बटाट्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. बटाट्याची सालं फेकून न देता त्वचेवर लावल्यानं त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. अशा या बहुगुणी बटाट्याचे त्वचेसाठी अनेक उपयोग असून, त्याबाबतची माहिती घेऊ या.
बटाट्यात झिंक, आयर्न, प्रोटीन आणि अॅझलिक अॅसिड हे घटक असतात. ही पोषणमूल्यं त्वचेचा रंग उजळण्यास, पोत सुधारण्यास, त्वचेवरचे काळे डाग कमी करण्यास उपयुक्त ठरतात. ठरावीक कालावधीसाठी बटाट्याच्या रसाचा वापर केल्यास काळे डाग , मुरमं, त्वचेवरचे चट्टे कमी होतात. त्वचा उजळण्यासाठी, टॅन कमी करण्यासाठी अनेक जण ब्लीच करतात.
नितळ त्वचेसाठी
स्कीनसाठी आवश्यक असणारं प्रोटीन बटाट्यात असतं. त्वचेमधल्या पेशींना हे प्रथिन मिळाल्यावर त्वचा नितळ, मऊ होते आणि रंगही एकसारखा उजळतो.
त्वचा उजळण्यासाठी
त्वचेवरचे काळे डाग, चट्टे घालवण्यासाठी बटाट्याची सालं परिणामकारक ठरतात. अॅझलिक अॅसिडमुळे काळे डाग फिकट होतात व त्वचा उजळते. बटाट्यामध्ये ब्लीचिंग करणारं catecholase असतं. उन्हामुळे काळवंडलेली त्वचा त्यामुळे उजळते. तसंच इतरही व्रण कमी होतात.
टॅनिंग कमी होतं
बटाट्यात क जीवनसत्त्व असतं. ते नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतं. उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळवण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे काळी वर्तुळं, सुरकुत्या कमी होतात व त्वचा एकसारखी दिसते.
बटाट्याच्या साली कशा वापराव्यात?
- बटाटा धुऊन साली काढून घ्याव्यात. ही सालं चेहऱ्यावर घासावीत. 5-10 मिनिटं तसंच ठेवून थंड पाण्याने चेहरा धुवावा. उन्हामुळे काळवंडलेल्या भागाची जळजळ यामुळे कमी होते व त्वचा उजळते.
- बटाट्याचं साल व टोमॅटोचा रस एकत्र करावा. त्यात थोडी हळद घालून तो पॅक आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावावा. 10-15 मिनिटं ठेवून धुवावं. टोमॅटोच्या रसाऐवजी काकडीचा रसही यात घेऊ शकता.
- बटाट्याची सालं बारीक करून घ्यावीत. त्यात काही थेंब लिंबाचा रस घालावा. हा पॅक त्वचा उजळण्यासाठी उपयोगी ठरेल.
- बटाट्याची दोन सालं फ्रीजमध्ये ठेवावीत. ही थंड सालं डोळ्यांच्या खाली ठेवावीत. यामुळे डोळ्याच्या खालच्या भागातली सूज व काळी वर्तुळं कमी होतात.
बटाटा नैसर्गिकरीत्या त्वचेचा पोत सुधारतो; मात्र काही जणांना बटाट्याची अॅलर्जी असते. यामुळे सरसकट चेहऱ्यावर लावण्याआधी शरीराच्या वेगळ्या भागावर प्रयोग करून पाहावा. काही त्रास न झाल्यास चेहऱ्यावर वापर करावा. त्वचेचा रंग उजळण्यासाठी व नैसर्गिक ब्लीच करण्यासाठी बटाट्याचा उपयोग होतो. घरच्या घरी व सोप्या पद्धतीने हे उपाय करता येऊ शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.