञानात भर पाडणारा आनंद अर्थातच दीर्घकाळ टिकणारा असतो. सध्याच्या धकाधकीच्या काळात मनःशांती ही अतिशय दुर्मीळ गोष्ट झालेली आहे; मात्र वाचनासारखे छंद तुम्ही जोपासले तर तुमचं मानसिक, बौद्धिक, सामाजिक, नैतिक असं सर्वंकष आरोग्य निरोगी राहील.

(शब्दांकन : प्रज्ञा शिंदे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.