Valentine Week Special : ‘समतेच्या वाटेनं खणकावत पैंजण यावं, तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं’... शंतनू कांबळे या कवीने लिहिलेल्या शब्दांप्रमाणे जात, धर्म, रूढी, परंपरांची सर्व बंधनं तोडत तिने जोडीदार म्हणून माझ्या आयुष्यात यावं, हे माझं स्वप्न होतं. पण सोळा वर्षांपूर्वी माझं लग्न झालं तेव्हा ते पूर्ण झाल्यासारखं वाटत नव्हतं. टिपिकल 'कांदेपोहे प्रोग्राम'मध्ये माझी आणि स्वातीची पहिली ओळख झाली आणि काही दिवसांतच ती माझी जीवनसाथी बनली. खरं तर आज मागे वळून पाहताना आयुष्यातील सर्वात मोठा जुगार मी जिंकल्याची माझी भावना आहे. होय, आपली लग्न ठरवण्याची पारंपारिक पद्धती हा समाजमान्यता असलेला जुगारच तर आहे! कोणतीही ओळख-पाळख नसणाऱ्या दोन व्यक्ती कांदापोहे कार्यक्रमाच्या निमित्ताने काही मिनिटांसाठी भेटतात, ते दिसण्यावरून एकमेकाला आवडले तर दोन्ही बाजूचे लोक आपल्या अत्यंत मर्यादित स्त्रोतांच्या माध्यमातून एकमेकांविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि या तुटपुंज्या माहितीवर या दोन अनोळखी व्यक्तींना ‘आयुष्यभरासाठी बंधनात अडकवून टाकतात’.
आजही आपली समाजव्यवस्था स्त्रियांना स्वतःचे मत मोकळेपणाने मांडण्याचा, त्यांनी पाहिलेली स्वप्ने मुक्तपणे जगण्याचा, त्यांच्या आवडी-नावडी, छंद खुलेपणाने जोपासण्याचा अवकाश देत नाहीत. आजच्या प्रमाणेच सोळा वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले तेव्हा सुद्धा ‘मिळवता मुलगा आणि सुंदर, गृहकृत्यदक्ष मुलगी’ हेच लग्न ठरवण्याचे सामान्य निकष होते. हे निकष पाहून एकदा का मुलाच्या/मुलीच्या कुटुंबियांना त्यांनी पाहिलेला मुलगा/मुलगी आपल्या मुलीसाठी/मुलासाठी योग्य वाटली की त्या मुला-मुलीने सक्तीने पुढचे संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत ‘संसार’ करायचा म्हणजे करायचाच! तर या टिपिकल कांदापोहे कार्यक्रमातून स्वातीचे आणि माझे लग्न झाले. या समाजमान्य जुगारात चुकूनच स्वातीसारखी विचारी आणि पारंपारिक रूढी परंपरांची चिकित्सा करायला तयार असणारी, कालसुसंगत बदलांना आनंदाने स्वीकारण्याची आणि त्यानुसार आपले वागणे बदलण्यासाठी तत्पर असलेली मुलगी माझ्या जीवनात जीवनसाथी म्हणून आली. म्हणूनच आज आम्ही एक समतापूर्ण आणि आनंदी सहजीवन जगत आहोत.
लग्न झाले तेव्हा आम्ही दोघे पूर्णतः भिन्न प्रकृतीची आणि प्रवृत्तीची माणसं होतो. यातील अनेक भिन्नता आजही कायम असल्या तरीही सहवासासाने आणि संवादाने यातील अनेक भिन्नतेवर आम्ही मातही केली आहे. परस्परांचे काही गुण आणि अवगुणही एकमेकांत आले आहेत. या वाटेवरून चालत असताना अनेक सामाजिक समज आणि बंधनांना आम्ही धुडकावूनही लावले आहे. लग्न म्हणजे दोन अपरिचित भिन्नलिंगी व्यक्तींनी 24×7 एकत्र राहण्यासाठीचा समाजाचा परवाना आणि सक्तीही. ही सक्ती नाकारत आम्ही दोघांनी विचारपूर्वक week end family चा पर्याय स्वीकारत मी रत्नागिरी जिल्ह्यात असलेली नोकरी करत स्वातीने कोल्हापूरात राहून शिक्षण पूर्ण करण्याचा आणि त्यानंतर पुण्यात जाऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मध्येच दिल्ली येथे जाऊन तिने आणखी एक वेगळ्या क्षेत्रातील शिक्षण घेतले. अनेक मानसिक, भावनिक आणि सामाजिक संघर्षांवर मात करत हे निर्णय यशस्वी ही करून दाखवले.
या संपूर्ण प्रवासात लग्नापर्यंत पारंपारिक विचारांची असलेली स्वाती आधी विचारांनी आणि हळूहळू कृतीने चळवळीची झाली. आणि काहीसा बेशिस्त असलेलो मी थोडासा शिस्तीत वागू लागलो. एकमेकांचे योग्य म्हणणे (नवरा/बायको म्हणून नाही माणूस म्हणून) ऐकून, समजून घेणे, आपल्याला न पटलेल्या मुद्यांवर वाद घालणे, ते पटवून देणे आणि आवश्यक बदल घडवून आणणे असा वाद-संवादाचा प्रवास सुरु झाला. या वाटचालीत स्वातीने नवऱ्याला अहो-जाहो बोलावणे, त्याच्या नावाने गळ्यात, हातात, पायात सौभाग्यालंकार मिरवणे, त्याच्यासाठी आणि कुटुंबासाठी विविध व्रतवैकल्ये करणे अशी शोषण आणि असमानतेच्या प्रतिक असलेल्या अनेक गोष्टी प्रयत्नपूर्वक प्रसंगी अनेकवेळा संघर्ष करत सोडून दिल्या. अर्थात या संपूर्ण प्रक्रियेत पुरुषप्रधान व्यवस्थेने पुरुष म्हणून मला दिलेले विशेषाधिकार मी सोडणे अपेक्षित होते. मी स्वीकारलेला समतावादी विचार, या विचारांची वाहक असलेली चळवळ आणि चळवळीतील अनेक साथींच्या आणि महत्वाचे म्हणजे स्वातीच्या सोबतीमुळे हे विषमतावादी विशेषाधिकार सोडायला बळ मिळाले.
स्वतःचे biological बाळ जन्माला घालणे ही लग्नातील आणखी एक सक्ती. एका टप्प्यावर आम्ही या सक्तीला नकार देत एक मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. स्वतःचे biological बाळ जन्माला घालण्याच्या हट्टापायी अनेकविध वैद्यकीय तपासण्या आणि व्रत वैकल्यांच्या नावाखाली स्त्रियांच्या शरीराचे खूप मोठ्या प्रमाणात शोषण होताना पाहणे आणि अशावेळी पुरुषाची साधी वीर्य तपासणीही न केली जाणे हे समाज म्हणून आपण किती सहजपणे मान्य करतो. biological बाळाची ‘गरज’ पूर्ण झाल्यावर कुटुंब नियोजनाच्या पुरुष नसबंदीच्या शस्त्रक्रिया अतिशय सोप्या, विनावेदना आणि विशेषतः आपण एक महत्वाची जबाबदारी पार पाडतोय याचा आनंद देणाऱ्या असतात. पण तुलनेने अधिक वेदनादायी आणि अधिक विश्रांतीची गरज असलेल्या शस्त्रक्रियेची जबाबदारीही स्त्रियांवरच लादून आपला दुटप्पी समाज स्त्रीच्या मातृत्वाचे आणि सोशिकतेचे किती कौतुक करतो! म्हणूनच बाळ दत्तक घेण्याच्या निर्णयाचा पुढचा भाग म्हणून आम्ही दोघांनी विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयानुसार मी स्वतःची पुरुष नसबंदी करून घेतली. आम्हा दोघांसाठी अगदी सहज असणारे हे दोन्ही निर्णय आमचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मैत्र परिवार यांना मान्य करण्यासाठी तितके सोपे नव्हते. यांतील अनेकांशी संवाद करत आम्ही आमच्या निर्णयांवर ठाम राहिलो याचे आज आम्हाला खूप समाधान आणि आनंद आहे.
हेही वाचा - Love Matters: प्रेम म्हणजे एकमेकांच्या आयुष्याचा 'कॉपीराईट' नाही
आमच्या आनंदी सहजीवनाचे आणखी एक उघड गुपित म्हणजे आमची घरकामातील समानता. पुरुषांनाच प्रधान मानणाऱ्या आपल्या व्यवस्थेने अगदी कुशलतापूर्वक अनेक गोष्टींमध्ये औपचारिक सन्मान देण्याचे नाटक करत ‘गृहकृत्यदक्ष’ हे विशेषण लावून स्त्रियांना स्वयंपाक, घरकाम आणि सेवा सुश्रुषा यात गुंतवून ठेवत स्त्रियांच्याही नकळत, बेमालूमपणे आपली शोषण व्यवस्था सुरु ठेवली आहे. खरे समतापूर्ण जीवन जगायचं असेल तर या सर्व कामांत पुरुषांनीही आपला न्याय्य सहभाग घेतला पाहिजे हे लक्षात आल्यावर आम्ही दोघांनी खऱ्याखुऱ्या सहजीवनाचा हा मंत्र आचरणात आणायला सुरुवात केली. केवळ कामच नाही तर कुटुंबातील कोणताही निर्णय घेताना एकमेकांची मते घेणे, त्यातील स्वतःची जबाबदारी उचलणे आणि हे करत असताना दोघांचा स्वतंत्र अवकाश (space) जपणे हा नित्यक्रमाचा भाग बनवला.
या सहजीवनामुळे एकमेकांच्या चांगल्या गुणांचा विकास आणि काही चुकीच्या सवयी आणि स्वभाव यांमध्येही सकारात्मक बदल झाले. रागाने येणारा आणि खूप काळ टिकून राहणारा माझा अबोला काहीसा कमी झाला. एखाद्या नवीन विषयाचा शांतपणे सूक्ष्म अभ्यास करणे, स्वतःच्या कामातून वेळ काढून कुटुंबाकडे लक्ष देणे, नीटनेटकेपणा आणि व्यवस्थित राहणे हे आवश्यक गुणही स्वातीमुळेच माझ्यात विकसित झाले. तर एखाद्या विषयाकडे समग्रपणे पाहणे, स्वतःचे योग्य मुद्दे ठामपणे मांडणे, सामाजिक उत्तरदायित्वासाठी कृतीशील राहणे असे काही बदल स्वातीच्या वागण्यातही झाले. यामुळे आम्ही माणूस म्हणून अधिक उन्नत झालो. दोघांच्या वेगवेगळ्या पण ज्याच्या त्याच्या आवडीच्या क्षेत्रातल्या नोकऱ्या, त्यातून आलेली आर्थिक सधताना, दोघांच्या कुटुंबांशी एकमेकाची जुळलेली नाळ, चळवळींनी दिलेला समतावादी विचार आणि तो कृतीत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न यामुळे आज आमचे सहजीवन समाधानी आणि यशस्वी वाटावे असे चालले आहे तरी आजही we have more promises to keep and long miles to go before we sleep… अशीच आमची भावना आहे.
- कृष्णात स्वाती (8600230660) | krishnatswati@gmail.com
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.