आजपासून व्हॅलेंटाईन विकची सुरूवात होत आहे. प्रेमीयुगूल ज्या दिवसाची वाट पाहत असातात. प्रेमी युगुलांसह उतारवयातील व्यक्तीही या दिवसाची वाट पाहत असतात. आपल्या जोडीदाराप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या स्पेशल दिवसाची सुरूवात आजपासून म्हणजे रोज डेपासून होत आहे.
रोज डे, टेडी डे या दिवसांनी सुरूवात होऊन शेवटी व्हॅलेंटाईन डेला या आठवड्याचा शेवट होतो. याच निमित्ताने आपण काही सामान्य लोकांच्या लव्ह स्टोरी पाहणार आहोत. ही अशी काही जोडपी आहेत जी अतिसामान्य जगणं जगतात. अन् ते एकमेकांची साथ देतात. आज आपण अशाच एका जोडीला भेटणार आहोत. ज्यांची लव्ह स्टोरी सामान्य असूनही वेगळी आहे.
तर आपल्या स्टोरीतील नायिकेचं नाव आहे प्राची अन् मुलाचं नाव आहे दिपक. (नाव बदललेली आहेत) या जगावेगळ्या प्रेमकथेबद्दल बोलताना प्राची म्हणते की, आमचं प्रेम तसं शाळेतल. कोवळ्या वयात मनात फुलणाऱ्या प्राजक्तासारखं. शाळेत सुरू झालेलं प्रेम आयुष्यभर टिकत नाही, शेवटपर्यंत जात नाही असं म्हणणाऱ्यांची तोंड आम्ही बंद केलीत.
इयत्ता 9 वीत असताना शाळेतल्या जिन्यात लावलेल्या आरशात तो मला अन् मी त्याला पहायचे. तसं, आम्ही फक्त एकमेकांकडे पहायचो, बोललो कधीच नाही. कारण, आमचं प्रेम नजरेनं सुरू झालं होतं. आम्ही 10 वी ला गेलो, बोर्ड परीक्षा झाली, शाळेतून बाहेर पडलो आणि आमचं एकमेकांशी बोलायचं राहूनच गेलं.
आम्हाला एकमेकांचा घराचा पत्ता देखील माहीत नव्हता. पण त्याच 10 वीच्या सुट्ट्यांमध्ये मी माझ्या मैत्रिणींसोबत जवळच्या बागेत गेले होते. आणि देवाला देखील आम्ही भेटावं असं वाटतं होतं. म्हणून की काय त्याच बागेत तो ही आलेला त्याच्या मित्रांसोबत.
समोर होतो तरी बोलायचं धाडस होईना तेव्हा पहिल्यांदाच आम्ही आमच्या त्या मित्र मैत्रिणींना आमच्या दोघांबद्दल बोललो असेल. मग तेच आम्हाला फोर्स करू लागले. बोला पुढे होऊन. मग कसंबसं धाडस करून आम्ही दोघे तेव्हा बोललो एकमेकांशी. ते ही फक्त मैत्रीच्या भावनेने. तेव्हा आम्ही फोन नंबर शेअर केले.
त्या भेटीच्या तिसऱ्याच दिवशी आम्ही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. आमचं प्रेम बहरत चाललं होतं. फोन, मेसेजवर रोजच बोलणं सुरू झालं या सगळ्याला एखादं वर्ष होत आलं तोवर माझ्या घरी समजलं.
प्रत्येक प्रेम प्रकरणात हा पॉईंट येतोच. की कपल्सच्या घरी समजतं. तसं माझ्याही घरी समजलं. सुरूवातीला कोणतेही पालक होकार देत नाहीत. कारण आम्ही अजून १८ व्या वर्षाचा टप्पाही पूर्ण केला नव्हता. तसेच आमची जातही वेगळी होती. तो मराठा अन् मी ब्राह्मण. मुळात या गोष्टीलाच घरच्यांचा विरोध होता. (Valentines Day 2024)
काही वेळ गेला अन् घरच्यांच वादळ शांत झालं. पुन्हा आमच आहे असं बोलणं,भेटणं सुरू झालं आणि आम्ही एकमेकांना लग्न करण्याच वचन देखील दिल अर्थात मनापासून. आणि पूर्ण करण्यासाठीच. त्या नंतर बरीच वर्षे गेली. मला मिळवण्यासाठी माझ्या घरच्यांना समजवण्याठी त्याच्या कडे चांगलं काम असण गरजेचं होतं.
मी बी.कॉम ग्रॅज्यूएट आहे तर तो एक उत्तम गायक, गिटार वादक असल्याने छंद जपत खाजगी नोकरीही करायचा. अन् मुलांचे गिटारचे क्लासेसही घ्यायचा. काहीतरी नोकरी करतो म्हणजे मुलीला खूश ठेवेल ही भावना त्यामागे होती.
कारण माझ्या घरी आई वडिलांना मनवण्यासाठी जे करावं लागेल ते करायची तयारी होती त्याची. तोवर माझ्या घरी माझ्या लग्नाचा विषय निघू लागला. कारण आता मी 22-23 ची होते. मला घरात विचारलं गेलं की स्थळ पहायला सुरवात करायची का?
पण अर्थात मी नकार दिला कारण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. मला समजवण्याचा खूप प्रयत्न झाला. पण मला त्याच्यावर आणि त्याचा प्रेमावर विश्वास होता. आणि मला तो कधीच चुकीचा व्यक्ती नाही वाटला त्यामुळे माझं ठरलेलं की लग्न करेन तर त्याच्याशीच.
घरात नेहमी शांतता,माझ्याशी कोणी नीटस बोलत नव्हतं. तोवरच कोरोना व्हायरस आला,लॉककडाऊन वगैरे स्थितीमध्ये त्याच काम सुद्धा थांबलं. तो खूप संघर्षाचा काळ होता आमच्यासाठी. पण त्यानंतर लवकरच त्याच काम सुरळीत झालं आणि आता मी स्वतः च माझ्या घरी सांगितलं की मला दिपकसोबतच लग्न करायचं आहे. त्यांनंतरही माझ्या घरच्यांनी होकार द्यायला खूप वेळ घेतला पण शेवटी आमचं प्रेम जिंकल आणि कोर्ट मॅरेज केलं.
आता मी घर सांभाळते अन् तो त्याचं आवडतं काम करतोय. तो उच्चभ्रू हॉटेलमध्ये गायनाचं काम करतो. लोकांना त्याचा आवाज आवडतो. अन् मलाही.. आम्ही दोघेही एकमेकांना सपोर्ट करतो. आणि एकमेकांसोबत आनंदी आहोत. आम्ही एकमेकांसोबत आहोत ही भावनाच खरं तर प्रेमाची अनुभूती देते. तेव्हा वाटतं की आपण किती नशिबवान आहोत. खरंच देवाचे धन्यवाद मानते की आम्हाला त्याने एक केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.