तू फुलराणी
डॉ. समीरा गुजर-जोशी
मैत्रिणी, तुझंही असं होतं ना, की एखादा दिवस आपल्या मनासारखा गेला नाही, तर ‘सकाळी सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता कोणास ठाऊक!’ असं आपण सहज म्हणून जातो; पण हे म्हणताना लक्षात येत नाही, की सकाळी बहुदा पहिला चेहरा आपण ‘आपलाच’ पाहिलेला असतो- कारण बिछान्याहून उठून आपण बहुधा वॉश बेसिनच्या आरशासमोर जाऊन उभे राहतो. हो ना?
त्यामुळे सकाळी पहिला चेहरा आपल्याला आपला दिसतो हे खरं असलं, तरी आपण तो ‘पाहतो’ का, हा एक प्रश्नच आहे. आपण आरशातल्या आपल्या प्रतिबिंबाकडे थोडं दुर्लक्षच करतो. म्हणजे घराबाहेर पडताना आपण निरखून आरशात प्रतिबिंब पाहतो खरं; पण ते कशासाठी? तर आपल्यातल्या चुका काढण्यासाठी. ओढणी व्यवस्थित घेतली आहे ना, केस नीट बांधलेत ना, पावडर जास्त तर नाही लागली, अशा एक ना दोन अनेक चौकशा करून त्या प्रतिबिंबाला आरशातच सोडून आपण घराबाहेर पडतो. आपण स्वतःला परफेक्ट प्रेझेंट करायला इतके उत्सुक असतो, की अनेकदा त्या प्रतिबिंबाला अर्थात स्वतःला ‘छान दिसते आहेस तू!’ हे सांगायचं राहूनच जातं.