कश्मिरा कुलकर्णी
माणसाला ओळखण्याचा आगळावेगळा छंद मी जोपासत आहे. मी आध्यात्मिक, ज्योतिषशास्त्र, न्यूरोलॉजी, वास्तुशास्त्र; तसंच रेकी अशा विविध विषयांची अभ्यासक आहे. नवनवीन गोष्टी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करत असते. आयुष्याबद्दल, माणसांबद्दल जाणून घेणं किंवा आपले जे विचार आहेत, त्या विचारांना समजून घेणं हा मला लहानपणापासूनच असलेला छंद आहे. कारण परिस्थिती आपल्या आयुष्यात जशी समोर येते, त्याप्रमाणे आपण वागत असतो. परिस्थिती खऱ्या आयुष्यात समोर येते, तेव्हा आपण आधी विचार करतो आणि मग त्यानुसार वागतो, असं सहसा होत नाही. खरंतर तसंच केलं पाहिजे.
असं म्हटलं जातं, की बोलण्याआधी आपण विचार करावा किंवा एखादी कृती करण्यापूर्वी विचार करावा; पण समजा एखादा माणूस रागात आहे, त्या क्षणाला लक्षात येणं थोडसं अवघड जातं. तो माणूस स्वतःला ओळखत नसेल, ध्यानधारणा करत नसेल, स्वतःवर नियंत्रण नसेल तर होत्याचं नव्हतं होतं. त्यामुळे मला स्वतःबद्दल, विचारांबद्दल आणि एकूणच माणसांच्या विचारविश्वाबद्दल जाणून घेणं अशा गोष्टींचा छंद लागला.