विशेष मुलांचं ‘सुहित’

सुहित जीवन ट्रस्ट ही संस्था गतिमंद बौद्धिक अक्षम असणारी मुलं; तसेच प्रौढ, स्वमग्न, बहुविकलांगता अशा प्रकारच्या मुलांसाठी काम करते.
विशेष मुलांचं ‘सुहित’
विशेष मुलांचं ‘सुहित’sakal
Updated on

मधुरांगण

डॉ. सुरेखा पाटील,सुहित जीवन ट्रस्ट

सुहित जीवन ट्रस्ट ही संस्था गतिमंद बौद्धिक अक्षम असणारी मुलं; तसेच प्रौढ, स्वमग्न, बहुविकलांगता अशा प्रकारच्या मुलांसाठी काम करते. या संस्थेची स्थापना २००४ मध्ये झाली. मला पूर्वीपासूनच मदर तेरेसा, हेलन केलर आदींनी केलेली कामं प्रेरणा देत होती. त्यांनी केलेली कामं बघून मला नेहमीच वाटायचं, की आपणही समाजात काहीतरी केले पाहिजे. माझी एक मैत्रीण गतिमंद मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. गतिमंद मुलांसाठी कशाप्रकारे काम केलं जातं हे माझ्यासाठी फारच नवीन होतं. मी तिला अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी ती मला तिच्या शाळेत घेऊन गेली. तिथे गेल्यानंतर मी अगदी नवीनच जग पाहिलं. त्यावेळी माझा स्वतःचा मुलगा हा तीन वर्षांचा होता. त्यावेळी मी पाहिलं, की ती मुलं कशी राहत होती.

त्यावेळी माझ्या मनात विचार आला की देवानं जर मला असा मुलगा दिला असता तर आई म्हणून मी काय केलं असतं? मी त्याचा सांभाळ कसा केला असता? आणि कदाचित त्याचवेळी मला खूप वर्षांपासून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मला ते क्षेत्र खुणावत होतं. मला त्या कामाची ओढ लागली. मी माझ्या मैत्रिणीची मदत घेऊन त्या क्षेत्रात बीएड केलं. त्यानंतर मी अशा प्रकारचं काम चालणाऱ्या संस्थांमध्ये काम करायला सुरुवात केली. यासोबतच मी माझे विशेष एम.एड. व मुंबई विद्यापीठातून पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले.

त्यावेळी माझ्यासमोर एकच ध्येय होतं, की पुण्या-मुंबईमध्ये अशा संस्था असतात; परंतु ज्या ठिकाणी अशा संस्था नाहीयेत तिथं आपण ही संस्था सुरू करायची आणि या संस्थेचं काम पेणमध्ये सुरू झालं. त्यावेळी मी दररोज पाच तास प्रवास करायचे. असं जवळजवळ सात वर्षं हा प्रवास करत करत संस्थेचं काम करत राहिले. त्यावेळी आम्ही पेणमध्ये प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन सर्व्हे केला. मुलांना गोळा केलं. या कामात मला महिलांची फार मदत झाली. आमच्या संस्थेत जवळजवळ ९० टक्के स्टाफ सुशिक्षित महिलांचा आहे. आमचा हा सर्व स्टाफ जवळजवळ १५ ते १९ वर्षं या संस्थेत काम करत आहे. हे काम सुरू झालं त्यावेळी ज्यांना काम करण्याची इच्छा होती, त्यांच्यासा लागणारे विविध कोर्सेस शहरात असायचे, त्यामुळे त्यांना ते करता येत नव्हते. यावर मात करण्यासाठी आम्ही स्वतःच कोर्सेस घेणं सुरू केलं आणि आमचंच कॉलेज सुरू केलं. आमचा ९० टक्के स्टाफ हा आमच्याकडेच बीएड झालेला आहे. हा सर्व स्टाफ स्पेशलाइज्ड स्टाफ आहे. आतापर्यंत जवळजवळ १००० च्या वर मुले संस्थेच्या कामाचे लाभार्थी ठरलेले आहेत. यात मुलं आणि मुली या दोघांचाही समावेश आहे.

आमच्याकडे एकूण चार युनिट आहेत.

पालवी शीघ्र हस्तक्षेप केंद्र : यामध्ये नुकताच जन्म झालेल्या मुलांपासून तीन वर्षांच्या मुलांचा समावेश होतो. म्हणजे ज्या मुलांची विकास काळात सामान्य मुलांसारखी प्रगती होत नाही, त्यांच्यावर विविध विशेष शिक्षिकांची मदत घेऊन त्यांच्यावर थेरपीज, फिजिओथेरपीज आदी काम करतो. बौद्धिक अक्षमता हा आजार नाहीये. ही एक अवस्था आहे. ही स्थिती पूर्णपणे बरी होऊ शकत नाही. या स्थितीत आपण गोळ्या, औषध देऊन बरं करू शकत नाही, मात्र ट्रेनिंगनं मुलांमध्ये नक्कीच सुधारणा होते.

सुमंगल मतिमंद मुलांची शाळा (३ ते १८) : यामध्ये मुलांची शाळा आपण चालवतो. यासाठी आमच्याकडे रायगड जिल्ह्यातील ५८ गावांतून मुले येतात. सकाळी नऊ ते पाचपर्यंत ती मुलं आमच्यासोबत असतात. या मुलांच्या येण्याजाण्याची व्यवस्थाही आम्ही केलेली आहे.

एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र (१८ ते ४६) : त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना विविध प्रकारचं प्रशिक्षण देतो. जेणेकरून ती थोड्याफार प्रमाणात अर्थार्जन करू शकतात. अठराच्या पुढील मुलांसाठी आम्ही बॅग बनवणं किंवा पिशवी बनवण्याची कामं करून घेतो. यातून त्यांना अर्थार्जन होण्यास मदत होते.

लाइट हाऊस स्पेशल टीचर ट्रेनिंग सेंटर : यामध्ये आमच्याकडे रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया दिल्लीची मान्यता असलेले कॉलेज आहे. यामध्ये या विशेष मुलांना शिकवण्यासाठी लागणारे बीएडचे कोर्सेस घेतले जातात.

ही मुलं पूर्णपणे नॉर्मल होऊन जगू शकत नाहीत. त्यांना सतत आधार देण्याची गरज असते. त्यांना सेल्फ मोटिवेशन नसते. त्यासाठी आम्ही सर्व स्टाफ मिळून काम करतो. ही संस्था चालवण्यासाठी आम्हाला काही डोनर्स, काही संस्था मदत करतात आणि शासनानंही आमचं काम बघून आम्हाला जमीन दिलेली आहे. त्यावर आम्ही इमारत उभी केलेली आहे.(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.