कॉलेजच्या पहिल्या वर्षात असतानाच त्यांचे सुर जुळले होते. एकाच वर्गात असल्याने अनेकदा त्यांची नजरानजर व्हायची. अनेकदा ती पाहून हसायची कधी तो पाहून हसायचा. शेवटी त्यानेच धाडस केलं आणि तिला प्रपोज करून टाकलं. तिनेही जास्त वेळ न घेता त्याला होकार देऊन टाकला. तेव्हापासून त्याचं प्रेम फुलत गेलं. त्याचं हे पहिलं प्रेम होतं. त्यामुळे तो प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घ्यायचा. पण तिचं तसं नव्हतं. अकरावी-बारावीला असताना तिचं एका मुलावर प्रेम होतं. बारावी संपल्यानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले होते. तीनही काही न लपवता त्याला हे सर्व सांगितलं होतं आणि त्यानंही हे सर्व नॉर्मली घेतलं होतं.
कॉलेजमध्ये एकत्र असल्याने त्यांनी एकमेकांना खूप वेळ दिला. एकत्र राहणे, एकत्र फिरणे, कधी सिनेमा, नाटके पाहायला जाणे असं सर्व काही सुरू होतं. कधी एकांतात त्यांनी एकमेकांना किस देखील केलं होतं. कॉलेजमधून घरी गेल्यानंतर सुद्धा ते फोनवर तासनतास बोलायचे. कधी कधी तर सकाळ झालेली सुद्धा त्यांना कळायची नाही. एकंदरीत त्याचं मस्त चाललं होतं.
अशा या वातावरणात कॉलेजचं शेवटचं वर्ष कधी आलं हे त्यांना कळालं सुद्धा नाही. आता या दोघांची घालमेल सुरू झाली. तिच्याशिवाय जगण्याचा तर तो विचारच करू शकत नव्हता. अखेर कॉलेजचा शेवटचा दिवस आला. या दिवशी दोघे मनसोक्त रडले. एकमेकांना कधी न विसरण्याच्या आणाभाका घेतल्या. भेट झाली नाही तरी दररोज फोन करायचं त्यांनी ठरवलं आणि ते एकमेकांपासून दूर झाले.
दोघांनाही नोकरी लागली. पण त्याला नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जावं लागलं. त्यामुळे त्यांच्यातील अंतर आता वाढलं होतं. भेटीसाठी ४-५ महिने वाट पाहावी लागायची. सुरुवातीला त्यांचं दररोज फोनवर बोलणं व्हायचं पण आता त्यात खंड पडू लागला होता. त्यांच्या कामाच्या वेळाही जुळत नसायच्या. याने फोन केला तर ती बिझी असायची, अन् तिनं फोन केला तर हा बिझी असायचा.
पुढे पुढे तर आठवड्यातून २-३ वेळाच यांच्यात फोन होऊ लागला. अनेकदा याने फोन केल्यास ती बोलताना निरुत्साही वाटायची, होय-नाही अशीच उत्तरं मिळायची. तिने तर फोन करणं जवळजवळ बंदच केलं होतं. त्यामुळे त्यांच्यातील अंतर वाढतंय हे त्याला स्पष्ट जाणवत होतं.
Valentine Week Special: '13-7' ला पाठ फिरवली तरी ती मनात आहेच की ओ...
तिला ऑफिसमध्ये नवीन मित्र मैत्रीण मिळाले होते. त्यांच्यासोबत फिरायला जाणे, ट्रेकिंग करणे, पिक्चरला जाणे असं तिचं सुरू होते. जीवनाचा आनंद ती मनसोक्त घ्यायची. फेसबुक, व्हॉटसअप स्टेटस ठेऊन ती सर्व गोष्टी शेअर करायची. मात्र हा वरचेवर एकलकोंडा होत चालला होता. ऑफिसला जाणे आणि घरी येणे एवढंच त्यांनं आयुष्य करून घेतलं होतं. घरी आलं की तो फक्त तिचाच विचार करायचा.
ऑफिसमध्ये एका मुलासोबत तिची जवळीक वाढू लागली आहे हे त्याला समजत होतं. त्यामुळे तर त्याची खूपच चिडचिड होत होती. फोनवर तर ते आता नुसते भांडायचे. भांडणं झाले की पुढचे अनेक दिवस त्यांच्यात अबोला असायचा. शेवटी तोच फोन करायचा आणि माफी मागायचा. असं अनेक दिवस सुरू होतं. पण हे आता जास्त दिवस चालणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं. तो प्रचंड मानसिक तणावातून जात होता आणि यातून मार्ग काढणे त्याला गरजेचं बनलं होतं.
त्याने तिला भेटायचं ठरवलं. ऑफिसमधून सुट्टी घेऊन तो तिला भेटण्यासाठी गेला. कॉलेजमध्ये असताना ते ज्या कॉफिशॉपमध्ये भेटायचे तेथेच त्यांनी भेटायचं ठरवलं. दोघांची भेट झाली तेव्हा पूर्वीसारखा आपलेपणा राहिला नव्हता. ती तर आंतरबाह्य पूर्णपणे बदलली होती. कोण्या अनोळखी मुलीशी आपण भेटत आहोत असंच त्याला वाटत होतं. तिची नजर आता त्याला टाळत होती.
औपचारिक बोलण्यानंतर त्याने विषयाला हात घातला. मनात सुरू असलेला कोलाहल त्याने तिला बोलून दाखवला. नातं टिकवण्यासाठी त्याने बोलून पाहिले पण तिच्याकडून योग्य असा प्रतिसाद आला नाही. तिला नातं तोडायचं होतं पण तसं ती बोलून दाखवत नव्हती. शेवटी त्यानेच पुढाकार घेतला आणि आपण आता वेगळं झालेलं बरं असं तो तिला म्हणाला. तिने काहीच न बोलता मान खाली घातली. तो जे समजायचं आहे ते समजला आणि तो बाहेर पडला...
डोळ्यात त्याच्या अश्रू आले होते. दुःख, राग आणि हतबलता यांनी त्याचं मन भरून आलं होतं. त्याला माहित होत हे सर्व त्याला खूप कठीण जाणार आहे पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आता त्याने एकट्याने जाण्याचं ठरवलं होतं....
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.