हिवाळ्यात अनेक जणांना कोरडी, रखरखीत त्वचा, त्वचेला खाज सुटणे अशा त्रासांना सामोरे जावे लागते. त्वचा कोरडी पडण्यामागे, वाढते वय, तीव्र रासायनिक साबण किंवा क्रीम वापरणे, खूप गरम पाण्याने अंघोळ करणे, स्टीम बाथ किंवा सोना बाथ सतत घेणे, कपडे, भांडी धुताना तीव्र साबणाचा, पावडरचा वापर आणि सतत बदलते, थंड वातावरण अशी अनेक कारणे असू शकतात.
या काळात काही त्वचारोग जास्त त्रासदायक ठरू शकतात. उदा. इसब, अटॉपिक डर्माटायटिस, सोरायसिस, इचथिओसिस, रोझेशिआ इत्यादी. या सगळ्या त्वचाविकारांसाठी, थायरॉईड, मधुमेह, अशक्तपणा, पोषणमूल्यांचा अभाव, यकृताचे आजार आणि स्त्रियांमध्ये मेनोपॉज या बाबीही कारणीभूत असू शकतात. त्वचा प्रमाणाबाहेर कोरडी झाली तर त्याची परिणती त्वचेला भेगा पडणे, त्यातून रक्त येणे, खाज सुटणे आणि जंतुसंसर्ग होणे अशा अजूनच त्रासदायक गोष्टींमध्ये होऊ शकते. आपण जाणीवपूर्वक काही गोष्टींची काळजी घेतली तर त्वचेचे हे त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात.
त्वचेसाठी सौम्य साबण, क्रीम वापरावेत. तसेही घाम येण्याच्या जागा सोडल्या तर बाकी त्वचेला रोज साबण लावण्याची गरज नसते.
अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा, आंघोळीनंतर त्वचा खसखसून पुसण्याऐवजी स्वच्छ, मऊ कापडाने टिपून घ्यावी.
त्वचेत किंचित ओलावा असतानाच उत्तम प्रतीचे मॉइश्चरायजर लावावे. त्याने त्वचेतील आर्द्रता टिकण्यास मदत होते.
लोकर त्वचेवर घासली गेल्यास खाज सुटते, म्हणून लोकरीच्या कपड्यांच्या आतून सुती कपडे घालावेत.
भांडी, धुणी, इतर स्वच्छतेची कामे करताना रबरी हातमोजे वापरावेत.
हिवाळ्यातसुद्धा त्वचा काळवंडते, सनबर्न होतात. त्यामुळे दर तीन तासांनी सनक्रीम लावावे.
पार्लरमध्ये वाफ घेणे, ब्लिच करणे, स्क्रब करणे अशा गोष्टी पंधरा-वीस दिवसांतून एकदा इतक्याच मर्यादित ठेवाव्यात.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी दुकानांमध्ये मिळणारी प्रॉडक्ट्स वापरू नयेत.
अति कोरडेपणा, त्वचेला भेगा किंवा वरीलपैकी त्रास जास्त प्रमाणात जाणवत असल्यास त्वरित त्वचारोगतज्ञाला दाखवावे.
उत्तम त्वचेसाठी, खाण्यापिण्याची नीट काळजी घेणे, अन्नातून सगळी पोषणमूल्ये मिळतील असे पाहणे आणि नियमित व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.