पारदर्शी, घट्ट नातं

एकाच क्षेत्रात काम करत असताना, जिथे आपली इतर लोकांशी स्पर्धा असते अशातच जेव्हा त्यामधील एखाद्या व्यक्तीशी आपली घट्ट मैत्री होते ना ते नातं खूप भारी असतं आणि असंच काहीसं झालं आहे अभिनेत्री शिवानी सोनार आण ऋचा केळकर यांच्यासोबत.
पारदर्शी, घट्ट नातं
पारदर्शी, घट्ट नातंsakal
Updated on

पार्टनर्स

शिवानी सोनार,ऋचा केळकर

एकाच क्षेत्रात काम करत असताना, जिथे आपली इतर लोकांशी स्पर्धा असते अशातच जेव्हा त्यामधील एखाद्या व्यक्तीशी आपली घट्ट मैत्री होते ना ते नातं खूप भारी असतं आणि असंच काहीसं झालं आहे अभिनेत्री शिवानी सोनार आण ऋचा केळकर यांच्यासोबत. एका कार्यक्रमादरम्यान शिवानी आणि ऋचाची खऱ्या अर्थानं एकमेकांसोबत मैत्री झाली आणि तेव्हापासून त्या दोघीही एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी आहेत.

याविषयी शिवानी सांगत होती, ‘‘मी आणि ऋचानं ‘वपुलं’ नावाच्या अभिवाचन कार्यक्रमात एकत्र काम केलं होतं. आमचा पाच जणांचा ग्रुप होता. ज्यामध्ये आम्ही दोघीजणी आणि अजून तीन मुलं होती; पण आम्ही दोघीही मुली असल्यामुळे दौऱ्यांदरम्यान रूम्स शेअर करण्यामुळे आमची ओळख अजूनच घट्ट झाली. आता या गोष्टीला जवळजवळ सात-आठ वर्षं झाली आहेत. खरं तर माझी पटकन कोणत्याही मुलींशी मैत्री नाही होत. कारण कुठेतरी नंतर एक गॉसिप झोन तयार होतो; पण नशिबानं माझ्यात आणि ऋचात असं नाहीये. आम्ही दोघीही वेगवेगळ्या स्वभावाचा आणि विचारांच्या आहोत. त्यामुळेच आमच्यात चर्चा करण्यासारखे अनेक विषय असतात. पुण्यात आमचा एक कट्टा आहे, जिथे आम्ही कधीतरी भेटतो आणि मनसोक्त गप्पा मारतो.’’

ती पुढे म्हणाली, ‘‘अलीकडेच ‘सोनी मराठी’ वाहिनीवर माझी ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका चालू झाली आहे. ज्यामध्ये मी नायिकेच्या भूमिकेत आहे. या मालिकेदरम्यान माझ्या अनेक इच्छा पूर्ण झाल्या. जसं की, यामध्ये माझे सहकलाकार सुबोध भावे आहेत. मी त्यांची खूप मोठी फॅन आहे आणि आता त्यांच्यासोबत काम करणं हे खरंच एका स्वप्नासारखं आहे. यासोबतच अजून एक भारी गोष्ट आहे, की या मालिकेत मी आणि ऋचा दोघीही एकत्र काम करत आहोत. खरंतर हे तिचं टेलिव्हिजनवरील पहिलं काम आहे. तिनं याआधी मला बऱ्याचवेळा स्क्रीनवर पहिलं आहे, ज्याचा तिला मैत्रीण म्हणून खूप अभिमान आहे; पण आता मी तिला स्क्रीनवर बघते, तेव्हा माझं उर खरंच अभिमानाने भरून येतो. ती ललित कला केंद्रातून पासआऊट झाली आहे, त्यामुळे ती अभिनय तर उत्तमच करते; पण मला खूप छान वाटतं, की या मालिकेमुळे तिला तिच्या मनासारखं काम करण्याची संधी मिळाली आणि ती खरंच त्या संधीचं सोनं करत आहे.’’

ऋचा सांगत होती, ‘‘मला आनंद आहे, की माझं टेलिव्हिजनवरील पदार्पण मी माझी बेस्ट फ्रेंड शिवानीसोबत करते आहे. याच्यापेक्षा अजून काय हवं आहे? मालिकेमध्ये आम्ही दोघीही मैत्रिणींचीच पात्रं साकारत आहोत, त्यामुळे मला वेगळे काही कष्ट घ्यावे लागले नाहीत, कारण तो मैत्रिणींचा बॉंड आमच्या मैत्रीमुळे दिसून येतोच आहे. माझी पहिली मालिका तेही मोठमोठ्या कलाकारांसोबतची, त्यामुळे कशा स्वभावाची माणसं असतील, सेटवर काय वातावरण असेल याची सवय नसते. या आधी नाटकं किंवा चित्रपट केले असले, तरी मालिकेचं थोडं वेगळं पडतं. त्यामुळे त्या वातावरणाशी मला ओळख होण्यासाठी मला शिवानीची खूप मदत झाली. ती प्रत्येकवेळी माझ्यासोबत होती आणि तिच्यामुळेच मला ते दडपण फारसं जाणवलं नाही. ती मालिकेची नायिका असल्याने आता मी तिचे ठिकठिकाणी पोस्टर्स पाहते, ते पाहून मला छान वाटतं.मला शिवानीचा खूप अभिमान वाटतो.

तिची काम करण्याची पद्धत, कष्टाळू वृत्ती या सगळ्यांचा मी खूप आदर करते. यापूर्वी तिच्या घरच्यांपासून लांब राहून दोन मालिका केल्या. ती मीडियासमोर स्वतःला खूप छान कॅरी करते. माझ्यासमोर वावरणारी शिवानी प्रेस कॉन्फरन्समध्ये मुलाखती देते, तेव्हाचा तिचा वावर पाहून मला खरंच खूप अभिमान वाटतो तिचा.

‘‘ती उत्तम अभिनेत्री आहे; पण त्या पलीकडे ती एक माणूस म्हणून खूप छान आहे. आता आम्ही दोघीही स्पष्टवक्त्या आहोत, तरीही आम्हा दोघींचेही भिन्न स्वभाव आहेत. बऱ्याचवेळा भिन्न स्वभावाच्या माणसांमध्ये खटके उडण्याची शक्यता असते; पण आमचं नातं खूप वेगळं आहे आणि आता तर ते या लेव्हलला आहे, की आम्हाला आमच्या मनातल्या गोष्टी एकमेकांना बोलून दाखवायची गरज नाही पडत.’’

(शब्दांकन : मयूरी गावडे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.