महाविद्यालय आणि विद्यापीठांतील एकूण विद्यार्थ्यांसाठी असणारी ही शिष्यवृत्ती योजना विद्यार्थिनींसाठी देखील आहे. या शिष्यवृत्तीची केंद्रीय क्षेत्र योजना २००८ पासून कार्यान्वित आहे. वार्षिक साडेचार लाख रुपयांपेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच विद्यार्थिंनींना आर्थिक साह्य प्रदान करणे, त्यांच्या दैनंदिन खर्चाचा काही भाग उचलणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
दरवर्षी शैक्षणिक वर्षात ८२ हजार जणांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यांत ४१ हजार मुलींसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. १८ ते २५ वर्षे वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ही योजना आहे. संबंधित मंडळामार्फत घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या नियमित उमेदवाराला ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले असणे, आणि अन्य कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ न घेणारे या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. या शिष्यवृत्ती अंतर्गत पहिल्या तीन वर्षांसाठी दर वर्षाला १२ हजार रुपये आणि चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी २० हजार रुपये (प्रतिवर्ष) दिले जातात.
महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या विद्यार्थिनींसाठी (विद्यार्थ्यांसह) शिष्यवृत्तीची केंद्रीय क्षेत्र योजना एक जून २०१३ पासून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अंतर्गत समाविष्ट आहे. शिष्यवृत्ती पीएफएमएस गेटवे वापरून डीबीटी मोडद्वारे शिष्यवृत्ती प्राप्तकर्त्याच्या बचत बँक खात्यात थेट वितरित केली जाते.
ही ‘महाविद्यालय आणि विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची केंद्रीय क्षेत्र योजना’ एक ऑगस्ट २०१५पासून ‘http://www.scholarships.gov.in’ या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर देखील उपलब्ध आहे. याचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या खूप कमी असल्यामुळे विशेषत: विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, म्हणून आपण या शिष्यवृत्तीची माहिती इथे दिली आहे. विद्यार्थिनी या योजनेची मार्गदर्शक तत्त्वे संबंधित संकेतस्थळावर जाऊन पाहू शकतात; तसेच राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे विद्यार्थिनींना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ -
केंद्रीय शिक्षण मंत्रालय : https://www.education.gov.in/scholarships-education-loan-0
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल : http://www.scholarships.gov.in
(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.