‘यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते'', या पुरुषप्रधान संस्कृतिप्रिय वाक्याला मागे टाकत त्याच स्त्रीने पुरुषांनाही ‘ओव्हरटेक’ केले आहे.
‘यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते', या पुरुषप्रधान संस्कृतिप्रिय वाक्याला मागे टाकत त्याच स्त्रीने पुरुषांनाही ‘ओव्हरटेक’ केले आहे. आपणही पुढे जायचे, या जिद्दीने, चिकाटीने आणि आत्मनिर्भर होण्याच्या ऊर्मीने ती धडपड करते आहे. ती व्यवसायात पाय रोवून उभी राहिली आहे. स्वतःतील कलाकौशल्यांना तिने पंख दिले. स्वतः सोबत इतर महिलांच्या हातालाही काम दिले. अशीच एक रणरागिणी म्हणजे कंचन मेहता.
राजस्थानातील एका छोट्या गावातून घुंगटमध्ये आलेल्या कंचन यांच्या कर्तृत्वाला महाराष्ट्राने एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. एखाद्या चित्रपटासारखा कंचन यांचा प्रवास आहे. १९९५ ला पती व दीड वर्षाच्या मुलीला घेऊन कंचन या मुंबईत आल्या. एका ब्युटिपार्लरमध्ये जॉब करत असताना ब्युटिशियनचे बारकावे त्यांनी शिकून घेतले. मात्र, मुंबईत जम बसणे कठीण असल्याचे लक्षात येताच दोन वर्षात त्यांनी औरंगाबाद गाठले. त्यांचा हा निर्णय आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. १९९७ ला कंचन यांनी भाग्यनगरमध्ये छोटेखानी ब्युटीपार्लर सुरु केले.
मात्र, जोपर्यंत समाजाचा विश्वास बसत नाही, तोपर्यंत कुठलाही व्यवसाय यशस्वी होत नाही. ब्युटिपार्लरमध्ये महिलांसाठी नवीन ट्रेंड काय आहे, आधुनिक काळाची गरज ओळखत त्यांनी अल्पावधीतच महिलांचा विश्वास संपादन केला. जिद्द, चिकाटी, संघर्ष आणि कठोर परिश्रमामुळे कंचन यांनी आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आता त्या शहरातील गरजू, होतकरू महिलांना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देत आहेत. मागील २५ ते ३० वर्षात कंचन यांनी शंभरपेक्षा जास्त गरीब घरातील मुली, महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन अनेकांनी स्वतःचे ब्युटी पार्लर सुरु केला आहे. काही महिला आजही त्यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी जीवन जगत आहेत.
‘एका खुर्चीपासून सुरू झालेला प्रवास एका उत्कृष्ट ब्युटिशियनपर्यंत पोचला आहे. ब्युटिशियन म्हणजे फक्त मेकअप करणं नाही, आपल्या मनानं, शरीरानं सगळ्या गोष्टीनं ती ब्युटी असली पाहिजे. तिचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि इतरांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असला पाहिजे. तसेच महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि आत्मनिर्भर होणे काळाची गरज आहे.’
- कंचन मेहता, ब्युटिशियन, लाबेला ब्युटी पार्लर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.