नृत्यातील भाव आईपणामुळे प्रगल्भ

मला आईपणाची चाहूल लागली, तेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये काम करत नव्हते. मी २००६ मध्ये इंडस्ट्रीत आले. मला २००४ मध्ये मी आई होणार असल्याचं कळलं तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता.
Choreographer phulwa khamkar
Choreographer phulwa khamkarsakal
Updated on

- फुलवा खामकर, नृत्यदिग्दर्शिका

मला आईपणाची चाहूल लागली, तेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये काम करत नव्हते. मी २००६ मध्ये इंडस्ट्रीत आले. मला २००४ मध्ये मी आई होणार असल्याचं कळलं तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. तीन-चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला मुलगी झाली आणि तिचं नाव आम्ही ‘आस्मां’ ठेवलं. खूप वैद्यकीय अडचणींनंतर बाळ झालं, तेव्हा तो क्षण अविस्मरणीय होता.

वैद्यकीय कारणांमुळे मला बाळ होण्याची शक्यता ५० टक्केच होती; पण चार-पाच वर्षांच्या प्रयत्नांनंतर बाळ व्यवस्थित जन्माला आलं आणि त्यामुळे खूप भारी वाटलं. आईपणाच्या प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेतला. गर्भावस्थेच्या काळात मी स्वतःवर खूप लक्ष दिलं. बाळासाठी काय वाचलं पाहिजे, काय करावं, हे सगळं सविस्तर पार पाडलं.

मी कथक विशारद झाले होते आणि त्याचं प्रमाणपत्र मला मिळालं होतं. गांधर्व महाविद्यालयात कार्यक्रम होता आणि मी नवव्या महिन्यात इतकं मोठं पोट घेऊन पुरस्कार घ्यायला आले होते.

आईपण आणि करिअर याची कसरत करताना मला थोडीफार तडजोड करावी लागली. म्हणजे आपलं वेळापत्रक थोडं हलतं, झोपेच्या आणि खाण्याच्या वेळा बदलतात. पहिलं प्राधान्य बाळालाच असतं. ही तडजोड माझ्यासाठी आवश्यक होती. बाकी आयुष्यात फार मोठे बदल करावे लागले, असं कधी वाटलं नाही, कारण मला बाळ हवं होतं आणि ते मिळालं, हे माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी खूप नैसर्गिक होतं.

अजून एका जीवाला या जगात आणण्याचा विचारच इतका भारावून टाकणारा होता, की आम्ही कोणतीही तडजोड करण्यास तयार होतो. काही गोष्टी प्रेमाने झाल्या, की त्यात तडजोड वाटत नाहीत. अनेक लोक म्हणतात, की, आई झाल्यावर करिअरवर बंधन येतं; पण खरंतर बाळासोबतचा प्रवास इतका सुंदर असतो, की ती तडजोड अजिबात त्रासदायक वाटत नाही.

आईपणाची चाहूल लागल्यानंतर नृत्याच्या क्लासेसमुळे मला मदतीसाठी एक मदतनीस शोधावी लागली. कारण मला माहिती होतं, की आपल्याला कुठेतरी मदतीसाठी कोणीतरी लागणार आहे. माझी आई आणि नवरा होतेच माझ्यासोबत; पण बाळासाठी एक मदतनीस हवी होती. आस्मा जन्मल्यापासून ती मदतनीस आमच्यासोबत होती.

आई झाल्यानंतर स्त्री शारीरिक आणि मानसिक बदलातून जात असते. आता विविध गोष्टींसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे माझ्या वेळी नव्हते. माझ्या मैत्रिणी आता स्तन्यपानाऐवजी दूध बाटलीत काढून फ्रीजमध्ये ठेवून देतात. त्यामुळे करिअर सांभाळूनही आईपण शक्य आहे.

आई झाल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने आई-बाबा दोघांना कष्ट घ्यावे लागतात. बाळाला दूध पाजणं, त्याचं खाणं-पिणं, सगळं व्यवस्थित करणं हे आई करत असली, तरी तिला झोपेचीही गरज असते. इथं नवऱ्याची साथ महत्त्वाची असते. त्यामुळे बाळाची जबाबदारी आई आणि बाबा दोघांनी एकत्र पार पाडली पाहिजे.

मुल जन्माला आल्यानंतर पहिल्या वर्षात विशेषतः पहिले दीड-दोन महिने एकमेकांना सांभाळून घेणं खूप गरजेचं आहे. कारण बाळ स्तन्यपानावर असतं. मला चार-पाच महिने जास्त कसरत करावी लागली, कारण माझं बाळ चार-पाच महिने स्तन्यपानावर होतं. सुरुवातीच्या सहा महिन्यांत मला ब्रेस्ट मिल्क खूप जास्त होतं, त्यामुळे जरा जड जाणवायचं. माझी पूर्वीची व्यायामशाळा आणि नृत्याचे क्लासेस एकदमच बंद झाल्यामुळे मला ब्लोटिंग व्हायची. आस्मां झोपल्यावर मी थोडं वर्कआउट करायची आणि सगळं मॅनेज करत असे.

एक नक्की की, आईपणामुळे करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. फक्त करिअरकडे बघण्याचा नाही, तर एक मानसिक आणि शारीरिक बदल झाला, जो प्रत्येक स्त्रीमध्ये असावा. याचा सकारात्मक परिणाम माझ्या नृत्यावरही झाला. मी पूर्वीचं नृत्य बघते आणि बाळ झाल्यानंतरचं नृत्य बघते, तेव्हा खूप फरक जाणवतो. माझ्या नृत्यातील भाव अधिक प्रगल्भ झाले. आई झाल्यानंतर तुमचं व्यक्तिमत्त्वही अधिक समृद्ध होतं, हा अनुभव मी घेतला आहे.

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स

  • आईपणाचा निर्णय घेताना मनाची पूर्ण तयारी असणं आवश्यक आहे. आई होण्याचा प्रवास शारीरिक आणि मानसिक बदलांनी भरलेला असतो, त्यामुळे मनानं तयार असलात तरच हा निर्णय घ्या.

  • बाळाची जबाबदारी दोघांची असते, याची जाणीव नवरा आणि बायको दोघांना हवी.

  • आपण अनेक शारीरिक व मानसिक बदलातून जातो आणि ते खूप सामान्य आहे. ती वेळ काही काळाने निघून जाते.

  • करिअर सांभाळून बाळाची काळजी घेता येते; पण वेळ आणि कामाचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. सुपरवुमन बनण्याची गरज नाही, कारण त्यानं आईची अनावश्यक ओढाताण होऊ शकते.

  • स्त्रियांनी स्वतःची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. खाणं-पिणं, व्यायाम हे व्यवस्थित केलच पाहिजेत.

(शब्दांकन : आकांक्षा पाटील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.