- डॉ. विलास सरवदे, जिल्हा आयुष अधिकारी
प्रखर उन्हात सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण हे त्वचेवर पडतात. त्यामुळे त्वचेमध्ये सुरकुत्या येणे व त्वचा लवकर वयस्कर होण्याचे प्रमाण वाढते. यामध्ये मेलेनिन जे संरक्षणाचे काम करते, त्याच्याच कार्यामध्ये या कडक सूर्यप्रकाशामुळे अडथळा येतो. त्यातून त्वचेचा कर्करोगाचा धोका वाढतो. डोळ्याचे विकार जसे डोळे लाल होणे, दुखणे, मोतीबिंदू लवकर होण्याचे प्रमाण वाढते. जीवनसत्व ‘अ’ चे प्रमाण कमी होऊ शकते.
जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे म्हणाले, तीव्र उन्हामुळे नाकाचा घोळणा फुटणे म्हणजे नाकातून रक्तस्राव होऊ शकतो. याबरोबरच मूत्रदाह म्हणजे लघवीला जळजळ पण होऊ शकते.
जास्त उन्हामुळे रक्तदाब कमी होऊन भोवळ, चक्कर, मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे, अशा पण गंभीर स्वरूपाच्या बाबी घडू शकतात. लोणकड तूप करताना जे ताक निर्माण होते, त्या ताकाचे किंवा त्यापासून बनवलेल्या मठ्ठ्याचे/लस्सीचे सेवन उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी फायद्याचे ठरते.
उन्हाळ्यात दही टाळलेले बरे. याबरोबरच शीतपेय कर्बोदोक युक्त पेय आणि रस्त्यावरील गाड्यावरील कृत्रिम रसायन टाकून केलेले पेय टाळलेले बरे. उन्हाळ्यामध्ये पाचकाग्नी कमी झालेला असतो त्यामुळे जेवणाच्या आधी एकदम थंड पाणी पिऊ नये. जेवताना मध्ये थोडे थोडे पाणी पीत जेवण करावे. अशाप्रकारे आयुर्वेदातील सिद्धांतानुसार आपण उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी उत्तम प्रकारे घेऊ शकतो.
अशी घ्यावी काळजी
उन्हात जाण्यापूर्वी हात व पाय पूर्ण झाकतील असे सुती कपडे, डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल वापरा.
त्वचेवर सनस्क्रीन लोशनचा वापर करा.
सरबतामध्ये सब्जा, तुळशीचे बी टाकल्यास मूत्र दाह, उष्णतेचा त्रास कमी होतो.
नेत्रदाह कमी करण्यासाठी गुलाबजलात भिजवलेल्या कापडाची घडी डोळ्यावर ठेवावी.
रात्री झोपताना तळपायाला खोबऱ्याची तेलाची मालिश उपयुक्त ठरते.
तीव्र उन्हाचे परिणाम
प्रखर सूर्यकिरणामुळे अल्ट्राव्हायोलेट किरणांचा धोका
त्वचेमध्ये सुरकुत्या, त्वचा लवकर वयस्कर होण्याचा धोका
त्वचेचा कर्करोगाचा धोका
डोळ्यांचे विकार, मोतीबिंदू लवकर होण्याची शक्यता
जीवनसत्व ‘अ’ चे प्रमाण कमी होण्याचा धोका
कोणती काळजी घ्यावी
कडक उन्हातून घरात आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. प्रथमतः शरीराला घराच्या तापमानाशी थोडे अनुकूल होऊ द्यावे. त्यानंतर काही मिनीट बसून घ्यावे. त्यानंतरच पाणी सरबत असे पेय प्राशन करावीत.
यामध्ये आयुर्वेदानुसार अनेक प्रकारचे पेय किंवा पानक वर्णन केले आहेत. यामध्ये लिंबू शरबत, कोकम शरबत, आवळा शरबत, बेलाचे शरबत, वाळा शरबत तसेच संत्री, मोसंबी, ऊस यांचा रस, टरबूज, खरबूज, अननस, यांचे सेवन शरीरासाठी अत्यंत फायद्याचे ठरते.
फ्रिजचे पाणी पिणे टाळावे. बर्फ सुद्धा निषिद्ध आहे. माठातील थंड पाणी हे आरोग्यास लाभदायी असते. माठामध्ये वाळाची पुरचुंडी टाकली तर वाळ्याच्या शीत गुणामुळे जी शरीरामध्ये उष्णता निर्माण होते त्यावर प्रतिबंध होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.