प्रिय राधा,
"तू मला खूप आवडतेस. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. तू फक्त हो म्हण, मी तुझ्यासाठी काहीही करेन. तू म्हणालीस तर जीवही देईन. करशील ना माझ्याशी लग्न?"
असंच बोललो होतो ना मी त्यादिवशी...पण तू 'नाही' म्हणालीस आणि निघून गेलीस. खरंतर तू नकार देशील, असं मला कधी वाटलंच नव्हतं. तू नकार का दिला? तुला दुसरं कुणी आवडत नसेल ना? तुझ्याशिवाय माझं काय होईल? या आणि अशा असंख्य प्रश्नांनी मी हैराण झालो होतो.
एकतर्फी प्रेमातून (Love) उद्ध्वस्त झालेले अनेकजण मी पाहिले होते. एकटे राहणारे, आपल्याच विश्वात मग्न असणारे, सिगारेट आणि दारूच्या नशेत बुडालेले अनेकजण पाहिले होते. अॅसिड हल्ले, खून, बलात्कार, अपहरण अशा घटनांमागे बऱ्याचदा एकतर्फी प्रेम हेच कारण असतं, हेसुद्धा मी जाणून होतो. बऱ्याच जणांनी आत्महत्या करून स्वतःलाच संपवल्याचंही मी ऐकलं होतं. (Valentines Day: Love Letter of One-sided lover)
मीही याच परिस्थितीतून जात होतो. काय करावं तेच कळत नव्हतं. कशातच रस वाटत नव्हता. आयुष्यातील खूप वर्षे यातच निघून गेली. माझ्याबरोबरच्या मुलांना नोकऱ्या लागल्या, लग्न होऊन मुलंबाळंही झाली आणि माझं मात्र कशातच काही नव्हतं. पण तू आज ना उद्या होकार देशील याच अपेक्षेने जगत होतो. पण तू होकार दिलाच नाहीस.
माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. सगळं आयुष्य व्यर्थ गेलं असंच वाटू लागलं होतं. रात्री झोप लागत नव्हती. जेवण गोड लागत नव्हतं. आला दिवस कसातरी ढकलत होतो. सगळं संपलं असंच वाटत होतं.
पण जे उध्वस्त करतं, ते प्रेम कसलं..! मी सहज हा काही वर्षांचा प्रवास उलगडून बघितला आणि माझ्या लक्षात आलं की, तू मला बिघडवलं नव्हतं, घडवलं होतंस! तू नकार दिलास हे जरी खरं असलं, तरी अप्रत्यक्षपणे खूप काही देऊन गेलीस.
मी तसा खूप चंचल, कायम गोंधललेला, पण तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा कधी विचारही केला नाही. मी आळशीही तितकाच, पण तुला बघण्यासाठी का होईना मला लवकर उठायची सवय लागली. प्रवासाचाही मला खूप कंटाळा यायचा, पण तुझ्यामागे खूप फिरलो.
तुझ्यासाठी कविता लिहिल्या. वरातीत नाचायला लाजणारा मी, पण तुला इंम्प्रेस करण्यासाठी स्टेजवर जाऊन डान्सही करू लागलो. तुझ्यापुढे मिरवता यावं म्हणून अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी होऊ लागलो. अगदी गटारंही काढली. मी खूप नाजूक आणि घाबरट होतो. थोडं खरचटलं तरी शाळा बुडवायचो. पण तुझ्यासाठी रक्ताने तीन पानांचं लव्हलेटर लिहिलं. तुझ्या वाढदिवसाला आजही मी रक्तदान करतो.
तुझ्याबद्दल काही कळावं म्हणून अनेक जणांना भेटायचो. आज तू बरोबर नाहीस, पण ही जोडलेली माणसं मात्र कधीच तुटली नाहीत. आयुष्यभर साथ देतील अशा मित्रमैत्रिणी मला तुझ्याचमुळे मिळाल्या. विविध उपक्रमांत भाग घेतल्यामुळे अनेक चांगल्या लोकांशी संपर्क आला. शिकायला मिळालं. माझी स्वप्ने तशी खूपच मर्यादित होती. पण आता काहीतरी चांगलं करावसं वाटतंय. माझा स्वभाव, माझ्या खऱ्या आवडी मला तुझ्यामुळेच कळाल्या.
सुरुवातीला वाटायचं की दारू पिऊन विसरुन जावं सगळं. कित्येकदा तर जीवच द्यावा वाटायचा. पण नाही... तू होतीस बरोबर. तू हो म्हणाली असतीस तर हा प्रवास मला अनुभवताच आला नसता.
आज तुला मनापासून एवढंच बोलू वाटतंय, तुझ्यावर प्रेम तर आधीपासून करतो; पण त्याहीपेक्षा जास्त तुझा आदर करतो. जिथे असतील तिथे खुश राहा.
थँक्स...
फक्त तुझाच,
................
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.