- डॉ. समीरा गुजर-जोशी
मैत्रिणी, मला अजून ती रविवार दुपार अगदी स्पष्ट आठवते आहे. मी तिसरीत असेन बहुतेक. गृहपाठ करत होते. शेजारी बाबा पेपर वाचत बसले होते. मी मराठीचा अभ्यास करत होते. म्हणींचे अर्थ लिहायचे होते. एक म्हण समोर आली, ‘नाचता येईना अंगण वाकडे.’ मी जरा थांबले. मला काही चटकन याचा अर्थ कळेना.
मी बाबांना विचारलं, ‘नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे काय?’ बाबा म्हणाले, ‘खूप छान म्हण आहे ही. परीक्षेत नाही आयुष्यातही लक्षात ठेवावी अशी. कारण अपयश पचवणं खूप अवघड गोष्ट असते. एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही, तर त्याचं खापर कशावर फोडता येईल, याचा बहुतेक जण आधी विचार करतात. या म्हणीत सांगितल्याप्रमाणे बहाणे सांगतात.
स्वतःला नाचता येत नाही हे मान्य न करता अंगण वाकडं असल्याचे कारण पुढे करतात. पण पी. टी. उषासारखे काही जण असतात, की त्यांच्याकडे काहीही नसतं; पण वेळ पडली तर ते जिद्दीने नवीन अंगण तयार करतात.’ पी. टी उषा नावाचं वादळ माझ्या आयुष्यात शिरलं ते या क्षणाला. मी बाबांना विचारलं, ‘कोण पी. टी उषा?’ बाबांनी शेजारचा पेपर उचलून त्यातला तिचा फोटो दाखवला. मला अजून तिची ती छबी आठवते आहे.
फिनिशिंग लाइनवरचा विजेते हसू चेहऱ्यावर असणारी, उंच, शिडशिडीत, काळी- सावळी मुलगी. तिचं ते तोंडभर हसू आणि चेहऱ्यावर चमकणारा आत्मविश्वास. मी त्या कोवळ्या वयात तिच्या प्रेमात पडले ती अगदी आजपर्यंत. मीच कशाला किती हजारो, लाखो भारतीय मुली आणि खेळाडूंची प्रेरणा ठरली आहे ती. कालच कुठंतरी वाचलं, की पी. टी उषा या २७ जूनला साठाव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि एकदम या सगळ्या आठवणी मनात जाग्या झाल्या.
गुरू- शिष्य नातं किती महत्त्वाचं असतं हेही तिच्या गोष्टीतून कळतं. एक शालेय शिक्षक काय करू शकतो! बालकृष्णन नावाचे शिक्षक होते. त्यांनी पी. टी उषाला खेळताना पहिलं. तिच्या धावण्यातली चपळाई त्यांच्या नजरेत भरली. चौथीतल्या उषाला त्यांनी सातवीत असणाऱ्या, शाळेत सगळ्यात वेगवान धावणाऱ्या मुलीबरोबर धावायला लावले.
वय, ताकद, अनुभव सगळ्या दृष्टीनं ती मुलगी उषापेक्षा सरस होती; पण पी. टी उषाला त्याचं काय? तिला फक्त धावणं माहीत होतं. ती धावली आणि ती जिंकली. त्या शिक्षकाला खात्री पटली, की ही मुलगी वेगळी आहे. मग ती शाळेसाठी स्पर्धा जिंकत राहिली. मग ओ. एम. नंबियार सरांसारखा गुरू तिला लाभला. आज कोणताही खेळ खेळायचा, तर आपल्याला आधी त्या खेळाचा किट मला हवा असतो.
तोही साधासुधा नको, अमुकच हवा वगैरे सगळं असतं.... पण पी. टी उषाला ऑलिंपिकला जाईपर्यंत ट्रॅक पॅन्ट आणि रनिंग शूजदेखील माहीत नव्हते. तिला मातृभाषा मल्याळम सोडली, तर दुसरी भाषा येत नव्हती. स्वभाव थोडासा लाजाळू होताच. जेवणाचा हॉल कुठं आहे हे विचारायलासुद्धा लाजणारी होती.
मग ती पोहचायची जेवायला, तोवर बहुधा जेवण संपत आलेलं असायचं. खेड्यात वाढलेल्या या मुलीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या ठिकाणी जेवणातील अनेक पदार्थ ओळखीचेही नसायचे. मग भाताबरोबर स्वतःसोबत असलेलं लोणचं खाऊन तिनं दिवस काढले; पण तक्रार किंवा कुरकुर केली नाही.
आपल्या मागच्या म्हणीसंदर्भात सांगायचं, तर तिला उत्तम नाचता येत असल्यामुळे तिनं अंगणाविषयी कधी तक्रार केली नाही आणि आता तर ती अंगणसुद्धा तयार करते आहे. हो, बघा ना, एका भारतीय खेळाडूला ऑलिंपिक स्पर्धेत काय अडचणी येतात हे जिला व्यवस्थित माहिती आहे, अशी पी. टी उषा यंदाच्या पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय खेळाडूंसाठी इंडिया हाऊस तयार करत आहे.
इंडियन ऑलिंपिक संघटना अर्थात IOA ची अध्यक्ष या नात्याने ती या ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंचं नेतृत्व करते आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेची ती पहिली महिला अध्यक्ष आहे. ज्या ऑलिंपिकमध्ये यशानं तिला सेकंदाच्या शंभराव्या हिश्श्यानं हुलकावणी दिली होती, तिथंच आज साठाव्या वाढदिवशी ती अतिशय उत्साहानं भारतासाठी यशाचा नवा अध्याय लिहायला उत्सुक आहे.
आज तिच्या कल्पनेतून पॅरिसमधल्या इंडिया हाऊसमध्ये खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी मेंटल हेल्थ सेल आहे, खेळाडूंना पौष्टिक असं भारतीय जेवण मिळेल यासाठी खास सोय आहे, खेळानंतर रिकव्हरी सोपी व्हावी म्हणून खास सोयी आहेत. पाहता पाहता पी. टी उषानं आपल्या ‘स्लो, बट स्टेडी’ वृत्तीनं ‘वाकडं अंगण सरळ केलं आहे!’ कम ऑन उषा.. कीप रनिंग.. इंडिया नीड्स यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.