स्वतःच्या शोधाची ‘राइड’

माझा छंद म्हणजे फिरायला जाणं आणि हा छंद मी जोपासते माझ्या बाइकबरोबर. दोन अडीच वर्षांपूर्वी मी बाइक रायडिंग करायला सुरुवात केली.
shweta mehendale hobby bike riding
shweta mehendale hobby bike ridingsakal
Updated on

- श्वेता मेहेंदळे

माझा छंद म्हणजे फिरायला जाणं आणि हा छंद मी जोपासते माझ्या बाइकबरोबर. दोन अडीच वर्षांपूर्वी मी बाइक रायडिंग करायला सुरुवात केली. त्याच्या आधी माझ्या मनात कधी असा विचारही आला नव्हता की मी बाइक चालवेन. मी बाइक शिकलेही नव्हते. मी पडेन, मला लागेल, मला बाइक चालवता येणार नाही, अशा भीती मला वाटायच्या; पण ‘आपल्याला बाइक चालवता आली नाही, हे आयुष्यभर आपल्या मनाला लागत राहील, बाइकची भीती घालवावी लागेल, बाइक चालवावी लागेल,’ अशा सगळ्या विचारांमधून मी बाइक विकत घेतली आणि चालवायला लागले.

या सगळ्याचं मूळ होतं लॉकडाऊनच्या काळामध्ये. त्या काळात मोटोव्लॉगिंग हा प्रकार मला युट्यूबवरून कळला. मी एका मुलीचं युट्यूब चॅनेल फॉलो करते. ती जगभर बाइकवरून एकटी फिरत असते. ते माझ्यासाठी खूप इन्स्पायरींग होतं. अपेक्षा चोक्सी या माझ्या मैत्रिणीचे ट्रॅव्हलिंग व्लॉग्स आहेत. ते पाहून मला वाटलं, की आपणही हे सुरू करू शकतो. मोटोव्लॉगिंग हा नंतरचा भाग होता; पण सगळ्यात आधी मी बाइक घेतली.

‘पल्सर एन २५०’ ही माझी पहिली बाइक होती. तिचं नाव होतं ‘बबरू’. त्या बाइकवरून मी अनेक ठिकाणी फिरले, कोकणात गेले, गोव्याला गेले. बाइक विकत घेण्यापूर्वी मी जवळपास १२ बाइक्स बघितल्या. त्यावेळी माझ्याबरोबर यश प्रधान आणि राहुल दोघे यायचे आणि मग ही बाइक मला झेपेल का, पाय पुरतायत का, बाइक कशी आहे, तिचे फिचर्स काय आहेत, हे तेच दोघं ठरवायचे.

या सगळ्या गोष्टी त्या दोघांना व्यवस्थित कळायच्या. मग सगळं बघून झाल्यावर आम्ही ‘पल्सर एन २५०’ घेतली. मला ती चालवता येत नव्हती, मग मी सोसायटीमध्येच चालवायला शिकले. राहुल मला सोसायटीच्या आवारात शिकवायचा. कार मला आधीपासूनच चालवता येत होती. त्यामुळे गिअर कसा टाकायचा वगैरे बेसिक गोष्टी कळत होत्या; पण बाइक कशी चालवायची हे माहीत नव्हतं.

हळूहळू मी ते माझं माझंच शिकत गेले. सराव करत गेले. नंतर मी बाइक शूटिंगला घेऊन जाऊ लागले. मग मला मुंबईच्या ट्रॅफिकची सवय होऊ लागली आणि आत्मविश्वास आला. शूटिंग संपलं, की मी मुंबईतल्या मुंबईत बाइक चालवायचे. मग खंडाळ्याला जा, पुण्याला जा, असं करत होते. हळूहळू मोटोराइड, मोटोव्लॉगिंगला सुरुवात केली.

ते मला यशनं सुचवलं. ‘तू बाइक घेऊन फिरणारच आहेस, तर त्याचा उपयोगही कर आणि मोटोव्लॉगिंग सुरू कर,’ असं तो म्हणाला. मग मी माझं ‘श्वेता मेहेंदळे’ नावानं युट्यूब चॅनेल सुरू केलं. मग मी ‘बबरू’बरोबर कोकण दौरा केला, गोव्याला गेले.

या सगळ्या राइड्सच्या दरम्यान अनेक किस्से घडतच असतात; पण आठवणीत राहिलेला एक किस्सा म्हणजे मी कोकण दौऱ्यावर असतानाचा. तेव्हा मी पेण क्रॉस केलं आणि मला गळ्याजवळ काहीतरी टोचत होतं. त्यामुळे हायवेवर असतानाही त्या त्रासामुळे बाइक बाजूला घेतली. बाइक बाजूला घेतल्यावर पाहिलं, की मला मधमाशी चावत होती. आमचं राइडचं हेल्मेट फुल फेस असतं. त्याच्यात मी जॅकेट घातलेलं. त्यामुळे ती मधमाशी गळ्याजवळ पोहोचून मला चावली कशी काय, हे मला कळलंच नाही.

ते खूप टोचत होतं आणि मी कशीबशी चालले होते. त्यावेळी मी अशा ठिकाणी होते, की आजूबाजूला काही वैद्यकीय सुविधाही नव्हत्या. आता अशावेळी रस्त्यावरची माती लावायची असते; पण हायवेला मातीही फारशी नव्हती. त्यामुळे मी लाळ त्या जखमेवर लावली. आपली लाळ फार गुणकारी असते. ती लावून मी पुढे निघाले. मला माणगावला पोहोचायचं होतं. थोडा वेळ झोंबलं; पण दुखणं, आग होणं लवकर कमी झालं. हा किस्सा माझ्या लक्षात राहिला.

या सगळ्या आठवणी आणि त्यातून मिळालेलं शिक्षण आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. मी कितीही सांगितलं, तरी मी प्रत्यक्ष अनुभवलेलं दुसरं कोणी अनुभवू शकणार नाही. जेव्हा तुम्ही हा प्रवास करता, तेव्हा तो प्रवास फक्त गाडीबरोबर नसतो, तर तो स्वतःबरोबरही असतो. या प्रवासात तुम्ही स्वतःला शोधत जाता. तुम्ही स्वतःला नव्यानं शोधता, नव्यानं स्वतःला भेटता.

हा माझ्या या छंदाचा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. माझ्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचं शूटिंग सुरू झालं, त्या दरम्यान मी ‘रॉयल इनफिल्ड मीटियॉर ३५०’ घेतली. तिच्यावरून मी सातारा राईड केली; पण शूटिंगमुळे मला पुरेसा वेळ आता मिळत नाही. मात्र, मी जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा हे करत असते. हे माझं पॅशन आहे, असं म्हणता येईल.

(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर-इंगळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.