Valentine Week Special : मी मंगेश ला पहिल्यांदा भेटले, त्या गोष्टीला या जून महिन्यात आठ वर्षे पूर्ण होतील. माझ्या दहावीनंतरच्या उन्हाळी सुट्ट्या चालू होत्या. आमच्या एका सरांच्या सांगण्यावरून मी अमळनेरला होणार्या 'युवा श्रमसंस्कार छावणी'त जाऊन आले होते. तिथून गावात आल्यानंतर मी दारूबंदीचे काम हाती घ्यायचे ठरवले आणि त्या अनुषंगाने गटबांधणी सुरू केली. त्या कामाच्या निमित्ताने मला मंगेश भेटला. सुरुवाती-सुरूवातीला मला तो खूप सिरियस वगैरे वाटायचा. हळूहळू कळत गेले की तो खूप विनोदी माणूस आहे. शाब्दिक खेळ करून विनोद करत राहणं, हे त्याच्यात अंगभूत कौशल्य असल्यासारखं आहे. एवढं माहीत होऊनही आमची चांगली मैत्री मात्र मी पुण्यात शिकायला आल्यावर झाली. मी खूप बोलते. बडबड करणं हा माझा स्वभाव आहे. आणि समोरच्याच शांतपणे ऐकून घेणं हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून माझी त्याच्याशी गट्टी जमली. मी पुण्यात नवीन होते, शिवाय मी फर्ग्युसन कॉलेजला होते. त्यामुळे माझ्या आयुष्यात रोज काहीतरी हॅपनिंग व्हायचं. कॉलेज, स्पर्धा, नाटक वगैरे वगैरे! तसंच राष्ट्र सेवा दलाशी जोडल्या गेल्यामुळे पुरोगामी वर्तुळात होणारे कार्यक्रम, चर्चा मी अटेण्ड करायचे. मी त्यावेळी झपाटून टाकल्यासारखं काहीही वाचायचे. मी जे काही ऐकते, अनुभवते, वाचते हे सगळं मला कुणाला तरी सांगायचं असायचं आणि ते ऐकायला तयार असणारा हक्काचा मित्रा म्हणजे मंगेश.
हळूहळू मलाही विचारांची दिशा कळायला लागली आणि त्यालाही! आम्ही चळवळीच्या कामात स्वत:चं थोडाफार योगदान देऊ लागलो आणि मैत्री घट्ट होत गेली. आमच्या नात्याचा पाया 'आमचे विचार' आहेत असं मला नेहमी वाटतं. आम्ही जे काम करतो, हे जग कस असावं याबद्दलच आमचं जे स्वप्न आहे ते दोघांच सारखं आहे, म्हणून आमचं जुळत गेलं आणि जुळतंय. त्यामुळे हिंदी सिनेमाने आपल्यावर लादलेला romanticism आमच्या नात्यात कमी आहे. आणि ते नॉर्मल आहे हे समजून घ्यायला मला वेळ लागला. विचार सोडले तर आमच्या आवडी निवडी, स्वभाव यात कमालीचे अंतर आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे मी बडबडी आहे. चिडचिड-संताप मी सोबत घेऊन फिरत असते. त्या उलट तो आहे. त्याला राग येत नाही. येतही असेल तर तो कुणाला न दाखवता आतल्या आत कंट्रोल करणं त्याला माहीत असेल. कारण मी ओळखते तेव्हापासून आतापर्यंत मी त्याला कधी कुणावार खूप रागावलेलं किंवा ताल सोडून बोललेलं बघितलं नाहीये. मी सतत हातामध्ये माइक घेऊन बोलायला तयार असते. तो मात्र नेहमी बॅकस्टेजला. अगदी कुणी कितीही सांगितलं तरी त्याला प्रसिद्धीची भुरळ पडत नाही. मी प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे. मला सतत नवीन काहीतरी करायचं असतं, पुढे जायचं असतं. त्याचं तस नाही, जे काम हातात घेतलंय ते शांतपणे पूर्ण करत राहणं त्याला जमतं. मी कविता लिहिते. काही कविता तर स्पेशल त्याच्यासाठी असतात. कविता वाचून तो मला विचारतो, 'बरं, याचा अर्थ काय आहे?'. त्याचं ऑटोमोबाइल इंजीनीरिंग झालाय, स्वतःचं फोर व्हीलरचं सर्विस सेंटर आहे. त्याने मला आतापर्यंत हजारवेळा सांगितलं असेल की गाडीच्या या पार्टला हे हे म्हणतात, हे सिम्बॉल असलं म्हणजे ही अमुक एका कंपनीची गाडी असते. तरीही अजूनही मला गाड्या ओळखता येत नाहीत. इतका सगळा फरक असतांनाही आम्ही एकमेकांसोबत आहोत. कारण आमची निष्ठा आमच्या विचारांवर आहे. आम्हाला माणूसपण जपणारं, सर्वांना समान लेखणारं , आनंदी जग हवंय. यूटोपीयन वाटत असलं तरी हे स्वप्न आम्ही एकमेकांना पुन्हा पुन्हा ऐकवतो आणि ते जग तसं करण्यासाठी स्वतःची चिमूटभर धडपड सोबतीने करत असतो.
समानता आली पाहिजे यासाठी लिहिणारे, भाषणे करणारे खूप लोक मी आजूबाजूला पाहिलेत. मांगेश सहसा भाषण करत नाही, लिहीत नाही, पण त्याची वागणूक मात्र समानतेच्या दिशेने जाणारी असते. आपला ज्या विचारांवर विश्वास आहे, ते विचार आपल्या रोजच्या वागण्यात येत आहेत की नाहीत हे पुन्हा पुन्हा तपासून बघण्याची सवय मला त्याच्यामुळे लागली. म्हणूनच आमचं नातंही त्याच दिशेने जातंय, असं मला वाटतं. नात्यात एकमेकांची स्वप्नं जपत, त्याला बळ देत राहणं, एकमेकांच्या वैयक्तीक स्वातंत्र्याचा आदर करणं, एकमेकांवर कुठल्याही प्रकारची बळजबरी- बंधने न घालणं, एकमेकांवर मालकी हक्क न दाखवणं, एकमेकांवर विश्वास ठेवणं, सतत संवादी राहणं ही आमच्या नात्याची नियमावली आहे. जी अलिखित आहे, पण दोघांनी स्वतःप्रती मान्य केली आहे. आम्ही लग्नाआधी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या पेहरावात प्री वेड्डिंग शूट केले होते. त्याची बरीच चर्चा झाली. ते करण्यामागेही हेच कारण होतं, आम्हाला हे जग अधिक चांगलं व्हावं म्हणून काहीतरी करत राहायचंय तेही एकमेकांची वैयक्तीक स्पेस जपत... जसं -ज्योति जगले. त्यामार्गाने आम्हाला जायचंय. माझे कितीतरी मित्र असताना स्वत:ला insecure न वाटून घेणारा, मी खूप दिवसात काही लिहलं/वाचलं नाही तर मला लिहाण्या-वाचण्याची आठवण करून देणारा, माझ्या यशाने निखळपणाने खुश होणारा मंगेश ज्योतिबाचा लेक आहे, ही माझी खात्री आहे. मी सावित्रीची लेक व्हावं म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेतच.
हेही वाचा - Love Matters : म्हणून मला स्वत:ची नसबंदी अधिक योग्य वाटली; कृष्णात-स्वातीचं समतेच्या वाटेवरील सहजीवन
इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेने आपल्या सर्वच नात्यांना अन्याय -अत्याचाराची, शोषणाची, असमानतेची जी झालर जोडली आहे, ती झालर आमच्या नात्यात असू नये, जात धर्माच्या बेड्या ओलांडून हे नातं अधिक समान व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही लग्नही नोंदणी पद्धतीने, विशेष विवाह कायद्याअंतर्गत केलं. लग्नानंतर मी स्वतः शोषणाचे प्रतीके असलेले कोणतेच आभुषणे स्वीकारली नाहीत/घातली नाहीत. समाजातील लोक आम्हाला विचारतात, 'तुम्हाला आपली संस्कृती मान्य नाही का?' आम्ही उत्तर देतो, 'आम्हाला मनुस्मृती मान्य नाही. आपली संस्कृती मनुस्मृतीपेक्षा किती तरी वेगळी आहे. त्यातलं जे चांगलं, या जगाला अधिक सुंदर करणारं आहे ते-ते आम्ही स्वीकारू' आपण जे वागतोय ते योग्य आहे, यावर विश्वास असल्याने समाजाशी आणि स्वतःशी संवाद आणि प्रसंगी संघर्ष करण्याची आमची तयारी आहे.
हेही वाचा - Love Matters: "साडी, मंगळसूत्र आणि जोडव्यांची बंधनं घालणारा मी कोण?' सांगताहेत आरजू-विशाल
खरंतर आम्हा दोघांनाही वाटतं की आपल्या वैयक्तीक गोष्टी जगाच्या काय कामाच्या? मंगेशला तर सोशल मीडियावरही वैयक्तिक काही शेअर करायची गरज नाही अस वाटतं. पण सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या थीमवरच्या फोटोशूटनंतर अनेक लोकांनी आम्हाला आमच्याबद्दल विचारलं आणि आम्ही आमच्या नात्याबद्दल बोलू लागलो. जे जे वैयक्तिक ते ते वैश्विक या वाक्यावर विश्वास ठेवून हे सगळं लिहलं. सर्वांनी एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांना समान लेखा, माणूसपणाच्या वाटेवर प्रवास करण्यासाठी एकमेकांना सोबत द्या याच प्रेम दिनाच्या सदिच्छा.... सर्वांना हॅप्पी व्हॅलेंटाईन्स!
- श्वेता सीमा विनोद | shwetaseema123@gmail.com
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.