सामाजिक कामाची ‘ऊर्जा’

‘उदयना’ या आमच्या ग्रुपने नुकतीच एकवीस वर्षे पूर्ण करून बाविसाव्या वर्षात पदार्पण केले आहे.
udayana group
udayana groupsakal
Updated on

- कल्पना देशपांडे, संचालिका, उदयना ग्रुप

‘उदयना’ या आमच्या ग्रुपने नुकतीच एकवीस वर्षे पूर्ण करून बाविसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. लेखिका, फोटोग्राफर, शिक्षक, कलाकार अशा विविध क्षेत्रांतील मैत्रिणींना एकत्र घेऊन हा ग्रुप सुरू करण्याची माझ्या मनात कल्पना आली. त्यांच्या व्यवसायात किंवा क्षेत्रात इतरांचा उपयोग व्हावा आणि त्यांच्यातील कलागुणांचा समाजाला उपयोग व्हावा हा त्यामागील उद्देश होता.

‘उदयना’ म्हणजे नव्याने उदयाला आलेली आणि इथे आल्यानंतर प्रत्येकीचा उदय, उत्कर्ष होणारा ग्रुप. या अनुषंगाने सभासदांचा सर्वांगीण विकास व्हावा हाही उद्देश हा ग्रुप स्थापन करण्यामागे होता. आमचा हा ग्रुप फक्त मौजमजा, विरंगुळा यासाठी नाही. सभासदांमध्ये काही ना काही गुणवैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे. तसेच सभासदांच्या विकासाबरोबरच समाजासाठी विधायक काम करणे हेही आमचे उद्दिष्ट आहे.

प्रत्येक महिन्याच्या मीटिंगमध्ये आम्ही निरनिराळ्या स्पर्धा, चर्चा, भाषणे, करमणुकीचे, तर कधी माहितीपूर्ण असे कार्यक्रम आयोजित करतो. याचबरोबर जागतिक महिला दिनानिमित्त समाजात ज्यांनी वेगळी वाट निवडलेली आहे अशा महिलेला आमंत्रित करतो.

त्यात गॅरेज चालवणाऱ्या महिलेपासून खगोलशास्त्राच्या अभ्यासिका, दिव्यांगांची संस्था चालवणारी महिला, सामाजिक कार्यकर्त्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांना आमंत्रित करतो.

आम्ही आपले पारंपरिक सण सामाजिक भान ठेवून ते वेगळ्या प्रकारे साजरे करतो. संक्रांतीला दानाचे महत्त्व असते.या अनुषंगाने ‘तुमचे अमूल्य दान, समाजासाठी असेल महान’ या उपक्रमाअंतर्गत संक्रांतीचे वाण म्हणून आम्ही सर्व सभासद; शिवाय इतरांकडून पैसे जमा करतो आणि एड्सबाधित, अनाथ, दिव्यांग, स्वमग्न, मतिमंद अशा मुलांच्या; तसेच निराधार, वृद्ध अशा व्यक्तींच्या संस्थांना ती मदत देतो.

यावर्षी आमची दोन लाख रुपये एवढी रक्कम जमली होती आणि ती अशा सहा संस्थांना आम्ही वितरित केली. नवरात्रामध्ये ‘तांदळाची ओटी, अनाथांच्या पोटी’ या उपक्रमाअंतर्गत आम्ही धान्य जमा करतो आणि तेही अशाच संस्थांना वितरित करत असतो. या वर्षी धान्यासाठी आमच्याकडे दीड लाख रुपये जमले होते. ही सर्व मदत संस्थांची पूर्ण चौकशी करून, प्रत्यक्ष संस्थेत जाऊन पोचवत असतो.

फक्त मदत न देता तेथील मुलांशी संवाद साधणे, मुख्य म्हणजे त्यांना थोडा आपला वेळ देणे हे आवर्जून करतो. हे काम अर्थातच सर्व सभासद आणि आम्हाला अनेक वर्षे जे दाते मदत करत आहेत त्यांच्यामुळेच शक्य होत आहे. आमचे हे काम कोविडकाळातही सुरू होतं. यावर्षी एकवीस वर्षपूर्तीनिमित्त आम्ही व्यावसायिक हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

त्या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी फक्त आमच्या सभासदांनी घेतली होती. हाऊसफुल झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी आम्ही संक्रांतीच्या वाणाचे आवाहन केल्यानंतर उपस्थित अनेकांनी आम्हाला भरभरून मदत केली. त्यामुळे यावर्षी आम्ही संस्थांना जास्त मदत करू शकलो.

एकवीस वर्षांचा पल्ला यशस्वीरित्या गाठलेला आमचा हा ग्रुप मैत्रीचा आनंद तर घेत असतोच; पण अनेक संस्थांना आम्हाला मदत करता येते आणि तेथील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हालाही आनंदित करतो. म्हणूनच आम्हा सर्वांना ‘उदयना’चा अभिमान आहे.

तुमचीही अशी संस्था आहे? महिला सक्षमीकरण, उद्योजकता, एकत्रीकरण किंवा इतर विषयांत तिचं काम आहे? तर मग आम्हाला नक्की लिहून पाठवा. शब्दमर्यादा पाचशे शब्द. लेखाबरोबर संस्थेच्या कामाशी संबंधित फोटो नक्की पाठवा. मजकूर पाठवण्याचा पत्ता : maitrin@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.