मुंबई : धूम्रपान ही सोडून देण्यास कठीण सवय आहे. global adult tobacco survey (जीएटीएस) नुसार भारतात कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे सेवन अगदी सामान्य झाले आहे आणि भारतात २६७ दशलक्ष व्यक्तींना तंबाखूचे व्यसन आहे. लोकांना तंबाखू सेवनाचे हृदय, श्वसनसंस्था इत्यादींवर होणारे घातक परिणाम माहीत असताना देखील अनेकांना माहीत नाही की तंबाखूच्या व्यसनामुळे डोळ्यांवर परिणाम होऊन दृष्टी कमी होऊ शकते.
तज्ज्ञांनी धूम्रपान आणि दृष्टी जाण्याच्या कारणांदरम्यान असलेल्या प्रत्यक्ष संबंधांचा अभ्यास केला आहे. मुंबई रेटिना सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विट्रेओरेटिनल सर्जन डॉ. अजय दुधानी म्हणाले, ''धूम्रपानामुळे डोळ्यांना त्रास होण्यासोबत जळजळ होऊ शकते. धूम्रपानामुळे डोळ्यांचे आजार होण्याचा व ते अधिक बिकट होण्याचा धोका आहे आणि ते आजार म्हणजे एएमडी, मोतीबिंदू व काचबिंदू. एएमडी रूग्णांमध्ये धूम्रपानामुळे रेटिनाला ऑक्सिडेटिव्ह नुकसान होते आणि मॅक्युलामधून ल्युटीन कमी होते. खरेतर, धूम्रपानामुळे एएमडी १० वर्षे लवकर होऊ शकतो.''
धूम्रपानाचा डोळ्यांवर परिणाम होऊ शकण्याची कारणे
एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी) : धूम्रपानामुळे व्यक्तींमध्ये एज रिलेटेड मॅक्युलर डिजरेशन होण्याचा धोका वाढतो, ज्यामध्ये अत्यंत बारीक वस्तू पाहण्यास मदत करणा-या मॅक्युलाची (रेटिनाचा मध्यभाग) स्थिती अधिक बिकट होते. याचा प्रत्यक्ष दृष्टीवर परिणाम होतो आणि अंधुक दिसणे, विकृती आणि दृष्टीच्या मध्यभागी ब्लाइण्ड स्पॉट्स अशी लक्षणे दिसून येतात. तंबाखू डोळ्यातील पडद्यामधील रक्तप्रवाहात व्यत्यय आणते आणि त्यामुळे मॅक्युलर डिजनरेशन होते. धूम्रपानामुळे होणा-या ऑक्सिडेशनचा मॅक्युला पेशींवरही परिणाम होतो.
''एएमडी होण्याचा धोका कमी करण्याचा मार्ग म्हणजे धूम्रपान न करणे; रेटिनल आजारांमुळे दृष्टी कमी झाल्यास त्यावर उपचार होऊ शकत नाही. पण वेळेवर निदान केले तर रेटिनल आजारांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येऊ शकते. धूम्रपान करणा-यांना धूम्रपान न करणा-यांच्या तुलनेत एएमडी होण्याची तीन ते चार पट शक्यता असते. धूम्रपान करणा-यांसोबत राहणारे धूम्रपान न करणा-यांना एएमडी होण्याचा दुप्पट धोका असतो. अशा बहुतांश केसेसमध्ये वेळेवर पुरेशी काळजी घेतली नाही तर कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते. तसेच तंबाखूच्या धुराचा डोळ्यांभोवती असलेल्या उतींवर देखील परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे पापण्यांचा विकार होऊ शकतो आणि डोळ्यांखाली सूज येऊ शकते,'' असे पुण्यातील इनसाइट व्हिजन फाऊंडेशन येथील वैद्यकीय संचालक डॉ. नितीन प्रभुदेसाई म्हणाले.
डायबेटिक रेटिनोपॅथी
धूम्रपानामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. धूम्रपानामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींना मधुमेहाचे व्यवस्थापन करणे अधिक अवघड जाऊ शकते. धूम्रपानामुळे मधुमेहाच्या जटिलता अधिक बिकट होऊ शकतात. ''सिगारेट्समधील रसायनांचा शरीरातील पेशींवर घातक परिणाम होतो आणि जळजळ होते. तसेच निकोटिनमुळे रक्तातील शर्करेच्या पातळ्यांमध्ये वाढ होण्यासोबत त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड झाल्याने पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत. धूम्रपान करणा-या मधुमेही व्यक्तींना त्यांच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण लक्ष्य पातळ्यांपर्यंत ठेवण्यासाठी इन्सुलिनच्या उच्च डोसेसची गरज लागते. यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते आणि परिणामत: डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ शकते,'' असे डॉ. प्रभुदेसाई पुढे म्हणाले.
''डायबेटिक रेटिनापॅथी असलेल्या रूग्णांनी धूम्रपान टाळावे, कारण भविष्यात जटिलतांमध्ये वाढ होऊ शकते. अशा स्थितीत धूम्रपानामुळे रूग्णांना त्यांच्या अगोदरच कमकुवत झालेल्या रक्तवाहिन्या व डोळ्यांमधील मज्जातंतू अधिक खालावण्याचा धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की, पूर्वी धूम्रपान करणा-या व्यक्तींना धूम्रपान कधीच न केलेल्या व्यक्तींच्या तुलनेत नेहमीच अधिक धोका असेल, कारण काही नुकसान अगोदरच झालेले असते. उपचाराचे काटेकोरपणे पालन, नियमितपणे डोळ्यांची तपासणी आणि धूम्रपान सोडणे हे डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रमुख घटक आहेत,'' असे डॉ. दुधानी पुढे म्हणाले.
मोतीबिंदू : मोतीबिंदू हे जगभरात अंधत्वाचे प्रमुख कारण आहे, जे डोळ्यातील नैसर्गिक पारदर्शक लेन्स अंधुक करते. असे निदर्शनास आले आहे की धूम्रपान केल्याने ऑक्सिडेशनद्वारे लेन्समध्ये पेशी बदलू शकतात. तसेच, यामुळे लेन्समध्ये कॅडमियम सारखे हानीकारक धातू देखील जमा होऊ शकतात. यामुळे दृष्टी धूसर होते ज्यावर उपचार न केल्यास त्यावर सूज येते आणि डोळ्यात इतर जटिलता निर्माण होतात.
दृष्टी कमी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी काय करावे :
नियमितपणे डोळ्यांची तपासणी करा आणि उपचारांचे काटेकोरपणे पालन करावे. आरोग्यदायी आहार सेवन करा (हिरव्या पालेभाज्या, फळे आणि जीवनसत्त्व क, ई व बीटा कॅराटिनचे उच्च प्रमाण असलेले खाद्यपदार्थ). रक्तदाब व कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवा.
नियमितपणे धूम्रपान करणाऱ्या आणि डोळ्यांशी संबंधित समस्या टाळण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी डोळ्यांचे आजार होण्याचा धोका कमी करण्यासाठी धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करावा. डोळ्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे आणि डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी नियमितपणे डोळ्यांची तपासणी करावी. डोळ्यांच्या लेन्सवर विषारी घटक जमा होऊ शकतात आणि नियमित तपासणी करूनच डोळ्यांना होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.