Love Matters : 'व्हँलेटाईन डे'ला खास व्यक्तीला प्रपोज करताय? आयुष्याचा निर्णय घेण्याआधी एकदा हे वाचा

love
love
Updated on

Valentine Week Special : 'व्हँलेटाईन वीक'च्या निमित्ताने आपण कोणाला प्रपोज करणार आणि कोणाचे व्हँलेटाईन होणार किंवा होणार की नाही, ही उत्सुकता प्रत्येक तरुणाला असतेच. आधीपासूनच जोडीदार असेल तर प्लॅंनिंग वेगळे असतात पण आपल्याला जोडीदार हवाच, या भावना या काळात अधिक जाणवू लागतात, हे नक्की! 
जोडीदार- जोडीने चालणारा, सोबत करणारा, समजून घेणारा, प्रसंगी समज देणारा, भरपूर प्रेम करणारा, काळजी घेणारा, विश्वास ठेवणारा, विश्वास देणारा , आपली स्पेस मान्य करणारा, मन जपणारा, असं कोणीतरी भेटावं अशी स्वप्नं मन कधीचं रंगवू लागलेल असतं. पण असा जोडीदार मिळावा यासाठी काय करावं लागतं? कुठलं प्रशिक्षण घ्यावं लागतं, कोणत्या अभ्यासक्रमाला कधी ऍडमिशन घ्यावं लागतं, याची माहिती आपल्याला असते का? 

हेही वाचा - Love Matters : म्हणून मला स्वत:ची नसबंदी अधिक योग्य वाटली; कृष्णात-स्वातीचं समतेच्या वाटेवरील सहजीवन
अजिबातच ही माहिती नसते आणि कोणी देतही नाही. मुळात प्रेमात पडूच नका, असली थेरं आपल्याकडे चालत नाहीत आणि लफडी करत बसलात तर करियर कसं होणार अशीच तंबी आपल्याला मिळालेली असते. पण यामूळे प्रेमात पडायचे आपण कुठंचे राहतोय ? कोणी आवडायचं कुठं थांबतंय? उलट मन अधिक ओढ घेत राहतं आणि लग्न करीन तर याच्याशीच, हिच्याशीच हे ठरवून मोकळं होतं. शारीरिक जवळीक हवी वाटते तर कधी लैंगिक सुखाची ओढ अनुभव घ्यायला प्रवृत्त करते. नात्याला सुरुवात झाल्यावर, काहीकाही वेळा सहज घरचे तयार झाले तर लग्न झाल्यावर जेव्हा डाल आटे का भाव कळतो आणि स्वभावाचे खरे रंग कळतात तेव्हा तेव्हा वाटलेलं प्रेम आता कुठं आटलं, ही व्यक्ती तीच ना की बदलली? असे प्रश्न नात्यातला गुंता वाढवतात. यासाठी मघाशी म्हटलं तस प्रशिक्षण, आपले  प्राधान्य कळायला हवेतच पण त्याची काही कुठं सोय नाही, केंद्र नाही. 

हेही वाचा - Love Matters: "साडी, मंगळसूत्र आणि जोडव्यांची बंधनं घालणारा मी कोण?' सांगताहेत आरजू-विशाल
जोडीदार मग प्रेमासाठी असो किंवा लग्नासाठी, त्याच्या निवडीसाठी आपल्याला काही बेसिक गृहपाठ तर करायला हवाच. फार काही मोठ्ठं नाही पण स्वतःची पुरती ओळख करून घ्यायला हवी. स्वतःची ओळख म्हणजे आपण कसे आहोत, काय आवडतं काय नाही आवडत, प्राधान्य काय आहेत, भविष्यातील स्वप्नं काय आहेत, जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, आपल्या निर्णयाने काय, कसे आणि कोणावर परिणाम होणार आहेत, आपण नातं टिकवण्यासाठी, फुलवण्यासाठी स्वतःवर किती काम करायला तयार आहोत, म्हणजे अडजस्टमेंट कशी करू शकणार आणि कोणत्या कॉम्प्रेमायझेस नाहीच जमणार याची पुरेपूर ओळख स्वतःला हवी. त्यानुसार पालकांशी संवाद सुदृढ असावा म्हणजे नवीन भावनिक नात्यांमध्ये देखील सुरक्षित वाटतं. आपण संशयी तर नाही ना, मानसिक भावनिक दृष्टीने सुदृढ सक्षम आहोत न याचीही चाचपणी केलेली असावी. खरंतर दुसऱ्यांना जज करणं जितक सोपं तितकंच स्वतःचा एवढा अभ्यास करणं कठीण! यासाठी मदत घ्यायला अजिबात लाजू नये. मोकळं नातं हवं तर मोकळा संवाद ही हवाच. 

काही वर्षे प्रेमात असलेल्या विनय आणि मिताने लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा आपण एकमेकांना चांगलं ओळखतो असंच दोघांनाही वाटत होतं. पण लग्नानंतर एकदा बोलताना मासिक पाळी विषयी बोलणं सुरू असताना विनयची मतं ऐकून मिताला खूप आश्चर्य वाटलं. मुलींनी याकाळात विटाळतात की नाही माहीत नाही पण आमच्याकडे आई, ताई चार दिवस बाहेर बसत आल्यात आणि तुलाही हेच करावं लागेल, बायकांच्या विषयांत मी काही पडणार नाही, असं त्याने जेव्हा म्हटलं तेव्हा खुल्या विचारात वाढलेल्या मिताला 'आपण ओळखत होतो तो विनय हाच का?' असा प्रश्न तिला पडला. हा विचारसरणीतील भेदांचा मुद्दा होता ज्यावर त्यांनी एकमेकांना कधी तपासलं नव्हतंच हे आता लक्षात येत होतं. आपल्याला जोडीदार म्हणून आवडणाऱ्या व्यक्तीविषयी आपल्याला आकर्षण वाटतंय ही चांगलीच गोष्ट असते पण आकर्षणाला प्रेमाचं नाव देण्याची घाई नसावी. प्रेम आणि आकर्षण यातला फरक नीट समजून घ्यावा. अर्थात यासाठी मैत्रीच्या टप्प्यावर चांगला वेळ द्यावा आणि स्वतःला अधिक तपासून घ्यावं. प्रेमात संशय, हिंसा, सक्ती, गृहीत धरणं, निर्णय स्वातंत्र्य नाकारणं, अति काळजी करणं, दोषांकडे दुर्लक्ष या बाबींमुळें नंतर भावनिक ताण निर्माण होऊ शकतात, ज्याचा नात्यावर खोल परिणाम होतो. हे टाळता येईल यासाठी निकोप संवाद असायला हवा.
लग्नासाठी जोडीदार निवडताना यापेक्षा अधिक काही बाबींचा विचार करावा लागतो. प्रेम ही नैसर्गिक भावना लग्न नावाच्या सामाजिक संस्थेत रूपांतरित होताना सहजपणे होत नाही. जात, धर्म, आर्थिक स्थिती ,सामाजिक प्रतिष्ठा या बाबी आता महत्वाच्या ठरतात. प्रॅक्टिकली विचार करूनच इथं निर्णय घ्यावे लागतात. प्रेमातला जोडीदारच लग्नासाठी परफेक्ट असेल असंही काही गृहीत धरून चालत नाही, ते याचमुळे! प्रेम आहे म्हणजे लग्न करायलाच हवं असा हट्ट धरून चालत नाही आणि जराही ओढ, आकर्षण वाटत नाही तरी लग्न करा मग आपोआप प्रेम निर्माण होईल, या गॅरंटीवर फार विश्वास ठेवूनही चालत नाही. 

हेही वाचा - Love Matters: प्रेम म्हणजे एकमेकांच्या आयुष्याचा 'कॉपीराईट' नाही
टिपिकल अरेंज मॅरेज असलेल्या संतोष आणि वैशाली यांचं लग्न ठरून काही महिन्यांचा काळ मध्ये होता. पण संतोषने जेव्हा जेव्हा वैशालीसोबत बोलण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्याला परावृत्त केलं गेलं. आपल्यात आधी बोलत नाहीत, मुलगी लाजेल, तिला दडपण येईल वगैरे त्याला सांगितलं जाई. मुलगी फार बोलत नाही हेच त्याला आधीही सांगितलं होतंच, लग्नानंतर दुसऱ्या दिवशीच संतोषच्या लक्षात आलं की वैशाली नॉर्मल संवाद साधू शकत नाही, जास्त विचारलं तेव्हा कळलं की तिला तीव्र स्वरूपाचा मानसिक आजार असून उपचार सुरू आहेत, ज्याची जराशीही कल्पना आधी देण्यात आली नव्हती. दोघांत संवाद नसल्याने प्रेम वाटणं तर दूर संतोषला ती समोरही नकोशी वाटू लागली आणि तातडीने घटस्फोट घेण्यासाठी त्याने आग्रह धरला. जबर फसवणूक त्याच्या जिव्हारी लागली होती. मानसिक-भावनिक ताण आता दोन्ही कुटूंबात निर्माण झाले आणि कालच्या उत्साहाची जागा चीड, संताप याने घेतली. दोन जीव मात्र प्रचंड तुटले होते. या सगळ्या गुंत्यात आंधळेपणाने उडी मारण्याची अनावर इच्छा असली तरी प्रेम डोळस करावं आणि जोडीदाराची निवड विवेकाने करावी, हे कधीही उत्तम! म्हणतात ना- थोडीशी सावधानी... कधीही चांगलीच! नाही का?

- आरती नाईक, (पनवेल) | aratinaik2299@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()